डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

देशातील पहिला सुपर कॉम्पुटर बनवणारी मराठी व्यक्ती (डॉ. विजय पांडुरंग भटकर)

 

विजय पांडुरंग भाटकर

 

एक काळ असा होता जेव्हा भारताकडे सुपर कॉम्पुटर नव्हता. भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी अमेरिकेत जाऊन अमेरिकेकडे सुपर कॉम्प्युटरचे तंत्रज्ञान भारताला द्यावे असा प्रस्ताव मांडला. पण अमेरिकेने ‘सुपर कॉम्प्युटरचे तंत्रज्ञान कुणालाही विकणार नाही’ असे सांगत भारताला तंत्रज्ञान देण्यास साफ नकार दिला. निराश झालेल्या राजीव गांधींना पाहून डॉ. विजय पांडुरंग भाटकर आणि त्यांच्या टीमने राजीव गांधींना आश्वासन दिले भारत स्वतःचा सुपर कॉम्पुटर तयार करेल. आणि त्यांनतर भारतीय संगणक तंत्रज्ञांच्या साहाय्याने त्यांनी भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर PARAM ८०००ची निर्मिती करून विश्वाला भारतीय देखील संगणक क्षेत्रात मागे नाही हे १९८० च्या सुमारास दाखवुन दिले. परम हा संस्कृत शब्द “सर्वोच्च” असा आहे आणि “समांतर यंत्र” देखील आहे. हा संगणक प्रति सेकंद एक अब्ज गणिते करू शकतो. अंतराळ संशोधन, भूगर्भातील हालचाली, तेलसाठे संशोधन, वैद्यकीय हवामान, अभियांत्रिकी, लष्करी अशा अनेक क्षेत्रांसाठी हा संगणक उपयोगी पडतो. विकसनशील देशातील असा हा एकमेव संगणक आहे. एवढ्या क्षमतेचा संगणक अमेरिका आणि जपान सोडता फक्त भारतात आहे. PARAM मालिकेनंतर त्यांनी NPSF किंवा राष्ट्रीय परम सुपरकॉम्प्युटिंग सुविधा देखील तयार केली .

2021 च्या अखेरीस, PARAM ही मालिका 5.267 च्या Rpeak सह सर्वात वेगवान मशीन होती. PARAM मालिकेतील नवीनतम सुपर कॉम्प्युटर, PARAM Siddhi-AI, 2021 मध्ये लाँच करण्यात आला. ही एक उच्च-कार्यक्षमता संगणन (HPC) प्रणाली आहे जी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग (ML) आणि डीप लर्निंग (DL) अनुप्रयोगांमध्ये प्रगत संशोधन आणि विकास सक्षम करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.

 

PARAM 10000

 

डॉ. विजय पांडुरंग भटकर यांची कामगिरी 

डॉ.विजय पांडुरंग भटकर यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील मुरांबा येथे झाला. विजय भटकर यांचं संपूर्ण शिक्षण हे मराठी माध्यमातून झालेलं आहे. त्यांना माहिती तंत्रज्ञानातील अग्रगण्य संशोधक, नवनिर्माणक्षम उद्योजक व देदीप्यमान नेतृत्वगुण लाभलेला वैज्ञानिक म्हणून ओळखतात. त्यांनी नागपूर विद्यापीठाची बी.ई. ही पदवी १९६५ साली संपादन केली. बडोद्याच्या एम.एस. विद्यापीठातून १९६९ साली त्यांनी एम.ई. पदवी प्राप्त केली. पुढे १९७० साली आय.आय.टी., दिल्ली येथून ते पीएच.डी. झाले.

त्यानंतर अमेरिकेतील लेहाय विद्यापीठात प्रोफेसर डी.जी.बी. एडलेन यांच्याबरोबर त्यांनी माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन केले. नॉनलोकल सिस्टिम, मॉडेलिंग, सिम्युलेशन आणि ऑप्टिमल कंट्रोल अशा विविध क्षेत्रांत त्यांनी संशोधन केले. मायदेशी परतल्यावर भारताच्या इलेक्ट्रॉनिक आयोगाच्या प्रमुख सदस्यांपैकी ते एक होते. त्यांनी भारतीय उद्योगक्षेत्रात प्रक्रिया आणि उत्पादन यंत्रणेत स्वयंचलित पद्धती उभी करण्यासाठी ‘अप्रोप्रिएट ऑटोमेशन प्रमोशन प्रयोगशाळा’ (ए.ए.पी.एल.) स्थापन केली. त्यामुळे भारतीय उद्योगात पूर्वी असलेल्या न्युमॅट्रिक नियंत्रणपद्धतीची जागा आधुनिक संगणक नियंत्रणपद्धतीने घेतली. ही फार मोठी क्रांती म्हणावी लागेल. त्रिवेंद्रमच्या इलेक्ट्रॉनिक संशोधन व विकास केंद्र आणि केल्ट्रॉनचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. मायक्रोप्रोसेसरचा वापर करून सीटीव्ही, वाहतूक नियंत्रण पद्धती, डिफेन्स सिम्युलेशन, कोलकाता मेट्रोची स्वयंचलित यंत्रणा, अशा कितीतरी गोष्टींची भारतात प्रथमच मुहूर्तमेढ रोवण्याचे श्रेय भटकर यांना जाते.

१९८०च्या दशकात हवामानाच्या अंदाजाची अचूकता वाढवण्यासाठी भारताला महासंगणकाची गरज होती. परंतु त्यासाठी क्रे कंपनीचा महासंगणक आपल्याला विकण्याचे अमेरिकेने नाकारले. त्यावर तोडगा म्हणून भारताने महासंगणकाचे तंत्रज्ञान विकसित करायला हवे, असे मत तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी शास्त्रज्ञांसमोर मांडले. सॅम पित्रोदा यांच्या अध्यक्षतेखालील या प्रकल्पाची कार्यवाही भटकर यांच्यावर सोपवण्यात आली. १९८७ सालच्या डिसेंबर महिन्यात महासंगणक बनविण्याच्या कामाचा आराखडा तयार झाला. लगेचच यासाठी एका संस्थेची स्थापना झाली. ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‍ॅडव्हान्स कॉम्प्यूटिंग’ (सी-डॅक) या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. तो दिवस होता १९८८ सालचा गुढीपाडवा. जुलै १९८८ मध्ये ‘सी डॅक’ने ‘परम महासंगणका’चे आपले पहिले लक्ष्य निश्चित केले. हे लक्ष्य जुलै १९९१पर्यंत पार करायचे होते. त्यासाठी ३७.५ कोटी रुपयांची तरतूद होती. विशेष म्हणजे, पहिला ‘परम महासंगणक’ सी-डॅकने ३० कोटी रुपयांपेक्षाही कमी खर्चात तयार केला. १५ ऑगस्ट १९९१ या दिवशी ‘परम – ८०००’ तयार झाल्याची अधिकृत घोषणा केली गेली. या पहिल्या महासंगणकाची क्षमता दर सेकंदाला १ अब्ज गणिती क्रिया करण्याची होती. सप्टेंबर १९९३ मध्ये ‘परम – १०,०००’च्या कामाला सुरुवात झाली.

१९९७ साली ‘परम – १०,०००’ यशस्विरीत्या कार्यरत झाला. या महासंगणकामुळे भारताला हवामानविषयक अंदाज आता बरेच आधी व अचूक वर्तविता येऊ लागले. उपग्रह प्रक्षेपण, रॉकेट प्रक्षेपण, खनिज तेलाचे संशोधन, वैद्यक क्षेत्र, देशातील सरकारी कामांत सुसूत्रता, शेअर बाजार, संरक्षण, अणुतंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांत ‘परम – १०,०००’ ने क्रांती केली. ‘परम – १०,०००’ ची क्षमता दर सेकंदाला १ लाख कोटी (१०००,०००,०००,०००) गणिती क्रिया करण्याची आहे. याला शंभर गीगा फ्लॉप (१०० जी.एफ.) असे शास्त्रीय नाव आहे.

१९८९ साली सी-डॅकने ‘जिस्ट’ ही संगणकीय आज्ञाप्रणाली (ग्रफिक्स अ‍ॅन्ड इंटेलिजन्स बेस्ड स्क्रिप्ट टेक्नॉलॉजी) तयार केली. या ‘जिस्ट’ने भारतीय उपखंडात संगणक क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती केली. आजवर इंग्रजीची मक्तेदारी असलेल्या संगणकावर जिस्टमुळे कोणत्याही भारतीय भाषेचा उपयोग करणे सहज शक्य झाले.

डॉ. भटकर ही व्यक्ती न राहता अनेक संस्थांचा एक समुच्चय बनली. त्यांनी ‘इटीएच’ संशोधन प्रयोगशाळा, डिशनेट, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, मस्टव्हर्सिटी प्रा. लि., नॉलेज आय.टी., डिव्हिनेट अ‍ॅक्सेस टेक्नॉलॉजी, सी-डॅक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (केरळ), टेक्नोपार्क (त्रिवेंद्रम), इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर, केरला स्टेट इलेक्ट्रॉनिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (केल्ट्रॉन), अप्रोप्रिएट ऑटोमेशन प्रमोशन प्रयोगशाळा, अशा विविध संस्था उभ्या केल्या.

‘पद्मभूषण पुरस्कार’, ‘पद्मश्री पुरस्कार’, ‘डेटाक्वेस्ट जीवनगौरव पुरस्कार’, ‘विश्वेश्वरय्या स्मृती पुरस्कार’, ‘पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अवॉर्ड’, ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. १९९९ साली फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे दिले जाणारे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील गुणवत्ता पारितोषिक (‘एक्सलन्स अवॉर्ड’) त्यांना प्रदान करण्यात आले आहे. उत्कृष्ट संशोधनासाठी १९९८ साली दुबई, इंटरनेट सिटीतर्फे दिला जाणारा ‘इ-बिझ इनोव्हेशन कॉन्टेस्ट अवॉर्ड’ हा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. विज्ञान व तंत्रज्ञानातील ‘एच.के. फिरोदिया पुरस्कार’ही हा जीवनगौरव त्यांना प्राप्त झाला आहे. दिल्ली आय.आय.टी.च्या १९९४ सालच्या ‘डिस्टिंग्विश्ड अ‍ॅलुमनी अवॉर्ड’ने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनन्ट इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे दिला जाणारा १९९२ सालचा ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन ऑफ द इयर’ हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

डॉ. भटकरांनी आठ पुस्तके संपादित केली असून ८० शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. ‘सुपर कॉम्प्यूटिंग’, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’, ‘डिस्ट्रिब्युटेड कॉम्प्युटर कन्ट्रोल’, ‘व्हेरिएशनल थियरी’ हे त्यांच्या शोधनिबंधांचे विषय आहेत.

कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया; भारतीय राष्ट्रीय अभियांत्रिकी अकादमी, दिल्ली; महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स, पुणे; इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स, दिल्ली या विविध संस्थांचे ते फेलो आहेत. ते न्यूयॉर्क अकॅडमी ऑफ सायन्स, न्यूयॉर्कचे सदस्य आहेत. ‘आपण ज्ञाननिष्ठ संस्कृतीचेच वारसदार आहोत. परंतु आपल्याला खरीखुरी ज्ञाननिष्ठ संस्कृती पुनश्च प्रस्थापित करायची आहे; माहिती तंत्रज्ञान हा या वाटचालीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे’, ही डॉ. भटकरांची धारणा आहे.

२०११ आणि २०१४ मध्ये त्यांना डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटी आणि गुजरात टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी यांच्याकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. तर नागपूर विद्यापीठाने त्यांना डी.लिट. पदवी प्रदान केली.

विजय_पांडुरंग_भटकर

Also Read 
भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?
माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams
वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

 

 ‘इटीएच’ संशोधन प्रयोगशाळा, डिशनेट, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, मस्टव्हर्सिटी प्रा. लि., नॉलेज आय.टी., डिव्हिनेट अ‍ॅक्सेस टेक्नॉलॉजी, सी-डॅक, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (केरळ), टेक्नोपार्क (त्रिवेंद्रम), इलेक्ट्रॉनिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर, केरला स्टेट इलेक्ट्रॉनिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (केल्ट्रॉन), अप्रोप्रिएट ऑटोमेशन प्रमोशन प्रयोगशाळा

49220cookie-checkडॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

Related Posts

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 123,027 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories