अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती
अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती | ashtavinayak ganpati names and places in marathi
पहिला गणपती – मोरगावचा श्री मयुरेश्वर

अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात ही या मंदिराच्या दर्शनाने केली जाते.
आख्यायिका – आख्यायिकेनुसार मिथिला येथील गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी राज्य करीत होता. तो आणि त्याची राणी उग्रा हे मुल नसल्यामुळे दुःखी होते. त्या दोघांनी सूर्याची उपासना केली आणि आशीर्वाद म्हणून राणीला दिवस गेले. परंतु त्या गर्भाचे तेज आणि प्रभा राणी सहन करू शकली नाही आणि तिने त्या गर्भाला समुद्रात सोडून दिले. त्यातून एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला. ब्राम्हणाच्या रुपात येऊन समुद्राने त्या मुलाला राजाच्या हवाली केले.
समुद्रात जन्म पावल्याने राजाने आपल्या मुलाचे नाव सिंधू ठेवले. सूर्याची उपासना करणारा हा सिंधू जस जसा मोठा होत गेला तसतसा तो अधिकाधिक बलशाली होऊ लागला. सिंधूवर प्रसन्न होऊन सूर्याने त्याला वरदान म्हणून अमृत देऊ केले आणि आशीर्वाद दिला की जोपर्यंत हे अमृत त्याच्या नाभीमध्ये आहे तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही. अमरत्वाचा वर प्राप्त झाल्यावर सिंधूने इंद्र आदि देवांवर आक्रमण केले. त्याने सर्व देवांचा पराभव केला आणि त्यांना आपल्या तुरुंगात डांबले. मग उरलेल्या देवांनी गणपतींची प्रार्थना केली आणि असुर राजा सिंधूपासून त्यांना वाचवण्याची विनंती केली. प्रसन्न होऊन गणपतींनी त्रेतायुगात पार्वतीचा पुत्र म्हणून जन्म घेतला. यासाठी गणपती मयूरावर आरूढ होऊन पृथ्वीवर अवतीर्ण झाले आणि सिंधू राक्षसाला ठार मारले. त्यामुळे गणपतींना येथे मयुरेश्वर असे नाव पडले.
अष्टविनायक मंदिरांमध्ये हे सर्वात महत्वाचे देऊळ असून याला चार प्रवेशद्वार आहेत. प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रत्येक युगातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहे. हे मंदिर उत्तराभिमुख असून त्यास पन्नास फुट उंचीची तटबंदी आहे. मंदिराच्या आवारात दोन दीपमाळा आहेत. मंदिरात प्रवेश करताच सहा फुटी उंच दगडी उंदीर आणि भल्या मोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होते. नंदीचे तोंड गणपतीकडे असून गणपतीसमोर नंदी असणारे हे एकमेव देऊळ आहे. उंदीर आणि नंदी हे मंदिराचे जणू पहारेकरी आहेत. या देवळातील स्वयंभू गणपतीची सोंड ही डावीकडे वळलेली असून गणपतीच्या नाभीत आणि डोळ्यात हिरे जडवलेले आहेत. यामुर्तीवर नागाचे संरक्षक छत्र आहे. मंदिरात रिद्धी (बुद्धी) आणि सिद्धी (क्षमता) यांच्यासुद्धा मूर्ती आहेत.
दुसरा गणपती – सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर, श्री सिद्धिविनायक

आख्यायिकेनुसार जेव्हा ब्रम्हदेवाला सृष्टी निर्माण करायची होती तेव्हा त्याने “ॐ” काराचा अखंड जप केला. त्याच्या या तपस्येने गणपती प्रसन्न झाला आणि त्याने ब्रम्हदेवाला सृष्टी निर्मिती करण्याच्या त्याच्या इच्छेला पुर्णत्वास जाण्याचा वर दिला. आणि गणपतीने ब्रम्हदेवाच्या दोन कन्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला. जेंव्हा ब्रम्हदेव सृष्टी निर्माण करीत होता तेंव्हा भगवान विष्णू हे निद्राधीन झाले. विष्णूच्या कानातून मधु आणि कैतभ हे दैत्य निर्माण झाले. ते देवी-देवतांना छळू लागले. ब्रम्हदेवाच्या लक्षात आले की केवळ विष्णूच या दैत्यांना मारू शकतो, विष्णूने प्रयत्न केले पण तो त्यांना मारू शकला नाही.
विष्णूने प्रयत्नांची शिकस्त केली परंतु तो त्या दैत्यांना मारू शकला नाही. तेव्हा त्याने युद्ध थांबवले आणि गंधर्वाचे रूप धारण करून गायन सुरु केले. शंकराने त्याचे गायन ऐकले आणि त्याला बोलावले, तेव्हा विष्णूने शंकराला दैत्यांबरोबरच्या युद्धाविषयी सांगितले. मग शंकराने त्याला “ॐ गणेशाय नमः” या मंत्राचा जप करावयास सांगितला. हा जप करण्यासाठी विष्णूने सिद्धटेक या ठिकाणाची निवड केली. या डोंगरावर विष्णूने चार दरवाजे असलेले मंदिर उभे केले आणि त्यात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. गणेशाची आराधना केल्यावर विष्णूला सिद्धी प्राप्त झाली आणि त्याने मधु आणि कैतभ या दैत्यांचा संहार केला. कालांतराने विष्णूने उभारलेले मंदिर नष्ट पावले.
दुसऱ्या आख्यायिकेनुसार एका गुराख्याने येथे गणपतीला पाहिले आणि तो गणपतीला पुजू लागला. नंतर इथे पूजा-अर्चा करण्यासाठी त्याला एक पुरोहित मिळाला. अखेरीस पेशव्यांच्या राज्यात इथे पुन्हा मंदिर उभारले गेले. असे मानले जाते की संत श्री मोरया गोसावी आणि खेडचे संत नारायण महाराज यांना या ठिकाणी मुक्ती मिळाली.
सिद्धिविनायक देवळातील मूर्ती ही स्वयंभू असून ती तीन फुट उंच आहे. ही मूर्ती उत्तराभिमुख असून या गणपतीची सोंड ही उजवीकडे आहे. अष्टविनायकांपैकी हा एकच गणपती आहे ज्याची सोंड उजवीकडे आहे. ही गणपतीची स्वयंभू मूर्ती एका पितळेच्या चौकटीत स्थित आहे. गणपतीचे पोट जास्त मोठे नसून मांडीवर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. गणपतीच्या दोन्ही बाजूला जय-विजय यांच्या पितळेच्या मुर्त्या स्थित आहेत. गणपतीची मुद्रा अतिशय शांत आहे. असे म्हटले जाते की सिद्धिविनायकाच्या पाच प्रदक्षिणा करणे हे अतिशय फलदायक आहे. एक प्रदक्षिणा म्हणजे ५ किमीचा प्रवास कारण ही मूर्ती डोंगराला जोडलेली आहे. एका प्रदक्षिणेला जवळजवळ अर्धा तास लागतो.
तिसरा गणपती – पालीचा श्री बल्लाळेश्वर

श्री बल्लाळेश्वर, पाली आख्यायिकेनुसार ही त्रेता युगातील कथा आहे. पाली या गावी कल्याण नावाचा एक वाणी त्याची पत्नी इंदुमती बरोबर राहत होता. त्यांना बल्लाळ नावाचा एक मुलगा होता. बल्लाळ हा मोठा गणेशभक्त होता.एके दिवशी या मुलांना गावाच्या बाहेर एक भला मोठा धोंडा आढळून आला. बल्लाळाच्या आग्रहामुळे मुळे त्या धोंड्याला गणपती मानून त्याची पूजा करू लागले.
सर्व मुलांचे पालक त्यांच्या परतण्याची वाट बघत होते. जेव्हा मुले परत आली नाहीत तेव्हा सर्व पालक बल्लाळचे वडील कल्याण याच्याकडे गेले आणि त्यांनी बल्लाळाची तक्रार केली. त्यामुळे कल्याण क्रोधीत झाला आणि हातात काठी घेऊन मुलांना शोधायला निघाला. त्याला मुले गणेश पुराण ऐकत असलेली सापडली आणि त्याला त्याचा क्रोध अनावर झाला. संतापाच्या भरात त्याने काठी घेऊन मुलांनी बांधलेले ते छोटेसे देऊळ तोडून टाकले. त्याने बल्लाळाला रक्तबंबाळ होईपर्यंत बदडून काढले. त्याने बल्लाळाला एका झाडाला बांधून ठेवले आणि पूजेचे सर्व साहित्य त्याने फेकून दिले. ज्याला मुले गणपती म्हणत होती, ज्याची पूजा करीत होती त्या भल्या मोठ्या धोंड्यालासुद्धा त्याने फेकून दिले.
जरी बल्लाळाला शारीरिक जखमा, तहान आणि भूक याचा त्रास होत होता तरी त्याने त्याची शुद्ध हरपेपर्यंत गणेशजप चालूच ठेवला. त्याची अशी भक्ती बघून गणपती द्रवला आणि तो ब्राम्हणाचा वेश घेऊन बल्लाळाकडे आला.बल्लाळाने ब्राम्हणाच्या वेशात आलेल्या गणपतीला ओळखले आणि त्याने देवाच्या पायावर लोटांगण घातले. बल्लाळाने गणपतीला तिथेच राहण्याची विनंती करत लोकांची दुःखे दूर करण्यास सांगितले. गणपतीने बल्लाळाला आलिंगन दिले आणि तो जवळच्या धोंड्यात लुप्त झाला. त्या धोंड्याला पडलेल्या भेगा नाहीश्या झाल्या आणि तो पुन्हा अखंड झाला. त्या दगडाच्या मूर्तीला आपण बल्लाळेश्वर या नावाने ओळखतो.
एका दगडी सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती स्थित आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची सोंड डावीकडे वळलेली आहे. मूर्तीची पार्श्वभूमी चंदेरी असून त्यावर रिद्धी आणि सिद्धी चामरे धरलेले दिसून येतात. मूर्तीचे डोळे आणि बेंबी हिरेजडीत आहे. ही बल्लाळेश्वराची मूर्ती तीन फुट उंच आहे.हे मंदिर अशाप्रकारे उभारण्यात आले आहे की हिवाळ्यात दक्षिणायनात सुर्याद्याच्या वेळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. मंदिर हे संपूर्णपणे दगडी असून या दगडांना शिश्याच्या रसाने एकमेकांबरोबर चिटकवलेले आहे.साधारणतः गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो परंतु बल्लाळेश्वराच्या मंदिराची ही खासियत आहे की इथे गणपतीला बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो.
चौथा गणपती – महाडचा श्री वरदविनायक

श्री वरदविनायक, महड वरदविनायक या रूंपात हा गणपती सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण करून आशीर्वाद प्रदान करतो. पुणे-मुंबई महामार्गापासून तीन किमी दूर खोपोली जवळ आणि पुण्याहून ८० किमी दूर हे मंदिर मुंबईच्या जवळ स्थित आहे. पालीपासून दोन तासांच्या अंतरावर खोपोलीजवळ इमॅॅजिका मार्गे महामार्गावरून उत्तरेकडे सरळ आणि खोपोलीच्या आधी हे मंदिर वसलेले आहे
आख्यायिकेनुसार कौन्डीन्यपूरचा सम्राट भीम आणि त्याची राणी यांना मूल नव्हते. ऋषी विश्वामित्र हे जंगलात तपस्या करीत होते. त्यांना भेटायला ते दोघे गेले. तेव्हा विश्वामित्र यांनी त्यांना एकाक्षर गणेश मंत्र त्यांना दिला. त्या मंत्राच्या जपामुळे त्यांना रुक्मंद नावाचा सुपुत्र झाला. राजकुमार रुक्मंद लवकरच लहानाचा मोठा झाला.
राजकुमार एकदा शिकारीला जंगलात गेला असता ऋषी वाचक्नवी यांच्या आश्रमात राहिला. तेव्हा ऋषींची पत्नी मुकुंदा राजकुमार रुकंद याच्या प्रेमात पडली. पण राजकुमाराने तिचे प्रेम स्वीकारण्यास नकार दिला आणि तो आश्रम सोडून निघून गेला. मुकुंदा राजकुमारासाठी झुरत असलेली पाहून इंद्राने रुक्मंद याचा वेश धारण केला आणि तो मुकुंदाकडे गेला. त्यातून मुकुंदाला दिवस गेले आणि तिने ग्रीत्सम्द नावाच्या मुलाला जन्म दिला. ग्रीत्सम्द याला जेंव्हा आपल्या जन्माविषयी समजले तेंव्हा तो आपल्या आईला शाप देतो आणि पुष्पक अरण्यात जाऊन तपस्या करू लागतो. त्याच्या तपाने गणपती प्रसन्न होतो आणि त्याला सांगतो की त्याला एक अतिशय धाडसी मुलगा होईल ज्याला केवळ भगवान शंकर हरवू शकतील.
१९८० मध्ये श्री धोंडू पौडकर यांना मूर्ती तळ्यात सापडली होती. ही देवळाच्या गाभाऱ्याच्या बाहेर आहे. मूर्तीची अवस्था एकदम वाईट होती, म्हणूनच देवळाच्या ट्रस्टींनी तिचे विसर्जन केले आणि त्याजागी नवीन मूर्तीची स्थापना केली. काही लोकांनी यावर हरकत घेतली आणि कोर्टात केस दाखल केली. म्हणून आता इथे आपल्याला दोन मुर्त्या दिसतात, एक गाभाऱ्याच्या बाहेर आणि एक गाभाऱ्याच्या आंत. एक मूर्ती आहे जी शेंदुराने माखलेली असून तिची सोंड डावीकडे आहे आणि दुसरी आहे ती शुभ्र संगमरवरी असून तिची सोंड उजवीकडे आहे. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम रिद्धी आणि सिद्धी यांच्या मुर्त्या दिसतात आणि मग गणपतीच्या दोन मुर्त्या. या मुर्त्या पूर्वाभिमुख आहेत. या देवळात एक नंदादीप अखंड तेवत आहे. असे म्हणतात की हा नंदादीप १८९२ पासून अखंड जळतो आहे. मंदिराच्या चारी बाजूला ४ हत्तींचे पुतळे आहेत. मंदिराचा हॉल ८० फुट लांब आणि ८० फुट रुंद असून शिखराची उंची २५ फुट असून ते सोनेरी आहे. शिखरावर नागाची नक्षी आहे.
पाचवा गणपती – थेऊरचा श्री चिंतामणी

आख्यायिकेनुसार राजा अभिजित आणि त्याच्या पत्नीने घोर तप केले आणि गणासूर याला जन्म दिला. जेंव्हा गणासूराने ऋषी कपिला यांच्या आश्रमाला भेट दिली तेंव्हा ऋषींनी त्यांच्या जवळील चिंतामणी रत्नाचा वापर करून गणासूराला उत्तमोत्तम पंचपक्वान्नांचे जेवण खाऊ घातले. गणासूराला त्या चिंतामणी रत्नाचा लोभ सुटला आणि त्याने कपिला ऋषींकडून ते रत्न जबरदस्तीने हिसकावून घेतले. दुर्गा देवीने कपिला ऋषींना गणपतीची मदत घेण्याचा सल्ला दिला.
गणपतीने गणासुराला कदंबवृक्षाखाली पराभूत करून त्याच्याकडून ते मौल्यवान रत्न हस्तगत करून पुन्हा कपिला ऋषींना दिले. याचे बक्षीस म्हणून कपिला ऋषींनी ते रत्न गणपतीच्या गळ्यात घातले आणि तेंव्हापासून गळ्यात चिंतामणी रत्न घातलेला गणपती (Ganapati) चिंतामणी विनायक म्हणून ओळखला जाऊ लागला. ही कथा कदंबवृक्षाखाली घडल्यामुळे थेऊरला ‘कदंबपूर’ असेसुद्धा म्हणतात.
चिंतामणीची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने जडित आहेत. देवळाचे महाद्वार किंवा मुख्यद्वार हे उत्तरेकडे आहे आणि मुळा-मुठा नदीच्या मार्गाला जोडते. मंदिराच्या संकुलाच्या आंत एक छोटे शिवमंदिर आहे.
चिंतामणी हा श्री माधवराव पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत आहे. श्री माधवराव यांनी त्यांचे शेवटचे दिवस या देवळात व्यतीत केले आणि गणपतीचे नांव घेत त्यांनी शेवटचा श्वास सोडला. थेऊर येथे संत मोरया गोसावी यांनी घोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाने प्रसन्न होऊन गणपती नजदीकच्या मुळा-मुठा नदीतून दोन वाघांच्या रूपाने अवतीर्ण झाला आणि त्याने त्यांना सिद्धी प्रदान केली.
पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे. त्यामुळे माधवराव आणि त्यांची पत्नी रामाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त मंदिरात कार्तिक महिन्यात रमा-माधव पुण्योत्सव आयोजित केला जातो.
सहावा गणपती – लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक

लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. ते नाशिक फाटा-चाकण-राजगुरुनगर-नारायणगां
गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीचा अवतार घेऊन गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यासाठी तिने लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर तप केले. भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी देवी पार्वतीने स्वतःच्या अंगाच्या मळापासून मूर्ती बनविली. गणपतीने या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि तो तिच्या समोर सहा हात आणि तीन डोळे असलेला बालक म्हणून प्रविष्ट झाला. असे म्हणतात की गिरिजात्मक या अवतारात गणपती लेण्याद्रीवर १५ वर्षे राहिला. या अवतारात त्याने अनेक दैत्यांचा संहार केला.
या मंदिरापर्यंत पोचण्यास ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. हे मंदिर जरी दक्षिणाभिमुख असले तरी यातील मूर्ती ही उत्तराभिमुख आहे. म्हणजे प्रवेश केल्यावर आपल्याला प्रथम गणपतीच्या पाठीचे दर्शन होते. अशा पाठमोऱ्या मूर्तीचीच पूजा केल्या जाते. देऊळ अशा पद्धतीने बांधले आहे की सूर्य आकाशात असेपर्यंत देवळात उजेड असतो आणि त्यामुळेच या देवळात एकही इलेक्ट्रिक बल्ब नाही. या मूर्तीची सोंड डावीकडे आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला हनुमान आणि शिवशंकर आहेत. मूर्तीची नाभी आणि कपाळ हिरेजडित आहेत. हे मंदिर पूर्णपणे दगडातून कोरून बनविले गेले असल्यामुळे इथे प्रदक्षिणा करता येत नाही. मंदिरासमोर पाण्याची दोन कुंडे आहेत.
असेसुद्धा मानले जाते की पांडवांनी या गुहा त्यांच्या वनवास काळात घडविल्या. इथे मुख्य मंडप असून त्याला सभा मंडप म्हणतात आणि त्याला १८ लहान खोल्या असून यात्रेकरू इथे बसून ध्यान करू शकतात.
इथे भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. बैलगाड्यांची शर्यत हा या उत्सवाचा एक लोकप्रिय भाग आहे. गणेश जयंतीचा उत्सव माघ प्रतिपदा ते माघ षष्टी पर्यंत साजरा केला जातो. या आठवड्यात मंदिरात अखंड हरीनाम साप्ताह आयोजित केला जातो.
सातवा गणपती – ओझरचा श्री विघ्नेश्वर

एकदा अभिनंदन नावाच्या राजाने इंद्रपद मिळविण्यासाठी यज्ञ केला त्यामुळे संतप्त झालेल्या इंद्राने विघ्नासुराला तिथे विध्वंस करण्यास आणि यज्ञ बंद पडण्यासाठी धाडले. विघ्नासुराने यज्ञामध्ये बाधा तर टाकलीच शिवाय त्याने विश्वामध्ये अनेक विघ्ने निर्माण केली. म्हणून मग पृथ्वीतळावरील लोक ब्रम्हदेव आणि शंकर यांच्याकडे गेले. त्या दोघांनी त्यांना गणपतीकडे मदतीची याचना करण्यास सांगितले.
समस्त लोकांनी गणपतीची अराधाना केली आणि त्यांच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन गणपती पराशर ऋषींचा पुत्र म्हणून अवतीर्ण झाला आणि विघ्नासुराबरोबर घनघोर युद्ध करून गणपतीने त्याचा पराभव केला. यामुळे लोक अतिशय आनंदित झाले आणि त्यांनी इथे विघ्नेश्वराची स्थापना केली.
या मंदिराच्या प्रवेशद्वारावर चार द्वारपाल आहेत. पहिल्या आणि चौथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे. गणपती त्याचे माता आणि पिता यांचा अतिशय आदर करतो. या द्वारपालांच्या हातातील शिवलिंग हेच सूचित करते की गणपतीच्या भक्तांनीसुद्धा स्वतःच्या आईवडिलांचा आदर राखला पाहिजे. देवळाच्या भिंतींवर डोळ्यांना सुखावह वाटणारी सुंदर चित्रे आणि शिल्पे आहेत. देऊळ पूर्वाभिमुख असून त्याच्या सभोवती भक्कम दगडी भिंत आहे. मंदिराचे शिखर आणि कळस सोनेरी आहेत. मंदिर २० फुट लांब असून मंदिराचा मुख्य हॉल १० फुट लांब आहे. पूर्वाभिमुख गणपतीची सोंड डावीकडे आहे आणि त्याचे डोळे माणिकाचे आहे. रिद्धी आणि सिद्धी यांच्या मुर्त्या गणपतीच्या आजूबाजूला आहेत. गणपतीच्या मुर्तीच्यावर शेषनाग आणि वास्तुपुरुष आहेत. देवळात लहान लहान खोल्या आहेत. यांना ओवऱ्या म्हणतात. इथे बसून भक्त ध्यान करू शकतात.
भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यात गणेश जयंती यादिवशी उत्सव साजरे केले जातात. कार्तिक पौर्णिमेला दीपमाळांची रोषणाई बघण्यासारखी असते.
आठवा गणपती – रांजणगांवचा श्री महागणपती

आख्यायिकेनुसार ऋषी ग्रीत्समद यांचा मुलगा त्रिपुरासुर हा एक बुद्धिमान बालक होता आणि गणपतीचा निस्सीम भक्त होता. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला त्रिपुराइतका मौल्यवान धातू दिला. हे केवळ शंकरच नष्ट करू शकत होते. अहंकाराने उन्मत्त झालेल्या त्रिपुरासुराने देवांना त्रास देण्यास सुरुवात केली. ब्रम्हदेव आणि विष्णू त्याच्या त्रासाला कंटाळून लपून बसले. तेंव्हा घाबरून दबा धरून बसलेल्या देवांना नारदाने सल्ला दिला की त्यांनी गणपतीची मदत घ्यावी. गणपतीने देवांची मदत करण्यास मान्य केले.
गणपतीने ब्राम्हणाचा वेश धारण केला आणि त्याने त्रिपुरासुराला तीन उडणारी विमाने बनवून देण्याची सबब देत त्याला कैलाश पर्वतावरून चिंतामणीची मूर्ती आणावयास सांगितली. लोभाने आंधळ्या झालेल्या त्रिपुरासुराने कैलासावर आक्रमण केले. शंकर त्याला हरवू शकत नव्हते. शंकराच्या लक्षात आले की त्यांनी गणेश वंदन केले नाही. शंकराने षडाक्षर मंत्र म्हणत गणपतीला आवाहन केले तेंव्हा तेथे गणपती प्रकट झाला आणि त्याने शंकराला त्रिपुरासुराला हरविण्याच्या सूचना सांगितल्या. त्या सूचनांचे पालन करून शंकराने लोभी त्रिपुरासुराला ठार केले आणि त्या जागी महागणपतीचे मंदिर बांधले.
हे पूर्वाभिमुख मंदिर अशा प्रकारे बांधलेले आहे की दक्षिणायनात सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. हा गणपती कमळावर बसलेला असून रिद्धी-सिद्धी त्याच्या सोबत आहेत. हा गणपती स्वयंभू आहे. भक्तांचे असे मानणे आहे की या मूर्तीच्या खाली अजून एक मूर्ती असून असे म्हणतात की त्या मूर्तीला १० सोंडी आणि २० हात आहेत. या मूर्तीला ‘महोत्कट’ म्हणतात. पण ती मूर्ती अस्तित्वात आहे कां याविषयी कोणालाच काही खात्रीशीर माहिती नाही.
हा महागणपती अतिशय शक्तिशाली असून गणेशउत्सवात रांजणगांवचे गावकरी आपापल्या घरी गणपतीच्या मूर्तीची स्थापना करीत नाहीत. तर या देवळात येऊन पूजा आणि प्रार्थना करतात.
ही स्वयंभू मूर्ती पूर्वाभिमुख आहे. गणपती मांडी घालून कमळावर आसनस्थ आहे. त्याचे कपाळ एकदम रुंद असून त्याची सोंड डावीकडे आहे.
भाद्रपद महिन्यात सहा दिवसांचा विशेष उत्सव साजरा केल्या जातो. यामध्ये गणपतीला पाचव्या दिवशी महानैवेद्य दाखविला जातो. या दिवसात फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये गणपतीची मिरवणूक काढली जाते.
अष्टविनायक यात्रा कां करतात?
अष्टविनायक यात्रेकरिता भक्तमंडळी इतकी आतुर कां असतात याचे कारण अतिशय सोपे आहे: ते मानतात की केवळ या आठ मंदिरांना भेट देऊनच गणपतीचे खऱ्या प्रकारे दर्शन घडू येऊ शकते. अशी ही त्यांची गहन श्रद्धा त्यांना या मंदिरांकडे खेचून घेऊन येते. या मंदिरांचे दर्शन घेण्याने त्यांना आनंद तर मिळतोच पण त्याशिवाय एक प्रकारची मानसिक शुद्धतादेखील मिळते. या मंदिरांमध्ये गणपतीचे दर्शन घेण्याने त्यांची गणेशभक्ती अधिक गहिरी आणि अधिक सात्विक होते. शिवाय असे मानले जाते की या सर्व मंदिरातील मुर्त्या या स्वयंभू असून त्यांच्या निर्मितीत मानवी हातांचा स्पर्शसुद्धा झालेला नाही. म्हणूनच या देवळांमध्ये गणपतीचे दर्शन हे त्याच्या सर्वात सात्त्विक अवतारामध्ये मिळते. शिवाय आजकालचे आपले आधुनिक जीवन ताणतणावाचे असते. निसर्गरम्य अशा जागी स्थित असलेल्या या देवळांना भेट दिल्याने मनाला हलके वाटते, शांत वाटते, प्रसन्न वाटते आणि पुन्हा आपली कर्तव्यपूर्ती करण्यासाठी ही यात्रा एक वेगळीच उर्जा प्रदान करते.
अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती
Follow PRATILIKHIT
https://pratikpravinmhatre.com/

5 Comments