सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्तां हमारा??

सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्ता हमारा…
हो आहेच आमचा भारत सगळ्या जगात महान. आणि आम्हाला भारतीय असल्याचा प्रचंड अभिमान आहे. इतका की कदाचित अमेरिकन लोकांना अमेरिकी असल्याचा आणि रशियन लोकांना रशियन असल्याचाही असणार नाही. पण आता परिस्थिती थोडी बदललीये. म्हणजे देशाबद्दल अभिमान, आस्था आजही तितकीच आहे परंतु उत्साह आधीसारखा राहिला नाही. काळ बदलला तशी माणसाची विचार करायची पद्धत बदलली. आता थोडं धर्म, पक्ष हे सगळे चष्मे बाजूला सारून भारतीय असल्याचा चष्मा घालून देशाकडे बघण्याची गरज आहे.
कारण सध्याची शिकलेली पिढी ही केवळ देशाभिमान, धर्म, पक्ष यात गुरफटून राहणारी नाही. बाहेरच्या देशाचं नाव, स्थान जगाच्या पटलावर कुठेही असलं तरीही आताची पिढी ही फक्त त्या देशावर अवलंबून न राहता त्या देशात मिळत असलेल्या राहणीमानावर विशेष लक्ष देते. आपल्याला निदान बेसिक गोष्टी तरी मिळाव्यात, आपल्याला थोडं शांतपणे जगता यावं यासाठी ती प्रयत्न करते. आणि भारतात त्या गोष्टी मिळत नाही हे लक्षात आल्यावर ती व्यक्ती दुसऱ्या देशाची वाट धरते. यात त्या व्यक्तीचं काही चुकतंय असं नाही कारण प्रत्येकालाच स्वतःचा विकास करण्याचा, स्वतःची आर्थिक परिस्थिती, राहणीमान सुधारण्याचा हक्क आहे आणि जिथे ती संधी मिळते तिथे ती व्यक्ती जाते.
सध्या फक्त भारतच नाही जर जगात आर्थिक महासत्ता असलेले अमेरिका, रशिया, चीन सारखे देशसुद्धा राजकीय महत्वाकांक्षेचे शिकार होत आहेत. देशातील नागरिकांबद्दल थोडाही विचार न करता सगळे नेते स्वतःचे म्हणणे खरे ठरवण्याच्या मागे लागलेले आहेत. यात आपल्या देशातल्या राजकारणाबद्दल तर विचारायलाच नको. आपल्या देशातले मंत्री, अधिकारी यांचे दर दिवसांनी मिडियासमोर चाललेले माकडचाळे बघता हे मंत्री खरंच त्यांना दिलेल्या विभागात काम करतात की त्यांना आपण फक्त एकमेकांना टोमणे मारण्यासाठी, एकमेकांवर टीका करण्यासाठी निवडून दिलंय हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.
आज आपण चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याच्या कितीही बोंबा मारत असलो तरीही खरी परिस्थिती काय हे प्रत्येक सामान्य नागरिकाला माहीत आहे. अजून किती वर्षे आपण लोकसंख्येचं कारण पुढे करून न झालेल्या देशाच्या विकासावर पांघरूण घालणार आहोत? आज देशातल्या नागरिकांना सध्या बेसिक सुविधाही मिळत नाही. देशात खड्डा नाही असा एकही रस्ता नाही, अगदी दोन किलोमीटर जाण्यासाठी सुद्धा पुणे, मुंबई, बंगलोर, हैदराबाद सारख्या मुख्य शहरांमध्ये अर्धा ते एक तास लागतो, रेल्वे ला तुडुंब गर्दी, बस सेवा वेळेवर नाही, बसची अवस्था तर अगदीच बिकट, लोकांना नोकऱ्या नाही, ज्यांना आहेत त्यांना सरकारी नोकरी असल्याने जॉब जाण्याची चिंता नसल्यामुळे कामाचं गांभीर्य नाही, इलेक्ट्रिक गाड्या घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते खरे पण अजून उपनगरात आणि खेड्यांमध्ये साधा धड अखंडित विद्युतपुरवठा नाही. एखादा प्रकल्प आला की आपल्याला काहीतरी खायला मिळावं म्हणून स्थायिक राजकारणी भूमिपुत्रांना चिथावतात आणि मग ते भूमिपुत्र मागचा पुढचा काही विचार न करता प्रकल्पांना विरोध करत बसतात.
आता अमेरिकेने टॅरिफचा खेळ सुरू केल्याने पंतप्रधानांनी पुन्हा एकदा स्वदेशीचा हाक दिली आहे, परदेशात काम करणाऱ्या भारतीयांना पुन्हा भारतात परतण्यासाठी आवाहन केले आहे परंतु ते का येतील? ज्या कारणासाठी ते या देशाबाहेर पडले ते कारण आता नाहीये का? जर सरकार लोकांना राहण्यासाठी चांगलं सुखसोयी देऊ शकत बसेल, प्रचंड प्रमाणात टॅक्स वसूल करूनही जर लोकांना चांगले रस्ते, आरोग्याच्या सोयी इत्यादी देऊ शकत नसेल तर बाहेर गेलेले लोकं परत का येतील?
आपल्या देशात सत्ताधारी पक्ष हा विरोधी पक्षाला दाबायच्या विचारातच मग्न असतो आणि विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाची उणिधुणी काढण्यात आणि त्यांना कायम विरोध करण्यातच व्यस्त असतो. दोन्ही बाजूंनी एकत्र येऊन भारताच्या प्रगतीसाठी काय करता येईल? कोणत्या गोष्टी आपण देशात आपल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी बंद केल्या पाहीजेय याचा जर एकत्रित विचार झाला तर त्याचा देशाला फायदाच होईल नाही का?
©प्रतिलिखित

No Comment