
दसऱ्याला रावण दहन का करतात ?
दसऱ्याला रावण दहन का करतात ?
दसऱ्याला रावण दहन का करतात ?
शारदीय नवरात्रीनंतर दशमी तिथीला दसरा म्हणजेच विजयादशमी साजरी केली जाते. या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याची प्रथा आहे. धार्मिक मान्यतांनुसार, याच दिवशी देवी दुर्गाने महिषासुर राक्षसाचा वध केला होता. दसऱ्याच्या दिवशी कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. या दिवशी लोक नवीन वस्तूंची खरेदी करतात, तसेच दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करणे शुभ मानले जाते
रावण वध म्हणजेच सत्याचा असत्यावर विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय असल्याचे प्रतिक मानले जाते. प्रभू श्रीरामाने लंका नरेश रावणाचा पराभव करून त्याच्या कैदेतून सितामाईची सुटका केली होती.
रावण तपस्वी, सर्व अस्त्र -शस्त्रात पारंगत असलेला सोन्याच्या लंकेचा सम्राट होता. शेवटी त्याचा विनाश का झाला? सितामाईचे अपहरण, रामाशी वैर पत्करल्याने किंवा अहंकाराच्या आहारी गेल्याने हेच त्यामागचे एकमेव कारण होते? रावण प्रचंड विद्वान होता तसेच राजधर्म जाणकार होता. रामाने लक्ष्मणाला मृत्यू-शैय्येवर पडलेल्या रावणाजवळ राजधर्माचे रहस्य जाणून घेण्यासाठी पाठविले होते. तेव्हा रावण म्हणाला ‘मी आयुष्यात सर्वात मोठी चूक केली आहे. माझ्या तीन योजना होत्या. स्वर्गापर्यंत जाणारी शिडी तयार करणे, समुद्राचे खारे पाणी गोड करणे आणि सोने सुगंधी करणे. या तिन्ही योजनांबाबत मी कालपर्यंत टाळाटाळ केली आणि सितेच्या अपहरणाचे चुकीचे काम केले’. राम अवतार आहे का नाही याबाबत रावण साशंक होता. जर राम अवतार आहे तर तो सीतेची सुटका करेल नाहीतर मी तिला माझा पट्टराणी करील. शेवटच्या क्षणी त्याने सांगितले की, राम मी तुझ्याकडून हरूनही जिंकलो आहे. शेवटच्या क्षणी तू माझ्यासमोर उभा आहेस, यासाठी मुक्ती मिळवण्याचा मला अधिकार आहे.
दशमीलाच माता दुर्गेने महिषासुराचा वध केला होता, म्हणून ती विजयादशमी म्हणून साजरी केली जाते. रावण दहन देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी होते आणि प्रत्येक ठिकाणच्या परंपरा पूर्णपणे वेगळ्या असतात. या दिवशी शस्त्रांचीही पूजा केली जाते. या दिवशी शमीच्या झाडाचीही पूजा केली जाते. या दिवशी वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने, दागिने, नवीन कपडे इत्यादी खरेदी करणे शुभ असते.
दसऱ्याला आपट्याची पाने का वाटली जातात?
फार वर्षांपूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांच्याकडे विद्याभ्यासासाठी खूप विद्यार्थी येत. अभ्यास करून मोठे होत. त्या वेळी मानधन किंवा फी नव्हती, त्यामुळे शिक्षण संपल्यावर विद्यार्थी गुरुदक्षिणा देत. या ऋषींकडे ‘कौत्स’ नावाचा एक शिष्य होता. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरूंनी त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. त्याने ऋषींना विचारले कि, ‘मी तुम्हाला गुरुदक्षिणा काय देऊ? तुम्ही मागाल ते मी देईन.’ ऋषींनी कौत्साची परीक्षा घ्यायचे ठरविले. त्यांनी कौत्साला प्रत्येक विद्येबद्दल एक कोटी सुवर्णमुद्रा, याप्रमाणे १४ विद्यांबद्दल १४ कोटी सुवर्णमुद्रा आणावयास सांगितल्या.
कौत्स हे ऐकून गांगरून गेला. तो रघुराजाकडे गेला परंतु राजाने त्याच वेळी विश्वजित यज्ञ केल्यामुळे खजिना संपला होता, तरीसुद्धा राजाने कौत्साकडे तीन दिवसांची मुदत मागितली आणि त्याने इंद्रावर स्वारी करण्याचे निश्चित केले. इंद्राला रघुराजाचा पराक्रम माहित होता. त्याने कुबेराला सारी हकीकत सांगितली. इंद्राने आपट्याच्या पानांची, सोन्याची नाणी बनवून, ती पावसासारखी राजाच्या राजवाड्यात पाडली.
कौत्स त्या सुवर्णमुद्रा घेऊन, वरतंतू ऋषींकडे गेला व गुरुदक्षिणा घेण्याची विनंती केली. परंतु ऋषींनी त्यापैकी चौदा कोटीच मुद्रा स्विकार केल्या. उरलेल्या सुवर्णमुद्रा परत घेण्यास राजाने नकार दिल्यामुळे कौत्साने त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवून, लोकांना लुटायला सांगितल्या. लोकांनी त्या वृक्षाची पूजा केली व पाहिजे तेवढ्या मुद्रा लुटल्या. तो दिवस दसऱ्याचा होता. म्हणून त्या दिवसापासून त्या झाडाची पूजा करून सोन्याची पाने लुटण्याची प्रथा सुरु झाली.
दसऱ्याचे महत्व
हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच ‘दसरा’, याच सणाला ‘विजयादशमी’ असेही म्हणतात.
‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’, या ओळीतच या सणाची महती गौरविलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा सण आहे. या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात. या दिवशी सरस्वतीपूजन आणि शस्त्रपूजन केले जाते.
दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. याच दिवशी देवीने महिषासूर या राक्षसाचा वध केला. प्रभू रामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले. पांडव अज्ञातवासात राहण्याकरिता ज्या वेळी विराटच्या घरी गेले, त्या वेळी त्यांनी आपली शास्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली, तो हाच दिवस.
शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला. पेशवाईतसुद्धा या सणाचे महत्व मोठे होते. बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत कायम करीत. अनेक शूर, पराक्रमी राजे याच दिवशी दुसऱ्या राजावर स्वारी करण्यास जात असत. या दिवशी सीमोल्लंघन करण्याची प्रथा आहे. दसरा म्हणजेच विजयादशमी. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. विजयादशमी म्हणजे हमखास विजय मिळवून देणारा दिवस.
‘साधुसंत येता घरा, तोचि दिवाळी-दसरा!’, या तुकाराम महाराजांच्या उक्तीत दोन सणांचा अजोड असा उल्लेख केला आहे व तो सर्वतोपरी योग्य आहे याची प्रचिती आपल्याला दसऱ्याच्या दिवशी येते.
दसऱ्याला रावण दहन का करतात?
दसऱ्याला केली जाते रावणाची पूजा; कुठे आहेत ही मंदिरं?
बिसरख रावण मंदिर :
दिल्ली एनसीआर अंतर्गत येणाऱ्या ग्रेटर नोयडा क्षेत्रामध्ये बिसरख नावाचे गाव आहे. या गावाला रावणाचे जन्मठिकाण मानले जाते. या गावामध्ये रावणाचे मंदिर आहे, ज्यामध्ये ४२ फुट उंच शिवलिंग आणि ५.५ फुट उंच रावणाची मुर्ती आहे. येथे रावणाला ‘महाब्रम्ह’चे स्थान असून दसऱ्याला ‘महाब्रम्ह’साठी दुख व्यक्त करण्याची परंपरा आहे. बिरसख गावात रामलीलामध्ये रावण दहन केले जात नाही. येथील लोक दसरा साजरा करत नाही कारण त्यादिवशी प्रभु रामां यांनी रावणाचा वध केला होता. माहितीनुसार, उत्तरप्रदेशमध्ये गौतमबुध्द नगर जिल्ह्यामध्ये हे गाव आहे. गावाचे नाव रावणाचे पिता विश्रवा यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे असे म्हणतात. विश्रवा यांना जंगलात सापडलेल्या एक शिवलिंगाची स्थापना करून त्यानी मंदिर उभारले होते असे सांगितले जाते.
रावण मंदिर जोधपूर, राजस्थान :
जोधपुरमध्ये राहणारे मुद्गल ब्राह्मणांना रावणाचे वंशज मानले जाते आणि त्यांना आपल्या राजासाठी एक भव्य मंदिराचा निर्माण केला आहे. मंदिराचा पाया रावणाच्या मूर्तींनी सुशोभित केलेला आहे आणि वर रावणाचे भव्य मंदिर बांधले आहे. जोधपूर शहर हे रावणाची पत्नी मंदोदरीचे मुळ गाव मानले जाते. मंदोदरी ही मंडोरमध्ये राहत होती जी जोधपूरची प्राचीन राजधानी होती असे मानले जाते. ‘छवरी”नावाची छत्री अजूनही तिथे आहे. रावण मंदिर शहरातील चांदपोल भागात महादेव अमरनाथ आणि नवग्रह मंदिरांच्या परिसरात आहे जिथे रावणाचे आराध्य दैवत शंकर आणि देवी खुराना यांच्याही मुर्त्या स्थापण केल्या आहेत.
काकीनाडा रावण मंदिर, आंध्रप्रदेश :
काकीनाडा हे आंध्र प्रदेशातील एक शहऱ आहे आणि सोबतच एक आंध्र प्रदेशातील एकमेव ठिकाण आहे जिथे रावणाची पूजा केली जाते. रावणाच्या चित्रांना काकीनाडामध्ये भव्य शिवलिंगाजवळ भगवान शंकरासोबत स्थापण केले आहे. काकीनाडा हे देशातील त्या निवडक ठिकाणांपैकी आहे जिथे रावणाची पूजा केली जाते. हे ठिकाण समुद्राच्या किनाऱ्यापासून जवळ असून शहराच्या बरोबर मध्यभागी आहे. मंदिराच्या द्वारावर रावणची १० डोकी असलेली मोठी मुर्ती निर्माण केली आहे. हे ठिकाण अद्वितीय ठिकाणांपैकी एक आहे. मंदिरामध्ये भगवान शंकराची मुर्त्या आणि शिवलिंगाची स्थापना केली आहे.
दशानन रावण मंदिर, कानपुर :
कानपुरमध्ये दशानन मंदिरामध्ये लोक रावणाची पूजा करतात. रावणाचे मंदिर शहरातील शिवाला परिसरात उभारेल्या शिव मंदिराच्या बाजुलाच उभारले आहे. हे मंदिर वर्षात फक्त एकच दिवस दसराच्या सणाला उलघडले जाते. जे लोक रावणाला उच्चशिक्षित मानतात ते मंदिराला भेट देतात आणि पूजा करतात. प्रभू श्रीराम स्वत: रावणाच्या ज्ञानाचा सन्मान करत असे. रावणाला सर्व हिंदुधर्मग्रंथाचे ज्ञान होते, असेही म्हटले जाते भाविक या मंदिराला भेट देवून रावणाला श्रध्दांजली अर्पित करतात. या मदिरांची पायाभरणी १८६८ मध्ये करण्यात आली होती.
रावण रुंडी, मध्यप्रदेश :
मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्हामध्ये रावणरुंडी आणि शाजापुर जिल्ह्यामध्ये देखील भदखेडी येथे रावणाची पूजा केली जाते. मदंसौर शहरामध्ये नामदेव वैष्णव समाजातील लोक दसऱ्याच्या दिवशी रावणाची पूजा करतात. रावणाची पत्नी या शहरातील होती असे ते मानतात. त्यामुळे रावणाला या शहाराचा जावाई मानले जाते आणि रावण दहन केले जात नाही. मंदसौर हे खानपूर भागात असून सन २००५ मध्ये ३५ फूट उंच, १० डोकी असलेली रावणाची मुर्ती स्थापण केली होती. त्याआधी रावणाची चुना आणि विटेपासून बनवलेली २५ फुटी उंच मुर्ती स्थापण केली होती जी १९८२ पर्यंत उपलब्ध होती. पण वीज पडल्यामुळे या मुर्तीला तडा गेला आणि ती मुर्ती नष्ट झाली. दसऱ्याला दरवर्षी या भव्य मुर्तीची पूजा केली जाते. या परिसरात महिला दसऱ्यादिवशी पदर घेऊन चेहरा झाकतात कारण त्या रावणाला जावाई मानतात आणि जावयासमोर महिला पदराच्या आडच राहण्याची येथे परंपरा आहे. पुरुष आपल्या इच्छा पुर्ण करण्यासाठी रावणाच्या पुजेदरम्यान कित्येक धार्मिक कार्य करतात. यावेळी रावणासह त्याचा मुलगा मेघनाद याचीही पूजा केली जाते.
बैजनाथ मंदिर, हिमाचल प्रदेश :
हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्हा मुख्यालयपासून जवळपास ६० किमी दू बैजनाथ शहर आहे. येथील रहिवाशी मानतात की, दसरा साजरा करून भगवान शंकरासाठी असलेल्या रावणाच्या भक्तीचा सन्मान करतात. बैजनाथ(४३११फुट) हिमालयातील सुंदर धौलाधार पर्वतांच्या रांगामध्ये वसलेलं छोटं शहर आहे. हे भगवान शंकराचे मंदिरासाठी प्रसिद्ध आहे, जे १३ व्या शतकामध्ये उभारले होते. पौराणिक कथांनुसार, रावण ब्रम्हांडाचे निर्माते भगवान ब्रम्हाचे पुत्र आणि ऋषि विश्रवााचे पुत्र तसेच संपत्तीचा देवता कुबेरचे छोटे भाऊ असे म्हणतात. येथील लोकांचे म्हणणे आहे की, रावण एक विद्वान, कलेचा उपासक आणि भगवान शंकाराचे खास भक्त होता. रावणला विद्वान मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते. त्याची पूजा करणारे लोक ज्याला सर्व वेदांचे ज्ञान होते, भगवान शंकाराचे भक्त होते त्या विद्वान राजाचे दहन करणे योग्य समजत नाही.
Also Read
नवरात्रीमधील देवीची नऊ रूपे (Nine forms of Devi – Nav durga)
हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने दह्याचे विरजण लावता येते?
गौरीं-गणपतीमध्ये गौरीच्या दोन मूर्त्यांचे पूजन का करतात??
अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती
Follow PRATILIKHIT
No Comment