
विरुपाक्ष मंदिर
विरुपाक्ष मंदिर माहिती | Virupaksha Temple information in Marathi
विरुपाक्ष मंदिर हे भारतातील प्रसिद्ध ऐतिहासिक मंदिरांपैकी एक मानले जाते. हे मंदिर बंगलोर शहरापासून साधारण ३५० किलोमीटर दूर आहे. विरुपाक्ष मंदिर हे हंपी येथील ऐतिहासिक गोष्टींच्या समूहातील एक मुख्य भाग म्हणूनही ओळखले जाते. विरुपाक्ष मंदिर भगवान विरुपाक्ष आणि त्यांची पत्नी देवी पंपा यांना समर्पित आहे. विरुपाक्ष यांना महादेव शंकराचं रूप मानलं जातं.
ह्या मंदिराचा संबंध भारतीय इतिहासातील प्रसिद्ध अशा विजयनगर साम्राज्याशी सांगितला जातो. तत्कालीन विजयनगर साम्राज्याची राजधानी हंपी येथील तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर ह्या मंदिराची निर्मिती केली गेली. ह्या मंदिराची निर्मिती सातव्या शतकात चालुक्यांनी केली असे उल्लेख आढळतात.
विजयनगरचे गोपुर हे अतिशय भव्य आहे. ९ मजली आणि ५० मीटर उंच असलेले हे गोपुर दुमजली अशा दगडी अधिष्ठानावर आधारलेले आहे. वरच्या ९ मजल्यांच्या बांधकामात विटांचे बांधकाम आहे व त्यावर द्राविडी पद्धतीचा कळस आहे. गोपुराच्या प्रत्येक थरांवर देवदैवतांची शिल्पे, सुरसुंदरी आणि मैथुनशिल्पे देखील आहेत. आजच्या हंपीतील सर्वात प्रमुख वास्तुशिल्प असेल ते हे गोपुर. हे इतके उंच आहे की ते हंपी गावातून कुठूनही नजरेत भरते.
आजही हंपीत सर्वाधिक मंदिरे ही वैष्णव देवतांची आहेत. मंदिराच्या समोरील बाजूस म्हणजेच द्वारातून आल्यावर डाव्या बाजूस तीन शिरे आणि एकच धड असलेल्या नंदीची एक अनोखी मूर्ती आहे. सहसा त्रिमुखी नंदी कुठे दिसत नाही.
कन्नप्पा नयनार हा नयनारांपैकी एक असलेला शिवाचा प्रमुख भक्त. हा एक शिकारी असून शिवलिंगाला शिकार केलेले प्राणी अर्पण करत असे. एकदा शंकराने ह्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. कन्नपा पुजित असलेल्या शिवलिंगाच्या डोळ्यातून रक्त वाहू लागले. शिवाचा डोळा जखमी झालेला असून त्यातून वाहत असलेले रक्त थांबत नाही हे बघून कन्नप्पाने धारदार पात्याने स्वतःचा डोळा काढून शिवलिंगाच्या डोळ्याच्या जागी लावला त्यामुळे त्या डोळ्यातून वाहणारे रक्त थांबले मात्र त्याचवेळी शिवलिंगावरील दुसर्या डोळ्यातूनही रक्त वाहू लागले. हे पाहून कन्नप्पाने आपला दुसरा डोळाही काढण्याचे ठरवले. दोन्ही डोळे गेल्यामुळे शिवलिंगावरील रक्त वाहणार्या दुसर्या डोळ्याची जागा दिसणार नाही हे पाहून त्याने आपला एक पाय लिंगावरील डोळ्याच्या ठिकाणी ठेवला व आपला दुसरा डोळाही काढू लागला. त्याच्या ह्या अपूर्व भक्तीने शंकराने प्रकट होऊन त्याचे दोन्ही डोळे पुनर्स्थापित केले व त्याला आपल्या प्रमुख नयनारांमध्ये स्थान दिले.
Follow PRATILIKHIT
https://pratikpravinmhatre.com/
1 Comment