
गौरीं-गणपतीमध्ये गौरीच्या दोन मूर्त्यांचे पूजन का करतात??
गौरीच्या दोन मूर्त्यांचे पूजन का करतात??

जेष्ठा नक्षत्रावर ही देवी येत असल्याचे तिला जेष्ठा लक्ष्मी ( Jestha Lakshmi ) म्हटले जाते. तसेच लक्ष्मीची जेष्ठा भगिनी अलक्ष्मी हिची पूजा या दिवशी केली जाते. जगात सर्वत्र प्रत्येक गोष्टींना चांगली वाईट, डावी-उजवी अशा दोन विरोधी बाजू असतात. त्यातल्या डाव्या गोष्टीचा त्याग केल्यास अनवस्था निर्माण होते असे मानतात.
समुद्र मंथनातून महालक्ष्मी आणि तिची बहीण अलक्ष्मीचा जन्म झाला.
श्रीमहालक्ष्मी म्हणजे (येणारे धन) आणि श्रीअलक्ष्मी (खर्च होणारे धन) असे म्हणतात. लक्ष्मीची थोरली बहिण ‘अलक्ष्मी’ ही देखील पूजनीय आहे. या संदर्भातील प्राचीन आरण्यका अशी आहे. समुद्र मंथनातून अनेक रत्नांबरोबर लक्ष्मी हे रत्न निघाले. साक्षात श्रीविष्णूने श्रीलक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याचा निश्चय केला. त्यावेळी आपल्या जेष्ठ भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही, असे श्रीलक्ष्मीने सांगितल्यावर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वीशी लावून दिला. पण श्रीअल्क्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे तो तपस्वी वनात पळून गेला. तेव्हा श्रीअलक्ष्मी अश्र्वत्थ (पिंपळाचे झाड) वृक्षा खाली रडत बसली. तिथुन श्रीविष्णू जात असता त्यांनी तिला रडताना पाहिले. तिची हकिकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला तीन वरही दिले. पहिला वर, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे. दुसरा वर, शनिवारी अश्र्वत्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पिडा देऊ नये. तिसरा वर, दरवर्षी भाद्रपद महिन्यात जेष्ठा नक्षत्रावर तिची पूजा केली जाईल, असा होता. तेव्हापासून जेष्ठ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते.
या दोन गौरीमधील एक गौर म्हणजे लक्ष्मी घरातच असते. दुसरी बाहेरून आणतात तीच जेष्ठा गौर घरात आणताना तिचाही उल्लेख लक्ष्मी असाच केला जातो. यावेळी जमिनीवर रांगोळीने आठ पावले काढली जातात. प्रत्येक पावलावर थोडे थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो. यामध्ये अष्टलक्ष्मी चा समावेश असतो. ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे. तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते. कारण श्रीअलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यात असते. तसेच गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले गेले आहे. अपराजितपृच्छा या ग्रंथामध्ये द्वादशगौरींचा उल्लेख येतो. अग्निपुराणामध्ये गौरी मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते असे सांगितले आहे.
श्रीमहालक्ष्मी चे मुखवटे त्यांच्या मुलांसह सर्वप्रथम सिंहदार प्रवेश दार तुन अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ ठेवले जातात. तिथून त्यांना वाजतगाजत घरात आणले जाते. यावेळी महालक्ष्मी घरात आणताना घरात सर्वत्र प्रकाश असावा. देवघरात देवापुढे ठेवून त्यांना नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर त्यांना स्टँडवर किंवा मडक्यांची उतरंड रचून उभे केले जाते. श्रीमहालक्ष्मीचे मुखवटे हे प्रामुख्याने प्लॉस्टर ऑफ पॅरीसचे पाहायला मिळतात. त्याचबरोबर काही ठिकाणी ते पितळेचे असतात तर काही ठिकाणी ते कणकेचेदेखील बनविलेले असतात. श्रीमहालक्ष्मीना साडी नेसविली जाते. त्याचबरोबर त्यांना दागदागिने चढविले जातात. श्रीमहालक्ष्मी ज्या मखरात उभ्या केल्या जातात तो सजवून श्रीलक्ष्मी च्यापुढे त्यांचा संसार मांडला जातो. शिवाय त्यांच्यापुढे अनेक धान्याच्या राशी मांडलेल्या असतात. श्री लक्ष्मी आवाहन करण्याच्या अनेक पद्धती निरनिराळ्या प्रांतांनुसार प्रचलित आहेत. काही घरात चांदीच्या किंवा पितळ्याच्या किंवा मातीच्या मुखवट्यावर तर काही जणी सुघट (संक्रांत, घट, मातीचे भांडे), काही घरात वाहत्या पाण्याजवळच्या खड्यांवर तर काही जणी मूर्तीवर गौरीचे आवाहन करतात. काही प्रांतात गौरी म्हणजेच शंकराची पत्नी मानून पूजा करण्यात येते. तर काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीची रोपटी पूजेसाठी वापरतात.
जेष्ठा गौरी म्हणजे माहेरी आलेली माहेरवाशीणच. या दिवशी सासूरवाशिणींना आपल्या माहेरी विशेष मान असतो. गौरी दिवशी घरी विशिष्ट प्रकारचे अन्न शिजवण्याची प्रथा आहे. त्यात प्रामुख्याने भाजी-भाकरीचा, ज्वारीच्या कण्याचा समावेश होतो. संध्याकाळी हळदीकुंकवाचा कार्यक्रम करून रात्री झिम्माफुगड्या, घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते.
अष्टमीच्या दिवशी श्रीलक्ष्मी पूजन करून पुरणाचा नैवेद्य दाखविला जातो. जेष्ठा गौरी हे पार्वतीचेच विशिष्ट रूप मानले जाते. तिला वैराग्यलक्ष्मीही म्हणतात.
श्रीअलक्ष्मीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर केल्यास त्या गोष्टी पुन्हा वाढीस लागत नाहीत, असे मानतात. विसर्जनाच्यावेळी दहीभाताचा नैवैद्य केला जातो. यावेळी या देवतेवर अक्षता वाहून तिला निरोप दिला जातो. भाद्रपद शुक्ल पक्ष अष्ठमीला बलवान ज्येष्ठा नक्षत्रावर दुसऱ्या दिवशीआपल्या घराण्याच्या प्रथेनुसार कोणा कडे सकाळी, दुपारी, किंवा संध्याकाळी किंवा रात्री महापुजन करतात यात पाना-फुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी माळतात, हार, चाफ्याचे फूल, केवड्याचे पान वाहतात तर नैवेद्याला १६ भाज्या, १६ कोशिंबीरी, १६ चटण्या, १६ पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ करतात. पुरणाची १६ दिव्यांनी आरती करतात. संध्याकाळी हळदी-कुंकवाचा मोठा समारंभ केला जातो.तिसऱ्या दिवशी तिला खीर- कानवल्याचा ( करंजीचा प्रकार मुरड घालुन करतात, मुरडून परत यावी म्हणून) नैवेद्य दाखवुन तिची पाठवणी करतात. अश्याप्रकारे ही माहेरवाशीण येते, राहाते, आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते पणं परत येण्याचे वचन मात्र देऊन जाते.
गौरीच्या दोन मूर्त्यांचे पूजन का करतात??
Follow PRATILIKHIT
https://pratikpravinmhatre.com/
5 Comments