विज्ञान श्रेष्ठ की अध्यात्म ?

विज्ञान श्रेष्ठ की अध्यात्म ?

विज्ञान श्रेष्ठ की अध्यात्म

 

जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं असं म्हणतात. मात्र अनेक विज्ञानवादी माणसे विज्ञानाला सर्वश्रेष्ठ मानताना अध्यात्म मानणाऱ्यांना नावे ठेवताना दिसून येतात. विज्ञान श्रेष्ठ की अध्यात्म हा वादाचा विषयच नसायला हवा कारण अध्यमात गोष्टी आधीपासून आहेत आणि विज्ञान ती गोष्ट का आहे ते सांगतं.

मात्र हिंदू धर्मामध्ये अशा असंख्य रूढी, परंपरा, शास्त्र आहेत ज्यांची उत्तरं देणं विज्ञानालाही अजून जमलेलं नाहीये. हिंदू धर्मातील प्रत्येक गोष्टीच्या मागे एक विशिष्ट कारण आहे. आज आपण त्यातल्याच काही गोष्टींची माहिती घेणार आहोत.

 

१. देव जर चराचरात आहे मग आपण विशिष्ट मूर्तीची पूजा का करतो?

 

विज्ञान श्रेष्ठ की अध्यात्म

 

आपल्या डोळ्यांना जे दिसतं त्यानुसार आपला मेंदू आपल्या मनात विचार उत्पन्न करतो. मानवी मेंदूची रचनाच अशा प्रकारे करण्यात आलेली आहे. त्यामुळे देवाच्या मूर्तीची प्रतिमा आपल्याला नेहमीच एका सकारात्मक ऊर्जेची जाणीव करून देते. उपनिषदामध्येही असे सांगण्यात आलेले आहे की देव सगळीकडे आहे. पण हेही तितकेच खरे आहे की आपण अनेक गोष्टींच्या तुलनेत एकाच गोष्टीकडे जास्त लक्ष केंद्रित करू शकतो. तसेच  ह्या सगळ्या मुर्त्या कोणत्या ना कोणत्या पाषाणापासून बनविलेल्या असल्या तरीही त्यांना पाषाण म्हणता येणार नाही कारण त्या सर्व मूर्तींमध्ये प्राणप्रतिष्ठा केलेली असते. प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी ठराविक मंत्रांचा वापर केला जातो ज्या मार्फत एक वेगळीच सकारात्त्मक ऊर्जा निर्माण होऊन त्या मूर्तीमध्ये चैतन्य निर्माण होते.

विज्ञान श्रेष्ठ की अध्यात्म

२. आपण देवाला केस का अर्पण करतो ?

 

hair donation tiruapti

माणसाच्या डोक्यावरचे केस हे अहंकाराचं किंवा गर्वाचं प्रतीक मानलं जातं. कारण माणसाच्या दिसण्यात केस अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. त्यामुळेच केस गळतीचा त्रास असलेली व्यक्ती बऱ्याचदा नैराश्याने ग्रासलेली असल्याचे आपल्याला दिसून येते. देवाला केस अर्पण करण्याच्याच्या प्रथेमध्ये माणसातल्या गर्वाचा, मी पणाचा त्याग होतो आणि माणूस संपूर्णपणे देवाला शरण जातो असे मानले जाते.

देशातील सर्वात श्रीमंत मंदिर समजल्या जाणाऱ्या आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन  भाविक आपले केस दान करतात.  या परंपरेमागे एक श्रद्धा  अशी आहे की येथे भाविक जेवढे केस दान करतात त्यापेक्षा 10 पटीने जास्त किंमत देव तुम्हाला पैशाच्या रूपात देतो. जो कोणी येथे येऊन केस दान करतो त्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे येथे केवळ पुरुषच नाही तर महिलाही नवस पूर्ण झाल्यानंतर केस दान करतात.

मंदिरात केस दान करण्यामागे आणखी एक कथा आहे.यानुसार प्राचीन काळी एकदा भगवान बालाजीच्या शरीरावर एक डोंगर तयार झाला होता. एक गाय रोज दूध देण्यासाठी या डोंगरावर जायची. मात्र हे पाहून एके दिवशी गाईच्या मालकाला खूप राग आला आणि त्याने गायीच्या डो-क्यावर कु-ऱ्हाडीने वार केले. या प्रहाराने बालाजी ज-खमी झाले आणि त्यांचे डो-क्यावरील अनेक केसही गळून पडले. त्यानंतर तिथे आई नीला देवी यांनी स्वतःचे केस कापून बालाजीच्या ज-खमेवर ठेवले. नीलादेवीने बालाजीच्या ज-खमेवर केस ठेवताच त्यांची ज-खम भरून निघाली पण निलादेवीच्या मस्तकावर जखम झाली.

यावर प्रसन्न होऊन नारायण म्हणाले की, केस हा शरीराच्या सौंदर्याचा सर्वात महत्वाचा भाग आहे आणि देवी तू माझ्यासाठी तुझ्या केसांचा त्याग केला आहेस. त्यामुळे आतापासून जो कोणी माझ्यासाठी केसांचा त्याग करेल, त्याची प्रत्येक इच्छा मी पूर्ण करेन. या श्रद्धेमुळे बालाजीच्या मंदिरात केस दान करण्याची परंपरा आहे. जो कोणी आपली पापे आणि दुष्कृत्ये सोडून इथे केसांच्या रूपात त्यांचा त्याग करतो त्याला देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हणतात.

 

३. बहुतांश मंदिरे ही समुद्रसपाटीपासून उंच जागी का बांधलेली आहेत?

 

आपल्या हिंदू धर्मांतील बरीचशी तीर्थक्षेत्रे ही समुद्रसपाटीपासून खूप उंचावर बांधली गेलेली आहेत. मंदिरांपर्यंत जायला एकतर आपल्याला उंच डोंगर चढून जावं लागतं किंवा लांबच लांब जिने चढावे लागतात.

असे म्हटले जाते की देवाचे दर्शन घेताना आपले सर्व विकार बाजूला सारून निर्मळ मनाने देवाचे दर्शन घ्यावे. जेव्हा आपण देवाचं दर्शन घेण्यासाठी मेहेनत करतो , उंच डोंगर चढून जातो तेव्हा आपल्याला त्या दर्शनाचे महत्व समजून येते. तसेच प्राचीन काळी लोकांच्या व्यायामाचे माध्यम म्हणूनही देवदर्शनाकडे पाहिले जायचे. उंच ठिकाणी भूपृष्ठाच्या तुलनेत इतर माणसांची गर्दी कमी असते, वातावरण शुद्ध असते त्यामुळे मंदिरात गेलेल्या व्यक्तीला मनशांती मिळण्यास मदत होते. तसेच पूर्वी वारंवार येणाऱ्या महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये निवाराच्या सोयीसाठीही मंदिरांचा वापर होत असे. महापूर आल्यावर सर्व नागरिक आपापली घरे सोडून उंच ठिकाणी असलेल्या मंदिरांचा आश्रय घेत. त्यांच्या अन्नपाण्याचीही सोय तिथेच केली जात असे. मंदिरे उंच डोंगरावर असण्याचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे राजे महाराजे परकीय आक्रमणांपासून आपली संपत्ती वाचवण्यासाठी मंदिरांच्या तळघरात लपवून ठेवत असतं.

विज्ञान श्रेष्ठ की अध्यात्म

४. आपण मंदिराभोवती परिक्रमा / प्रदक्षिणा का करतो?

 

 

मंदिराचा परिसर ही भारीत भूमी मानली जाते. तिथल्या वातावरणातील सकारात्मकता आपल्या अंगी उतरावी, म्हणून आपण मंदिरात जातो. देवदर्शन घेतो आणि देह, बुद्धी, चित्त व वाणी यातील विकार दूर होण्यासाठी नामस्मरण करत प्रदक्षिणा घालतो. ही प्रदक्षिणा आपल्या उजव्या बाजूने घातली जाते. मुखाने नामस्मरण सुरू असल्यामुळे चित्त विचलित होत नाही. मंदिराचा सबंध परिसर पायाखालून जातो. त्यामुळे चहुबाजूंनी सकारात्मकता अंगात भिनते. प्रदक्षिणेचे ध्येय समोर असल्यामुळे मनात अन्य विचार येत नाहीत. प्रदक्षिणेमुळे उपचार व उपासना या दोन्ही गोष्टी साध्य होतात.

प्रदक्षिणेचे प्रकार-

देव प्रदक्षिणा : षोडशोपचार पूजेतील पंधरावा उपचार म्हणजे देवप्रदक्षिणा. मंदिरात गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा मंत्र किंवा अन्य स्तोत्र, नामस्मरण घेत प्रदक्षिणा घातली जाते. याला देव प्रदक्षिणा असे म्हटले जाते. बाकी मंदिरात पूर्ण प्रदक्षिणा घालणे शक्य नसले, तर अशावेळी स्वत:भोवती प्रदक्षिणा घातली, तरी चालते.

मंदिर प्रदक्षिणा : मंदिरातील काही देवता दर्शनप्रधान असतात तर काही प्रदक्षिणाप्रधान असतात. देवांचे केवळ दर्शन घेऊन प्रदक्षिणेचा मार्ग गाभाऱ्याभोवती नसून मंदिराभोवती असतो, त्याला मंदिरप्रदक्षिणा म्हणातात.

क्षेत्रप्रदक्षिणा : यामध्ये लघुपरिक्रमा आणि दीर्घ परिक्रमा असे दोन प्रकार असतात. लघुपरिक्रमेत आपल्या परिसरातील, गावातील, शहरातील तीर्थकुंडे, देवस्थाने, क्षेत्रपाल मंदिर आदिंचा समावेश होतो. तर दीर्घपरिक्रमेत पंचक्रोशीतील देवस्थानांचा, तीर्थस्थानांचा समावेश होतो. त्याला क्षेत्रप्रदक्षिणा म्हणतात.

नदी प्रदक्षिणा : नदी प्रदक्षिणा केवळ पायीच करायची असते. नदी परिक्रमेत त्याच नदीत स्नान करणे, नदीचे पाणी पिणे, माधुकरी मागून जेवणे, असे काही नियम पाळावे लागतात. नर्मदा, कृष्णा, गोदावरी, तुंगभद्रा या नद्यांच्या प्रदक्षिणा प्रसिद्ध आहेत.

क्ष प्रदक्षिणा : वृक्षप्रदक्षिणेत प्रामुख्याने वड, अश्वत्थ (पिंपळ), औदुंबर, तुळशी यांना प्रदक्षिणा घालणे पुण्यकारक समजले जाते. तसेच काही ठिकाणी गिरी म्हणजेच पर्वत प्रदक्षिणाही केली जाते.

शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे, की देवाला प्रदक्षिणा घातल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते. यामुळे आपले पाप नष्ट होतात. देवतांच्या कृपेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. आरती, पूजा आणि मंत्र जपाच्या चमत्कारिक प्रभावामुळे मंदिर परिसरात सकारत्मक उर्जा उत्पन्न होत राहते. आपण प्रदक्षिणा घालताना ही सकरात्मक उर्जा आपल्याला जास्त प्रमाणात मिळते, याच कारणामुळे भक्ताला शांती आणि सुखाचा अनुभव होतो. मंदिरातून प्राप्त होणारी सकारत्मक उर्जा आणि दैवी शक्ती आपल्याला चिंतामुक्त करतात. आपले मन देवाच्या भक्तीमध्ये रममाण होते.प्रदक्षिणेच्या माध्यमातून आपण दैवी शक्ती ग्रहण करू शकतो, याच कारणामुळे प्रदक्षिणा घालण्याची प्रथा चालत आली आहे.

महादेवाच्या मंदिरात (Shiv Temple) पूर्ण प्रदक्षिणा घालण्यास मनाई असते. शंकराच्या बहुतेक मंदिरांमध्ये लोकांनी पूर्ण गोल प्रदक्षिणा घालू नये म्हणून परिक्रमा मार्ग मध्येच बंद केलेला असतो. शिवलिंगाची अर्धी परिक्रमा घालण्याचा शास्त्रात नियम आहे. शास्त्रात सांगितलेल्या गोष्टींना अनेक महत्वाची करणं असतात आणि त्याही आधी आपलं म्हणजेच भक्ताचं हित त्यात सामावलेलं असतं. शिवलिंगावर अभिषेक घातला की तो अभिषेक जिथून बाहेर पडतो, त्याला निर्मली किंवा जलधारी किंवा सोमसूत्र असं म्हणतात. त्या सोमसूत्रात काय असतं ? तर तिथे ऊर्जा असते आणि ही ऊर्जा अतिशय गरम आणि शक्तिशाली असते. शिवलिंग (Shivling) हे शिव आणि शक्ती यांचं प्रतिक आहे.

त्या पिंडीला शाळुंकेने धरून ठेवलं आहे. शाळुंका म्हणजे शक्ती, जी अतिशय शक्तिशाली असते आणि जल, दूध किंवा ज्याने अभिषेक घातला आहे, तो अभिषेक जलधारीतून बाहेर पडताना ती ऊर्जा त्यात मिसळून जाते. ही ऊर्जा मानवाच्या शरीरासाठी चांगली नाही. आपण ते सोमसूत्र पायाने ओलांडलं की ही ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर व मनावर होतो अशी मान्यता आहे.

याचा एक श्लोक आहे – ”अर्द्ध सोमसूत्रांतमित्यर्थ: शिव प्रदक्षिणीकुर्वन सोमसूत्र न लंघयेत ।। इति वाचनान्तरात।”

आता हा दोष कुठला आहे, जो सोमसूत्र ओलांडल्याने लागतो ! शरीरावर असा काय परिणाम होतो ? सोमसूत्र ओलांडल्याने वीर्य निर्मितीवर प्रतिकूल परिणाम होतो असे म्हणतात. आपल्या शरीरातील पाच प्रकारच्या वायूंवरही याचा वाईट परिणाम होतो. आपण जांभई देतो, ही कृती देवदत्त वायुमुळे होते तसेच धनंजय वायू, हा वायू आपल्या संपूर्ण शरीरात इकडून तिकडे फिरत असतो, शरीराचे सगळे अवयव नीट काम करावेत या प्रयत्नात हा वायू असतो आणि मृत्युनंतरही हा वायू आपल्या शरीरात त्याचं अस्तित्व राखून असतो; या दोन वायूंच्या प्रवाहात सोमसूत्र ओलांडल्याने अडथळा निर्माण होतो. याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावरही होतो. म्हणून शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा घालायची नाही आणि निर्मली आली की परत फिरायचं. हा नियम आहे.

पण, सोमसूत्रावर जर गवत, पानं, दगड, विटा, लाकूड असं काही ठेवून ती निर्मली झाकून ठेवली असेल तर सोमसूत्र ओलांडण्याचा दोष लागत नाही. पण तरीही ‘शिवस्यार्ध प्रदक्षिणा’ हे म्हटलेलं आहे म्हणजेच शिवाची प्रदक्षिणा ही नेहमी अर्धीच घालावी.

विज्ञान श्रेष्ठ की अध्यात्म

५. सगळ्या मंदिरांमध्ये घंटा का बांधलेली असते?

 

भारतात जितकी हिंदूंची मंदिरे आहेत या सर्व मंदिरांमध्ये घंटा असते. मंदिरात घंटेचे महत्त्व असाधारण आहे. मंदिरात प्रवेश करताना घंटा वाजवण्याची प्रथा आहे. इतकेच नव्हे तर देवाची आरती करतानाही घंटा वाजवली जाते. याशिवाय पूजा पूर्ण झाल्याचे समाधान होत नाही.

ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाजविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद रहाणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्याखाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच,पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने काम करु लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मक विचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.

घंटेच्या आवाजामुळे आपल्याला परमेश्वराची अनुभूती तर होतेच त्याचबरोबर आपल्या शरीरासाठीही ते फायद्याचे आहे. घंटेच्या आवाजाच्या कंपनाचा आपल्या शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. घंटेच्या आवाजामुळे आपल्या डोक्यातील वाईट विचार संपून जातात आणि आपले विचार शुद्ध बनतात..

पुराणानुसार मंदिरात घंटा वाजवल्याने आपले पाप नष्ट होतात. जेंव्हा सृष्टीचा प्रारंभ झाला तेंव्हा जो नाद(आवाज) झाला, तोच स्वर घंटेच्या आवाजातून निघतो. हाच नाद ओंकाराच्या उच्चारणानेही जागृत होतो. घंटेला काळाचे प्रतिक मानले गेले आहे. धर्म पंडितांच्या म्हणण्यानुसार जेंव्हा प्रलयकाळ जवळ येईल तेंव्हाही अशाच प्रकारचा नाद प्रकट होईल. घंटेच्या आवाजामुळे आपल्या डोक्यातील वाईट विचार संपून जातात आणि आपले नकारात्मक विचार शुद्ध बनतात.  ज्या मंदिरात घंटेचा आवाज सतत येत राहतो ते जागृत देवस्थान असते.

जर एखादी व्यक्ती नियमित रुपात आरतीच्यावेळी कोणत्या मंदिरात जात असेल तर निश्चित रुपात त्याची बुध्दी प्रखर होण्याची शक्यता असते. घंटेच्या आवाजातून निघणारा स्वर आपल्या मेंदूत खोलवर परिणाम करतो. घंटेच्या आवाजाने आजुबाजूच्या वातावरणासह आपल्या शरीरातसुध्दा विशेष स्परुपाचे कंपन निर्माण होते. या कंपनामुळे आपल्या शरीरात एक अद्भूत शक्ती प्राप्त होते. मंदिरातील या घंटेचा आवाज नियमित रुपात ऐकला तर या अद्भूत शक्तीने मेंदूची एकाग्रता वाढते, चिंतन करण्याची शक्ती वाढते, नवीन आणि धार्मिक विचार करण्याची शक्ती निर्माण होते, बुध्दीचा विकास होतो, कोणत्याही समस्येवर उत्तर शोधण्यासाठी वेळ लागत नाही.

हवेमध्ये अनेक किटाणू आपल्या शरीरासाठी हनिकारक असतात. मंदिरात एका लयाती वाजणा-या घंटेतून निघणा-या आवाजाने या हानिकारक किटाणूंना नष्ट करतो. सोबतच, या आवाजाने वातावरणील नकारात्मक शक्तीसुध्दा नष्ट होते.
प्राचीन श्रद्धेनुसार असे सांगितले जाते, की नियमीत रुपात आरती केल्याने आणि सतत घंटा वाजवल्याने मंदिरात स्थापित देवी-देवतांच्या मूर्त्या जागृक होतात. त्यामुळे व्यक्तीला तातडीने फळ प्राप्तीची शक्यता असते.

 

६. मनगटावर लाल धागा का बांधला जातो?

 

शास्त्रानुसार कलव बांधण्याची परंपरा देवी लक्ष्मी आणि राजा बळी यांनी सुरु केली होती. देवी महालक्ष्मीचे व्रत करताना व्रताच्या सुरवातीला हा धागा बांधणे अनिवार्य असते. कोणतेही शुभ कार्य करताना ते निर्विघ्नपणे पार पडावे ह्यासाठी हा धागा बांधला जातो. कलवाला रक्षासूत्र असेही म्हणतात, असे मानले जाते की ते मनगटावर बांधल्याने जीवनातील संकटांपासून संरक्षण होते. याचे कारण म्हणजे कलव बांधल्याने ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्रिदेव यांचा आशीर्वाद मिळतो. सनातन परंपरेचे पालन करणारे लोक हातात लाल रंगाचे कलव घालतात. पूजेच्या वेळी लाल किंवा पिवळ्या रंगाचा कलावा हातात बांधला जातो. याशिवाय कोणत्याही शुभ कार्याच्या सुरूवातीस लाल रंगाचा धागाही हाताला बांधला जातो.

धार्मिक महत्त्व असण्याव्यतिरिक्त, कलावा बांधणे वैज्ञानिकदृष्ट्या देखील फायदेशीर आहे. हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.

शरीरविज्ञानानुसार, शरीराच्या अनेक प्रमुख अवयवांपर्यंत पोहोचणाऱ्या नसा मनगटातून जातात. मनगटावर कलावा बांधून या नसांची क्रिया नियंत्रित केली जाते. यामुळे त्रिदोष म्हणजेच वात, पित्त आणि कफ यांचा सुसंगतपणा कायम राहतो.

शरीराच्या संरचनेचे मुख्य नियंत्रण मनगटात आहे. याचा अर्थ असा आहे, की मनगटाला तो धागा बांधल्याने माणूस निरोगी राहतो. कलावा बांधल्याने रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह आणि पक्षाघातासारख्या गंभीर आजारांपासून मोठ्या प्रमाणात संरक्षण मिळते.

विज्ञान श्रेष्ठ की अध्यात्म

७. देवाची आरती का केली जाते?

 

आरतीमध्ये देवतेच्या संपूर्ण मुर्ती किंवा प्रतिमेभोवती दीप ज्योत वारंवार फिरवली जाते, जेणेकरून भक्तांना आरतीच्या प्रकाशात देवतेच्या चमकणाऱ्या अलंकारांचे आणि अवयवांचे प्रत्यक्ष दर्शन होऊन पूर्ण आनंदाची प्राप्ती होईल.

आरती करण्याचे आणखी एक कारण म्हणजे साधक दिव्याच्या ज्योतीने आपल्या आराधनेतून दुदैवाचा नाश करतात. दिवा हे तेजाचे प्रतिक मानले जाते. दिवा लावल्याने पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते. अंधार कितीही गडद असला, तरी एक पणती अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती देते. त्यामुळे दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते. देवाच्या रूपाचे सौंदर्य अतुलनीय आहे. भक्त जेव्हा देवाकडे पाहतो तेव्हा त्याचीही मनोकामना पूर्ण होते. आरतीच्या दिव्याच्या ज्योतीने परमेश्वर सर्व संकटे दूर करण्याचा प्रयत्न करत असतात.

भगवंताच्या आरतीनंतर जेव्हा भाविक दोन्ही हातांनी आरती करतात. त्यातही दोन भाव आहेत, एक म्हणजे ज्या दिव्याच्या ज्योतीने आपल्या आराध्य दैवताच्या प्रतिमेचे इतके सुंदर दर्शन दिले आहे, त्यांना आपण नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतो.

दुसरे म्हणजे, दिव्याच्या आधारे देवाच्या प्रतिमेतून तेजस्वीतता बाहेर पडते. त्यातून आपल्याला आपल्या जीवनातील काळोख दूर होण्यास मदत मिळते आणि एक सकारात्मकता आपल्या अंगी येते.

पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचभूतांपासून हे जग निर्माण झाले आहे, त्यामुळे या पाच गोष्टींचाही आरतीमध्ये समावेश आहे. कापूराचा सुगंध म्हणजे पृथ्वी, पाण्याचा गोड प्रवाह म्हणजे तूप, अग्नी म्हणजे दिव्याची ज्योत, वायूमुळे होणारी ज्योतीची हालचाल, घंटा, शंख, मृदंग इत्यादींचा आवाज आकाश दर्शवतो.

विज्ञान श्रेष्ठ की अध्यात्म

Also Read

नवरात्रीत देवीने मारलेले राक्षस
नवरात्रीमधील देवीची नऊ रूपे (Nine forms of Devi – Nav durga)
हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने दह्याचे विरजण लावता येते?
गौरीं-गणपतीमध्ये गौरीच्या दोन मूर्त्यांचे पूजन का करतात??
अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती
Follow PRATILIKHIT

49930cookie-checkविज्ञान श्रेष्ठ की अध्यात्म ?

Related Posts

हिंदू कालमापन पद्धती आणि कालचक्र

हिंदू कालमापन पद्धती आणि कालचक्र

धनत्रयोदशी सणाची संपूर्ण माहिती आणि महत्त्व Dhanatrayodashi In Marathi

धनत्रयोदशी सणाची संपूर्ण माहिती आणि महत्त्व Dhanatrayodashi In Marathi

का साजरी केली जाते कोजागिरी पौर्णिमा?

का साजरी केली जाते कोजागिरी पौर्णिमा?

देवतांनी दुर्गा मातेला दिलेली अस्त्रे

देवतांनी दुर्गा मातेला दिलेली अस्त्रे

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 123,027 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories