मराठीचा मानापमान

मराठीचा मानापमान

मराठीचा मानापमान

सध्या सोशल मिडियावर मराठी भाषा आणि मराठी भाषिकांना खूप मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. महाराष्ट्रात मराठी भाषा टिकावी म्हणून प्रयत्न करणाऱ्यांना चक्क आतंकवादी म्हटलं जातंय. छत्रपती शिवाजी महाराजांचे दाखले देऊन यांच्या पूर्वजांनी जे काही कमावलं ते यांनी गमावलं, मराठी मेरे घंटे से वगैरे वगैरे गोष्टी बोलल्या जातायत. पण मराठी माणूस त्याची भाषा टिकावी म्हणून का प्रयत्न करतोय? का हिंदीने मराठी भाषेला गिळंकृत करू नये म्हणून तो पोटतिडकीने भांडतोय?

सगळ्यात आधी हिंदी ही भारत देशाची राष्ट्रभाषा आहे असं छातीठोकपणे सांगणाऱ्यांनी त्यांच्या शाळेची सगळी फी परत मागून घ्या. देशाचा राष्ट्रीय पक्षी, प्राणी, गीत हे सगळं शिकवताना भारताला अधिकृत राष्ट्रीय भाषा नाही हे सांगण्यासाठी सगळ्या शाळा विसारल्यात की काय?

तसा प्रांतवाद, भाषावाद हा काही देशासाठी नवीन नाही. त्यात राजकीय पक्षांनी उडी घेतल्यामुळे त्याला वेगळा रंग जरी प्राप्त झाला असेल तरीही मराठी भाषेसाठीचा संघर्ष अत्यंत जुना आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या चळवळीबद्दल सगळ्यांनाच माहीत आहे आणि ज्यांना माहीत आहे त्यासाठी गुगल उपलब्ध असल्याने मी त्या विषयात जास्त खोल जाणार नाही. परंतु ह्या चळवळीअंतर्गत भारताची आर्थिक राजधानी असलेली आणि महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असलेली मुंबई महाराष्ट्रातच राहावी यासाठी १०७ जणांनी आपलं रक्त सांडलंय आणि याशिवाय तेव्हा गुजरातला जवळपास ६० कोटी ६६ लाख रुपये मोजून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली होती.

माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

या संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या पंक्ती खूप काही सांगून जातात. आणि आता तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे मग का आम्ही आमच्याच राज्यात मराठीचा हट्ट करू नये?
भांडणं लावण्यासाठी मिडिया काहीही दाखवत असली तरीही सत्य हेच आहे की आमचा हिंदीला विरोध नाहीये पण मराठीसाठी आग्रह आहे. सर्वसामान्य मराठी माणसाची आधीपासून हीच भूमिका होती आणि तीच कायम राहील.

बाहेरच्या राज्यातून परप्रांतीय लोकं महाराष्ट्रात नोकरी धंद्यासाठी, व्यापारासाठी येतात याचा अर्थ ते मुंबईला पोसतात, महाराष्ट्र चालवतात असा होत नाही ना. तुमच्या राज्यात तुम्हाला व्यापाराची, नोकरीची संधी उपलब्ध नाही म्हणून तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी, तुमचं घर चालवण्यासाठी महाराष्ट्रात येता. महाराष्ट्र तुम्हाला पोसतो, तुम्ही महाराष्ट्राला नाही हे तुम्ही कायम लक्षात ठेवायला हवं. आज जी युनिटी व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून दाखवली तीच युनिटी तुमच्या राज्यात जाऊन तिथे व्यापार करण्यासाठी वापरावी. मुंबईची लोकसंख्या तरी कमी होईल आणि इथला मराठी माणूस स्वतः व्यापार करू शकेल. आज राजस्थानी, मारवाडी, गुजराथी, शेट्टी लोकांच्या व्यापारातल्या लॉब्या कुणाला माहितीच नाही असा विचार करू नका. तुमच्या व्यतिरिक्त मराठी माणूस धंद्यात उतरला तर तुमची लॉबी त्याला कशी वेगळं पाडून संपवते हे आख्ख्या मुंबईला माहीत आहे. पण काय आहे ना, या बाबतीत आम्हीच दुर्दैवी आहोत. आमच्याच जुन्या नेत्यांनी, स्थानिकांनी थोड्या पैशांच्या लोभापायी तुम्हाला इकडे राहण्यासाठी चटई दिली आणि तुमचे पाय कधी या चटईच्या बाहेर पसरले गेले हे कुणालाच कळलं नाही.

आज ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो पोस्ट करून त्याआडून तुम्ही मराठी भाषेवर, मराठी माणसांवर चिखलफेक करता आहात त्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी फारसी भाषेला पर्यायी मराठी शब्द असावे म्हणून राज्यव्यवहार कोष निर्माण केला होता. तत्कालीन प्रशासकीय कामात वापरल्या जाणाऱ्या फारसी शब्दांना समकक्ष मराठी शब्द दिले होते. जर त्यांना त्यांच्या स्वराज्यात मराठी व्यतिरिक्त दुसरी कोणती भाषा आणायची असती तर त्यांनी राज्यव्यवहारकोश का लिहून घेतला असता?

कुणी कितीही काहीही केलं तर आमचा मराठीचा अभिमान, मराठी भाषेवरचं प्रेम कमी होणार नाही आणि आता प्रश्न जर मराठी भाषेच्या अस्तित्वाचा असेल तर तो अजिबातच मागे हटणार नाही. मराठी भाषिकांनी फक्त मराठी भाषेत बोलायला सुरू केल्यावर दैनंदिन व्यवहारात त्यांचं काहीही अडणार नाही परंतु इथे असलेल्या परप्रांतीय लोकांच्या धंद्यावर, व्यापारावर त्याचा परिणाम निश्चितच होईल. यापुढे जर कोणत्याही दुकानात, गाड्यांवर किंवा इतर कोणत्या ठिकाणी कोणतीही वस्तू घेताना आपण मराठीमध्येच बोलावं. जर समोरचा म्हणाला की मला मराठी समजत नाही किंवा येत नाही तर त्याच्याशी वाद न घातला, त्याला मारहाण न करता, त्याला मराठीमध्ये बोलण्याची सक्ती न करता तिथून सरळ निघून दुसऱ्या दुकानात जावं. आपल्याला हवी असलेली वस्तू एकाच दुकानात मिळते असं काही नाही. आपल्या धंद्यावर परिणाम होतो याची जाणीव झाली की तो परप्रांतीय आपसूकच मराठी बोलण्याचा प्रयत्न करेल हे निश्चित.

©प्रतिलिखित

Also Read

नवरात्रीत देवीने मारलेले राक्षस
नवरात्रीमधील देवीची नऊ रूपे (Nine forms of Devi – Nav durga)
हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने दह्याचे विरजण लावता येते?
गौरीं-गणपतीमध्ये गौरीच्या दोन मूर्त्यांचे पूजन का करतात??
अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती
Follow PRATILIKHIT

90680cookie-checkमराठीचा मानापमान

Related Posts

सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्तां हमारा??

सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्तां हमारा??

बुलबुलांचं रुटीन

बुलबुलांचं रुटीन

ये है मुंबई मेरी जान…

ये है मुंबई मेरी जान…

गटारी अमावस्या की गताहारी अमावस्या?

गटारी अमावस्या की गताहारी अमावस्या?

1 Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 238,287 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories