बुलबुलांचं रुटीन

बुलबुलांचं रुटीन
रोजच्या रुटीनला कंटाळलेल्या माणसाच्या पोस्ट आपण नेहमीच पाहतो, पण तुम्हाला जर कुणी सांगितलं की पक्षांचंही रुटीन असतं तर?? जशी आपण आपल्या लहान मुलांची काळजी घेतो, आपला संपूर्ण दिवस त्यांची देखभाल करण्यात जातो तसाच पक्षांचाही जात असेल तर???

सिमेंटच्या जंगलांची वेढलेल्या मानववस्तीमध्ये हिरवीगार झाडं मिळणं म्हणजे जरा कठीणच… परंतु सुदैवाने आमच्या परिसरात अजूनही आंबा, फणस, पेरू, नारळ, सुपारी यांसारख्या झाडांसकट असंख्य फुलझाडंही आहेत. त्यामुळे आपसूकच आजूबाजूच्या परिसरात बरेच पक्षी, फुलपाखरे, कीटक वास्तव्याला असतात. त्यातलंच हे एक बुलबुलचं जोडपं.

गेले सहा महिने हे जोडपं आमच्या घराच्या आजूबाजूला आहे आणि त्यांच्या दोन पिढ्यांचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. अगदी अंडी घातल्यापासून ते पिल्लं मोठी होईपर्यंत त्यांचा दिनक्रम मी रोज पाहतोय.
अंडी घातल्यावरही दोघे तसे थोडे बिनधास्त होते. कारण घरटं करताना बुलबुल झाडावरची अशी जागा निवडतात जी वरून घिरट्या घालणाऱ्या शिकारी पक्षांना सहजासहजी दिसणार नाही. त्यांची जबाबदारी वाढले जेव्हा त्या अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात. कारण पिल्लांच्या चिवचिवाट ऐकून इतर पक्षी किंवा साप वगैरे त्यांच्या शोधात येऊ शकतात.

त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे मी संपूर्ण दिवस त्या बुलबुलांच्या निरीक्षणात द्यायचं ठरवलं आणि कॅमेराचं हत्यार सोबत घेऊन त्यांच्यावर पाळत ठेवत बसलो. एव्हाना पिल्ले थोडी मोठी झाल्यामुळे ती घरट्यातून बाहेर पडून बाजूच्याच एका जास्वंदीच्या झाडाच्या छोट्या फांदीवर बसली होती. लहान असली तरीही त्यांना कुठे लपून बसता येईल याची समज होती कारण मी थोडं जरी डोकं वर काढलं तरी ती लगेच थोडीशी मध्ये सरकायची. त्यांच्यापासून अगदी थोड्याच अंतरावर त्यांचे आईवडील त्यांच्यासाठी दाण्यापाण्याची सोय करत होते. वरून जाणाऱ्या एका लाईटच्या वायरवर बसून ते आजूबाजूने उडणारे लहान कीटक आपल्या चोचीने पकडत होते. एक पकडून झाला की पिल्ले बसलेली तिथे येत होते, त्यांना भरवत होते आणि परत वायरवर जाऊन बसत होते. आणि यातच त्यांचा पूर्ण दिवस गेला. नाही म्हणायला पिल्लांनी झाडं बदलली होती पण त्या आईवडिल तिथेच बसून कीटक पकडत होते.

दिवस मावळायला आल्यावर त्यांनी एक विशिष्ट साद घातली आणि त्यांच्या पाठोपाठ पिल्ले घरट्यामध्ये परत गेली. सगळी पिल्ले घरट्यामध्ये परत आल्याच्या खात्री केल्यावर ते जोडपं तिथेच बाजूला असलेल्या घराच्या गच्चीवर बसलं. बराच वेळ ते त्यांच्या भाषेत काहीतरी बोलत बसले होते. ‘आज दिवस छान गेला… बरीच पाखरं मिळाली… पण इथे थोडे कष्ट घ्यावे लागतात… उद्या मी थोडं दुसरीकडे जाऊन काही वेगळं मिळतंय का पाहतो…. आज हे झालं… अमुक आणि तमुक….’ जणू काही कामावरून दमून आल्यावर थोडावेळ शांत बसून आपण आपल्या जोडीदाराशी गप्पा मारतो, त्यांना संपूर्ण दिवसभरात काय घडलं ते सांगतो तसच काहीसं त्यांचंही सुरू होतं.


या सगळ्यामध्ये मला एक गोष्ट मात्र उमगली की आपण माणसे उगाच स्वतःला ग्रेट वगैरे समजतो. सर्वांत जास्त बुद्धिमान आणि ग्रेट कुणी असेल तर तो निसर्ग. कारण ह्या सगळ्या सजीव सृष्टीच्या जीवनपटाचा दिग्दर्शक आणि प्रोड्युसर तोच आहे. आपण फक्त पात्र आहोत ज्यांच्याकडून तो त्याच्या इच्छेप्रमाणे अभिनय करवून घेतो.
Also Read
नवरात्रीत देवीने मारलेले राक्षस
नवरात्रीमधील देवीची नऊ रूपे (Nine forms of Devi – Nav durga)
हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने दह्याचे विरजण लावता येते?
गौरीं-गणपतीमध्ये गौरीच्या दोन मूर्त्यांचे पूजन का करतात??
अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती
Follow PRATILIKHIT

No Comment