ये है मुंबई मेरी जान…

ये है मुंबई मेरी जान…

“काय रे… आज परत लेट मार्क का??”

“हो रे… ह्या आठवड्यातला हा दुसरा लेट मार्क आहे. आताच मॅनेजर बोल, बोल बोलला. म्हणे घरून जरा लवकर निघता येत नाही का? आता ह्याला कोण सांगणार की घरून मी नेहमी वेळेच्या अर्धा तास अगोदर निघतो. पण मधलं स्टेशन असल्यामुळे लोकलच्या आतमध्ये पाऊलही ठेवायला मिळत नाही रे. इतके दिवस दरवाज्याला लटकून यायचो पण आता परवाची ती मुंब्राची घटना आठवली की लटकण्याची हिंमतच होत नाही रे…”

“ते आहेच रे… पण आता प्रशासन लोकलला स्वयंचलित दरवाजे लावणार आहेत म्हणे. त्यामुळे लोकलमधून पडून कुणाचा मृत्यू होणार नाही.”

“स्वयंचलित दरवाजे लावतील रे… आतमध्ये व्हेंटिलेशनची व्यवस्थाही करतील. पण गर्दीचं काय?? ती कमी होणार आहे का?? AC ट्रेनची अवस्था बघतोस ना संध्याकाळच्या वेळेला?? दाबून दाबून दरवाजे बंद करावे लागतात. AC ट्रेनची ही अवस्था असेल तर सामान्य लोकलची काय अवस्था होईल जरा विचार कर. जोपर्यंत सगळे दरवाजे बंद होणार नाही लोकल सुटणार नाही. त्यात आपले लोकं दिडशहाणे. हवा पाहिजे म्हणून दरवाजात पाय ठेवून तो उघडाही ठेवतील. AC लोकल, मेट्रोमध्ये चढायला लोकं शिस्तीत रांगा लावून उभे राहतात. समजा लोकलचे दरवाजे बंद असल्यामुळे लोकांनी रांगा लावल्या तर लांबच लांब रांग मॅनेज करण्यासाठी आपली स्टेशन पुरेशी मोठी आहेत का?”

“पण मग यावर दुसरा उपाय काय?? काही जणांनी पोस्ट टाकले होते की लोकलचे दरवाजे बंद करण्यापेक्षा आता परप्रांतीयांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे बंद करायला हवेत.”

“स्टेटस टाकण्यासाठी चांगलं आहे रे हे… पण प्रत्यक्षात तसं शक्य आहे का?? आपण उगाच इमोशनल होऊन स्टेटस टाकतो पण खरी परिस्थिती बदलावी म्हणून काय करतो? “

“अरे पण प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला नको? मुंबई ओव्हरलोड झालीये हे आता तरी मान्य करायलाच हवं. मुंबई स्पिरिट, मुंबई स्पिरिट म्हणत मुंबई अजून किती लोकांना सामावून घेईल? ठीक आहे, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, मुंबई ही मुंबई आहे सगळं मान्य. पण त्या मुंबईचाही जीव गुदमरत असेल रे आता… तिलाही श्वास घेणं कठीण होत असेल.”

“या सगळ्या गोष्टींना पर्याय शोधणं ही आता मुंबईची गरज आहे. राजकारणी लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मुंबईलगतची उपनगरं कित्येक दशके मागास ठेवली. मुंबई नंतर नवी मुंबई झाली, आता पनवेल तिसरी मुंबई होण्याच्या मार्गावर आहे पण मुंबई पासून काही किलोमीटरच्या अंतरावर आलेला आणि मोक्याच्या ठाणे जिल्ह्याकडे प्रशासनाचं लक्षच नाही. आज पालघर, विरारचा माणूस नोकरीसाठी मुंबई, नवी मुंबईला जातो. काही वर्षांनी कदाचित तो नोकरीसाठी तिसऱ्या मुंबईला जाईल पण त्याला त्याच्या भागाच्या जवळपास नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन काय पावलं उचलतंय??”

“याशिवाय कंपन्यांनीही आता जिथे शक्य आहे तिथे हायब्रीड मॉडेलचा विचार करायला हवा. कामाच्या वेळा बदलणं मला तितकं चांगलं नाही वाटत कारण रोज सेकंड शिफ्ट करणाऱ्या माणसाला त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळतच नाही. दोन दोन, तीन तीन दिवस त्यांचं त्यांच्या कुटुंबाशी नीट बोलणंही होत नाही. 9 ते 6 वेळ असली की घरी आल्यावर थोडंफार का होईना पण कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळतो त्यामुळे ते वेळ flexi करण्याचा कंपन्यांनी विचार जरी केला तरी त्यामुळे लोकांच्या वैयक्तिक जीवनावर होणाऱ्या परिणामांचा विचारही व्हायला हवा.”

“अर्थात… आणि हे काही एका महिन्यात किंवा वर्षात शक्य नाही. पण निदान त्याची सुरुवात तरी आता व्हायला हवी. तरच भविष्यातील मुंबईकरांचं आयुष्य जगण्यालायक असेल.”

©PRATILIKHIT

88250cookie-checkये है मुंबई मेरी जान…

Related Posts

सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्तां हमारा??

सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्तां हमारा??

मराठीचा मानापमान

मराठीचा मानापमान

बुलबुलांचं रुटीन

बुलबुलांचं रुटीन

गटारी अमावस्या की गताहारी अमावस्या?

गटारी अमावस्या की गताहारी अमावस्या?

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 238,892 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories