भगवान शंकरांची बारा ज्योतिर्लिंगे
भगवान शंकरांची बारा ज्योतिर्लिंगे
भगवान शंकरांची बारा ज्योतिर्लिंगे
हिंदू धर्मात या १२ ज्योतिर्लिंगांचे अनन्य साधारण महत्व आहे. एवढेच नाही तर, असे म्हटले जाते की जो कोणी बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतो, त्याला मोठे भाग्य प्राप्त होते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो.
ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्ती विषयी एक आख्यायिका आहे. एकदा भगवान ब्रह्मदेव आणि विष्णू दोघांमध्ये श्रेष्ठ देवता कोण यावर आपापसात चर्चा करुन स्वतःबद्दल महंती सांगत होते.
हा प्रश्न ते भगवान शंकर यांच्याकडे घेऊन गेले. भगवान शंकर यांनी ज्योतीचे रुप धारण केले. त्यांनी भगवान ब्रह्मदेव आणि विष्णू दोघांनाही सांगितले की, या ज्योतीचा आरंभ आणि अंत शोधून दाखवा. जो आरंभ आणि अंत याचा शोध लावेल तो श्रेष्ठ देव होय.
ब्रह्मदेव आणि विष्णू दोघेही या ज्योतीचा आरंभ आणि अंत शोधण्यासाठी प्रयत्न करू लागले. परंतु प्रयत्न करूनही शेवटी त्यांना या ज्योतीचा आरंभ आणि अंत सापडला नाही.
भगवान शंकर यांनी त्यानंतर ही शिवशक्ती ऊर्जा ज्योत १२ वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट केली. याच ठिकाणांचे आज १२ ज्योतिर्लिंग म्हणून आध्यात्मिक महत्व आहे.
भगवान शंकरांची बारा ज्योतिर्लिंगे
महादेवांच्या बारा ज्योतिर्लिंगांच्या पौराणिक कथा आणि महत्व
सोमनाथ ज्योतिर्लिंग

सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरातमधील सौराष्ट्र क्षेत्रातील वेरावळ जवळ स्थित आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी हे पहिले ज्योतिर्लिंग आहे. सोमनाथ मंदिराचा उल्लेख स्कंदपुराण, श्रीमदभागवत गीता आणि शिवपुरणात आढळतो. वेद, ऋग्वेदातही सोमेश्वर महादेवाच्या महिम्याचे वर्णन केलेले आहे. मंदिराची कालमर्यादा इ.स.पूर्व ६४९ पासून शोधली जाऊ शकते परंतु हे मंदिर त्यापेक्षाही जुने आहे असे मानले जाते.
कथा
पुराणात ह्या मंदिराविषयी एक कथा सांगितली आहे. चंद्राचे नाव “सोम” असे होते. सोम दक्षाचा जावई होता. एकदा त्यांनी दक्षाची अवहेलना केली. त्यागोष्टीचा दक्षाला प्रचंड राग आला. दक्षाने त्यांना त्यांचा प्रकाश दिवसेंदिवस कमी होत जाईल असा शाप दिला (तेव्हापासून अमावस्या आणि पौर्णिमेचा या भौगोलिक क्रियांचा प्रारंभ झाला.) अन्य देवतांनी दक्षाला उ:शाप देण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी सरस्वती नदी समुद्राला जिथे मिळते, तेथे स्नान केल्यास या शापाचा परिणाम रहाणार नाही, असे सांगितले. त्यानंतर सोमाने सौराष्ट्रातील या ठिकाणी येऊन येथे स्नान केले आणि भगवान शिवाची आराधना केली. शंकर येथे प्रकट झाले आणि त्यांनी त्याचा उद्धार केला. क्षय नाहीसा होण्याकरिता सोमाने ह्या ठिकाणी लिंग स्थापन करून पूजा केली. त्यामुळे हे स्थान “सोमनाथ” या नावाने प्रसिद्ध झाले.
ब्रह्मदेव सौराष्ट्रात आले होते. एके ठिकाणी आल्यानंतर त्यांना असे जाणवले की ह्या ठिकाणी काही तरी पावित्र्य आहे. शोध घेतल्यावर, उत्खननानंतर त्यांना हे शिवलिंग सापडले. विधिवत पुजा करून ते शिवलिंग स्थापून ते निघून गेले.असं म्हटलं जातं की सोमाने हे मंदिर प्रथम सोन्याचे बांधले होते. नंतर ते रावणाने चांदीत बांधले. तेच कृष्णाने लाकडात बांधले. आणि भीमदेवाने हे मंदिर पुन्हा दगडात बांधले.
ऐतिहासिक
हे मंदिर प्रचंड वैभवशाली होते. संपत्तीच्या लोभापायी आणि धर्मद्वेषामुळे ह्या मंदिरावर अनेक वेळा आक्रमणे झाली. गझनीच्या मोहम्मदाने १८ वेळा आक्रमण करून हे मंदिर लुटले. त्याच्या शेवटच्या स्वारीत त्याने ज्योतिर्लिंगावरच घाव घालून त्याखालील मौल्यवान धातू आणि कोशागार लुटून नेले. औरंगजेबानेही हे मंदिर पाडण्यासाठी आतोनात प्रयत्न केले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर श्यामलदास गांधी, सरदार वल्लभभाई पटेल व के. एम. मुन्शी यांच्या पुढाकाराने वेरावळपासून ६ कि.मी. अंतरावर समुद्रकिनाऱ्यावर हे भव्य मंदिर उभारले आणि ११ मे १९५१ रोजी राष्ट्राध्यक्ष राजेंद्रकुमार यांच्या शुभ हस्ते सोमनाथाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग

भारतातील आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यातील नल्लामल्ला जंगलात कृष्णा नदी किनारी श्री शैल डोंगरावर हे ज्योतिर्लिंग स्थित आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी हे दुसरे ज्योतिर्लिंग आहे. मंदिराची निर्मिती आठव्या शतकात झाली होती. मंदिराची तटबंदी जवळपास २५ फुट उंच आहे. या ठिकाणी मूळ शिवलिंगावर छोटे छोटे १००० शिवलिंग कोरले आहेत. याशिवाय मल्लिकार्जुन, रावण, नंदी, कैलास पर्वत यांच्या चांदीच्या मूर्ती आहे. प्रत्येक भिंतीवर अद्भुत शिल्पकृती आहेत.
कथा
क्रोधाने माता पार्वती फिरत फिरत वनात आल्या होत्या. काही वेळातच भगवान शंकरही वनात आले. पार्वतीने भिल्लीणीचे रूप घेतले होते. ते रूप शंकरांना खूप आवडले. तिथल्या आदिवासींनी थाटामाटात त्यांचे लग्न करवले. मल्लिका अर्थात माता पार्वती आणि भगवान शंकराला अर्जुन असे म्हटले गेले. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या स्वरुपात त्याठिकाणी त्यांची पूजा केली जाते. येथे येणाऱ्या भक्तांची सात्विक इच्छा पूर्ण होते असे म्हटले जाते. ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने भक्ताला पापातून मुक्तता मिळते असेही म्हटले जाते.
स्कंद पुराणात श्री शैल कांड नावाने असलेल्या अध्यायांत ह्या मंदिराचा उल्लेख आढळतो. मंदिराचे महत्व कैलास पर्वताएवढेच असल्याचे म्हटले जाते. काही जाणकारांच्या मते शंकराचार्यांनी जेव्हा ह्या मंदिराची यात्रा केली होती तेव्हा त्यांनी ‘शिवनंदन’ ह्या लहरींची रचना केली होती.
ऐतिहासिक
शिवपुरणात उल्लेख केल्याप्रमाणे हे स्थान अतिशय पवित्र असल्याचे मानले जाते. हे स्थान १८ महाशक्ती स्थानापैकी एक आहे. वीरशैव संप्रदायाच्या ५ प्रमुख मठांपैकी एक आहे. आर्य-द्रविड, शैव यांच्यात या पवित्र स्थानी एकता झाली. इ.स. १४०४ मध्ये विजयनगरच्या राजाने या मंदिराच्या मुख्य सभामंडपाची निर्मिती केली. याच ठिकाणी श्रीकृष्ण, देवराय, हरिहर ब्रह्मानंद्राय यांनी ३ गोपुरे बांधली.
श्रीशेलमचा इतिहास सातवाहन काळापर्यंत सापडतो. चौदाव्या शतकातील प्रोलया वेमा रेड्डी या राजाचा कार्यकाळ हा श्रीशैलमचा सुवर्णकाळ मानला जातो. राजा प्रोलयाने पाताळगंगा (कृष्णा नदी) ते श्रीशैलम असा मार्ग बांधला होता. यानंतर बलाढ्य विजयनगर साम्राज्यात मुख्य मंदिराचे आणि दक्षिण टोकाकडील गोपुरांचे दगडी बांधकाम करण्यात आले. पुढे पंधराव्या शतकात विजयनगर साम्राज्याचे राजे कृष्णदेवराय यांनी इतर भागाचे निर्माण कार्य केले. इ.स १६६७ मधे छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या वेळी मंदिराच्या उत्तरेकडील गोपुराचे बांधकाम केले होते.
श्री महाकाळेश्वर

श्री महाकाळेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातील उज्जैन येथे क्षिप्रा नदीच्या काडी स्थित आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी हे तिसरे ज्योतिर्लिंग आहे. हे एकमात्र दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू असल्याचेही म्हटले जाते. मंदिरात रोज पहाटे ४:०० वाजता केल्या जाणाऱ्या भस्म आरतीला अनन्यसाधारण महत्व आहे. श्री महाकाल मंदिराची प्रशंसा महाभारतातील वेद व्यासांपासून कालिदास, बाणभट्ट आणि राजा भोज यांनीही केली आहे. हे मंदिर चालुक्य स्थापत्यशास्त्राचे एक उत्तम उदाहरण आहे.
कथा
एक दूषण नावाचा राक्षसी राजा फारच उन्मत्त झाला होता. त्याच्या असह्य छळाला उज्जैनवासीय प्रचंड वैतागले होते. रहिवाशांनी संरक्षणासाठी भगवान शंकराची आराधना केली. शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि ज्योतिच्या रुपात प्रकट होऊन त्यांनी दूषण राक्षसाचा संहार केला. संकटातून मुक्ती मिळाल्याने लोकांनी महादेवाला तिथेच राहण्याचा आग्रह केला त्यानुसार महादेव लिंगाच्या रुपात उज्जैनमध्ये स्थायिक झाले असे मानले जाते.
ऐतिहासिक
अकराव्या शतकात मंदिराची निर्मिती झाले असून त्यानंतर जवळपास १४० वर्षांनंतर दिल्लीचा सुलतान इल्तुतमिशाने उज्जैनवरील आक्रमणावेळी हे मंदिर उध्वस्त केल्याचे समजते. सध्या दिसणारे मंदिर हे मराठाकालीन आहे. उध्वस्त अवस्थेतील मंदिराचा जीर्णोद्धार अडीचशे वर्षांपूर्वी शिंदे घराण्याचे दिवाण बाबा रामचंद्र शेणवी यांनी केला होता असे उल्लेख आढळतात.
श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग

देवी अहिल्याबाई होळकर यांच्या काळापासून येथे एका विशिष्ट दिवशी मातीची १८ हजार शिवलिंगे तयार करून, पूजा केल्यानंतर त्यांना नर्मदेत विसर्जित करण्याची प्रथा आहे.
कथा
या ज्योतिर्लिंगाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात. राजा मांधाताने येथे नर्मदा किनाऱ्यालगतच्या पर्वतावर तपश्चर्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून येथेच निवास करण्याचे वरदान मागून घेतले. तेव्हा पासून ही तीर्थनगरी ओंकार मांधाता या नावानेही ओळखली जाऊ लागली.
एक आख्यायिका सांगते की, इक्ष्वाकु वंशातील सम्राट मांधाताच्या दोन मुलांनी कठोर तपस्या केली, भगवान शिवाला प्रसन्न केले. दोन्हीही पुत्रांवर प्रसन्न होऊन भगवान शिव स्वतः ज्योतिर्लिंग म्हणून प्रकट झाले. त्यामुळे या पर्वताला ‘मानधाता पर्वत’ म्हणतात ही एक कथा सांगितले जाते.
ऐतिहासिक
श्री ओंकारेश्वर क्षेत्रात खूप पूर्वी आदिवासींची वस्ती होती. माळव्याच्या परमार शासकांच्या मदतीने आदिवासी भिल्ल सरदारांनी इथे राज्य केले. त्यांच्यात बळी देण्याची प्रथा होती, त्यामुळे भाविक या ठिकाणी क्वचितच येत असत. दारीयाइ नावाच्या महान पुरुषाने ही प्रथा बंद करण्याचे प्रयत्न केले. यानंतर या ठिकाणी उत्सव होवू लागले. इ.स ११९५ मध्ये राजा भारतसिंहाने आदिवासींचा पराभव केला. यानंतर मात्र मराठ्यांच्या कारकिर्दीत या मंदिराची निर्मिती नव्याने झाली. काही कालावधी उलटल्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी या मंदिरात मोठ्या प्रमाणावर सुधारणा केल्या.
.
श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग

कथा
देवांनी आणि राक्षसांनी केलेल्या समुद्रमंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली होती. धन्वंतरी आणि अमृत ही त्यापैकीच दोन रत्ने होती. जेव्हा राक्षस अमृत घेण्यासाठी धावले, तेव्हा श्री विष्णूने धन्वंतरीसह अमृत शिवलिंगात लपवले. राक्षसांनी जेव्हा त्या शिवलिंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या शिवलिंगातून ज्वाला बाहेर पडू लागल्या. पण, जेव्हा शिवभक्तांनी त्याला स्पर्श केला, तेव्हा त्यातून अमृताचा प्रवाह बाहेर येऊ लागला. मान्यता आहे की, परळी वैजनाथ हे तेच शिवलिंग आहे. अमृतयुक्त असल्याकारणानेच या ज्योतिर्लिंगाला वैजनाथ वा ‘वैद्यनाथ (आरोग्याचा देव)’ म्हणतात.
ऐतिहासिक
अहिल्याबाई होळकरांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यासंबंधीत संस्कृत शिलालेख या मंदिरात आहे. पुढे या मंदिराची धुरा पेशव्यांनी सांभाळली. ब्रह्मा, वेणू, सरस्वती नद्यांचा त्रिवेणी संगम या ठिकाणी बघावयास मिळतो. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात.
श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग

श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी हे सहावे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक भीमा नदी उगम पावते, अशी श्रद्धा आहे. स्कंदपुराणात आणि शिवपुरणात या मंदिराचा उल्लेख आहे. या मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीतील आहे. ही उभारणी मुख्यतः उत्तरेकडील बांधकाम शैलीशी मिळती जुळती आहे. मराठ्यांचा राजस्थान, माळवा ह्या भागात अंमल वाढत गेल्याने तिथल्या वास्तुरचनेचा प्रभाव येथे दिसून येतो. गर्भगृहावर माळवा पद्धतीचे शिखर आहे. मुख्य शिखरावर छोटी छोटी शिखरे जोडलेली आढळतात. मंदिराच्या दक्षिणेकडील भिंतीवर श्री कृष्णाची मूर्ती आहे, तसेच पश्चिमेस हनुमानाची आणि उत्तरेस श्री महिषासुराची मूर्ती आहे. येथे असणारा नंदी मंडप प्राचीन काळातील मानला जातो. या मंदिरात ११ सुंदर कमानी व नव्या रचनांचा मेळ सुंदररीत्या घातला गेलेला आहे. भिंतींवर कोरीव नक्षीकाम दिसून येते.
कथा
त्रेतायुगामध्ये त्रिपुरासुर नावाचा दैत्य होता. त्याने शंकाराची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले व अमरत्वाचे वरदान मागितले. शंकरांनी अटींसह हे वरदान त्याला दिले. परंतु तो विध्वंस करू लागल्याने देवांच्या विनंतीने शंकराने त्रिपुरासुराचा वध करण्याचे ठरवले. त्यांच्यात कार्तिक शुद्ध प्रतिपदा ते कार्तिक शुद्ध पौर्णिमा काळात झालेल्या युद्धात भगवान शंकरांनी त्या दैत्याचा वध केला आणि देवांच्या आग्रहाखातर भगवान शंकर शिवलिंगाच्या रुपात येथेच विराजमान झाले. युद्धानंतर आलेल्या घामातून भीमा नदीचा उगम झाल्याची पौराणिक कथा आहे.
ऐतिहासिक
या मंदिराचा जीर्णोद्धार १२१२ मध्ये झाला असावा असा प्रमुख अंदाज आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत होते. खरोशी गावाच्या महसूलातून मंदिरासाठीचा खर्च केला जात होता. पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शनासाठी आल्याच्या नोंदी आहेत. नाना फडणवीसांनी शिखरासह या मंदिराचा जीर्णोध्दार केला होता. सध्या दिसणारे देऊळ तुलनेने अलीकडच्या काळात बांधले आहे. याचा कळस नाना फडणवीस यांनी अठराव्या शतकाच्या सुमारास बांधला. सभामंडपातील ५ मणाची लोखंडी घंटा चिमाजी आप्पा यांनी भेट दिली असून त्यावर १७२७ अशी इंग्रजीतून नोंद सुद्धा आहे.
श्री रामेश्वरम ज्योतिर्लिंग

श्री रामेश्वरम ज्योतिर्लिंग तमिळनाडूतील रामनाथपुरम जिल्ह्यातील बेटावर स्थित आहे. हे ज्योतिर्लिंग १२ पैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. हे पवित्र तीर्थक्षेत्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकीही एक आहे. दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातील या शिवलिंगाची स्थापना प्रभू श्रीरामांनी केल्याने हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी हे एक मानले जाते. मंदिरात २ शिवलिंग आहेत.
द्रविड शैलीतील ह्या मंदिरात विस्तीर्ण व्हरांडा असून ग्रॅनाइटमध्ये कोरलेले जवळपास १२१२ खांब आहेत. मंदिरात एक भव्य नंदी आहे. येथील मंडपाची निर्मिती इ.स १७४० ते १७७० या कालावधीतील असून परिसरात २४ विहिरी आणि गर्भगृहात चांदीच्या चौथऱ्यावर सुंदर शिवलिंग आहे. विशेष म्हणजे या शिवलिंगावर केवळ गंगाजलाचाच अभिषेक केला जातो.
कथा
दशग्रंथी ब्राह्मण असलेल्या रावणाच्या वधानंतर अगस्ती ऋषींनी प्रभु श्रीरामाला ब्रह्महत्या निरसनार्थ सागरतीरावर ज्येष्ठ शुक्ल दशमीच्या मुहुर्तावर शिवलिंगाची स्थापना करण्याचा आदेश दिला होता. या कार्यार्थ शिवलिंग आणण्यासाठी हनुमान कैलासावर गेले होते; परंतु शिवाचे दर्शन न झाल्याने त्यांनी तप आरंभले. कालांतराने शिवाने प्रकट होऊन हनुमंतांना स्वतःचे दिव्य लिंग दिले. या प्रक्रियेला विलंब झाल्यामुळे मारुतीला मुहुर्ताची वेळ साधता आली नाही. त्या वेळी सीतेने वालुकामय(वाळूचे) लिंग बनवून श्रीरामांना दिले. ऋषींच्या आदेशानुसार रामाने स्थापित केलेले हेच रामेश्वरलिंग होय. स्थानिक लोक त्याला ‘रामनाथ स्वामी’ असे म्हणतात.
मारुती परतल्यानंतर श्रीरामाने स्थापन केलेले शिवलिंग पाहून त्याला फार दुःख झाले. मग रामाने त्याला स्थापित लिंगाजवळच त्याने आणलेल्या लिंगाची स्थापना करण्यास सांगितले. त्याने स्थापलेल्या लिंगाचे दर्शन घेतल्याशिवाय यात्रिकांना रामेश्वर दर्शनाचे फळ मिळणार नाही, असेही सांगितले. या लिंगाला ‘दक्षिण काशीविश्वनाथ’ किंवा ‘हनुमदीश्वर’ असे नाव आहे.
रामेश्वरम हे काशीयात्रेला पूर्णत्व प्रदान करणारे तीर्थस्थान आहे. धर्मग्रंथांनुसार काशीची तीर्थयात्रा बंगालचा उपसागर(महोदधि) आणि हिंदी महासागर(रत्नाकर) यांच्या संगमावर स्नान केल्यानंतर आणि त्यानंतर काशीच्या गंगाजलाने रामेश्वराला अभिषेक केल्यानंतरच पूर्ण होते.
ऐतिहासिक
स्कन्दपुराण व शिवपुराणात या पवित्र क्षेत्राचा उल्लेख आलेला आहे. रामेश्वरद्विपाचा आकार काहीसा श्रीविष्णूच्या शंखासारखा असून श्रीलंकेच्या राजाने याठिकाणी मंदिर बांधले असावे. रामेश्वर मंदिराची निर्मित १२ ते १६ व्या शतकातली असावी. इ.स १८९७ मध्ये स्वामी विवेकानंद येथे दर्शनार्थ येवून गेले आहेत.
श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग

कथा
सुप्रिय नामक एक वैश्य भगवान शंकराचा भक्त होता. नेहमीप्रमाणे सुप्रिय नावेत बसून जात असताना अचानक दारूक नावाच्या एका राक्षसाने नावेतील सर्वांना बंदी बनवले. त्या राक्षसाने ह्या सर्व लोकांना कारागृहात डांबले. परंतु त्या ठिकाणीही सुप्रिय महादेवाची भक्ती करण्यात तल्लीन झालेला. त्याच्या ह्या अपार भक्तीने महादेव प्रसन्न होऊन एका उंच ठिकाणे ते प्रकट झाले आणि त्यांनी सुप्रियला पाशुपतास्त्र दिले. भगवान शंकरांनी दिलेल्या ह्या शस्त्राने सुप्रियने त्या दारूक राक्षसाचा आणि त्याच्या सेवकांचा वध केला. दारूकने स्वतःच्या मृत्यूपूर्वी मुक्तीसाठी महादेव आणि माता पार्वतीची प्रार्थना केली. त्याची ही प्रार्थना मान्य करून शंकराने त्याला मुक्ती दिली. सुप्रियने विनंती केल्यानंतर महादेव कायमस्वरूपी लिंगाच्या स्वरूपात येथेच वास्तव्यास राहिले.
असे मानले जाते की भगवान श्रीकृष्ण स्वतः येथे येत आणि भगवान शिव यांची पूजा करत.
महाराष्ट्रातील औंढा नागनाथ हे देखील आठवे ज्योतिर्लिंग असल्याचे मानले जाते.
श्री काशी विश्वेश्वर

श्री काशी विश्वेश्वर हे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे स्थित आहे. हे १२ ज्योतिर्लिंगापैकी नववे ज्योतिर्लिंग आहे. गंगा नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले वाराणसी जगातील प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते. ही नगरी भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही विख्यात आहे. याच नगरीत काशी विश्वनाथाचे वास्तव्य आहे. हे मंदिर शंकराच्या प्रमुख ज्योतिर्लिंगामधील एक मानले जाते. लोक येथे केवळ दर्शनासाठीच येतात असे नाही तर आयुष्यात मोक्ष प्राप्ती व्हावी, आणि शंकराच्या दर्शनाने ती इथेच होईल अशी भावना आहे. हे सप्तपुरणांपैकी एक, ५१ शक्तीपीठांपैकीही एक आहे. तुलसीदासांनी रामचरित्र मानस ग्रंथरचना काशीत केली. संत एकनाथांनी एकनाथी भागवत व रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे लेखन याच पवित्र ठिकाणी केले. गोस्वामी तुलसीदास, आदि शंकराचार्य, गुरू नानक, स्वामी दयानंद सरस्वती, संत कबीर, स्वामी विवेकानंद या विद्वानांनीही येथील शिवलिंगाचे दर्शन घेतले आहे असे सांगितले जाते.
पूर्वी मूळ मंदिराच्या जागी मशीद बांधली गेल्यामुळे मूळ काशी विश्वेश्वर मंदिराच्या जागेचा संकोच झाला होता. आता मूळ मंदिराचे क्षेत्रफळ ५०० चौरस फुट इतके मर्यादित झाले आहे. येथे एक विहीरही असून तिला ‘ज्ञानव्यापी’ची संज्ञा दिली जाते. मंदिरातील गर्भगृहाच्या आत चांदीने मढविलेले परमेश्वर विश्वनाथांचे शिवलिंग आहे. हे शिवलिंग काळ्या दगडातून निर्मिलेले आहे.
कथा
भगवान ब्रह्म आणि विष्णु यांच्यात ‘सर्वोच्च देव कोण?’ यावरून वाद होत असताना प्रकाश किरणांच्या रुपात शंकर तिथे प्रकटले. शंकराने दोघांनाही त्या प्रकाश किरणांचे टोक शोधण्यास सांगितले. मात्र ते दोघांनाही शोधता आले नाही. जिथे ही प्रकाश किरणे पडली त्या ठिकाणी हे शिवलिंग आहे अशी आख्यायिका आहे.
भगवान शंकर हे विवाहानंतर पार्वतीच्या आग्रहाखातर काशीला वास्तव्यास आले असताना हे लिंग स्थापन झाल्याचीही कथा सांगितली जाते.
ऐतिहासिक
काशीवर मुस्लिम आक्रमणे अनेकदा झाली. इ.स १०३३ मध्ये गजनीच्या महमूदाने काशी लुटली होती. इ.स. १६६९ मध्ये औरंजेबानेही काशीवर हल्ला केला होता. इ.स. १७७६ महाराणी अहिल्याबाई यांनी या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला होता. महाराजा रणजीतसिंह यांनीही मंदिराच्या शिखरासाठी एक हजार किलो सोने दान दिले होते. इ.स. १९८३ पासून उत्तरप्रदेश सरकारने मंदिराचे व्यवस्थापन हाती घेतले.
श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग

श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे स्थित आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी हे १० वे ज्योतिर्लिंग आहे. ज्योतिर्लिंग स्तोत्रातही ‘त्र्यंबकम गौतमी तटे’ असा त्र्यंबकेश्वराचा उल्लेख केला आहे. हे मंदिर ब्रह्मगिरी या पर्वताच्या पायथ्याशी वसले आहे. हा पर्वत म्हणजे शिवाचे एक रूप मानले जात असून येथूनच गोदावरी नदीचा उगम होतो.
येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात.
मंदिराच्या चार बाजूस दगडी तटबंदी व चार दरवाजे आहे. हे मंदिर ५ दलांचे आहे. प्रवेश करताच नंदीदर्शन होते. येथे घागरीसारख्या आकारात ब्रह्मा, विष्णू, शंकर अश्या तीन मूर्ती असून त्यांच्यावरील तीन छिद्रांना गंगा, गोदावरी, सरस्वती नद्यांचे रूप मानले जाते. त्यातून शिवलिंगावर अभिषेक होतो.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. दक्षिणेकडील कुशावर्तात स्नान करण्यासाठी जगभरातून भाविक येतात. भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली, त्रिपिंडी, कालसर्प शांती, विष्णुबली, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थसिन्हास्त विधी हे धार्मिक विधी केले जातात.
कथा
भगवान गौतम ऋषींनी शंकराची कठोर तपस्या केली. बऱ्याच दिवसांच्या तपश्चर्येनंतर भगवान शिव प्रसन्न झाले. वरदान म्हणून गौतम ऋषींनी त्यांच्यावरील न केलेल्या पापांच्या आरोपातून मुक्तता मागितली. भगवान शंकराने हे मान्य करून त्यांना वरदान दिले. त्यानंतर गौतम ऋषींनी शंकरांना तिथेच वास्तव्यास राहण्याचा आग्रह केला. त्या आग्रहाखातर शिवलिंगाच्या रुपात शंकर तेथे स्थापन झाले. अशी पौराणिक कथा सांगितली जाते.
ऐतिहासिक
तत्कालीन बांधकामाची ‘मेरू माळवा’ पद्धत वापरून श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या देखरेखीखाली मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते.
श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग

श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग उत्तराखंड राज्यामधील केदारनाथ या गावात स्थित आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी हे ११ वे ज्योतिर्लिंग असून ते हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते. हे क्षेत्र पवित्र चारधाम तीर्थक्षेत्रांपैकीही एक आहे. या परिसरास देवभूमी असे म्हटले जाते. हे मंदिर हिमालयामध्ये मंदाकिनी नदीच्या काठावर वसले आहे.
केदारनाथ मंदिर कात्यहारी शैलीत बांधण्यात आले आहे. बर्फाच्छादित पर्वतामधील एका उंच दगडी चौथऱ्यावर करडया रंगाचे दगडी मंदिर आहे. येथून हिमालयातील नंदादेवी, नंदाघुमटी त्रिशुली, हत्तीरपर्वत आदी शिखरे दिसतात. गर्भगृहाकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर पाली भाषेत शिलालेख आहेत. आतील भिंतींवर विविध देवांची शिल्पे आणि हिंदू पुराणातील दृश्ये आहेत.
कथा
कौरव पांडवांमधील युद्धानंतर विजयी पांडव भगवान शंकराच्या दर्शनासाठी काशी येथे आले होते. बंधूंच्या हत्येच्या आणि हिंसेच्या पापातून मुक्तता मिळवण्यासाठी पांडव आले असले तरी त्याआधीच शंकर काशीतून प्रस्थान करून हिमालयात गेले होते, ही गोष्ट माहीत झाल्यावर पांडव हिमालयात गेले. शंकराच्या दर्शनाची पांडवांना तीव्र इच्छा होती. भगवान शंकर मात्र त्यांना दर्शन देण्यास तयार नव्हते. पांडवांच्या कठोर परिश्रमानंतर शंकर दर्शन देण्यास तयार झाले पण सहजासहजी दर्शन मिळणार नव्हते. शंकराने म्हशीचे रूप धारण केले आणि कळपात गेले परंतु भीमाला त्या कळपातील एका म्हशीत काही तरी वेगळे जाणवले म्हणून तो मागे जाऊ लागला. काही काळाने त्याच्या लक्षात आलं की हेच भगवान शंकर आहेत. भीम अगदी जवळ येऊ लागताच शंकरांनी जमिनीत अंतर्धान पावण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत भीमाने म्हशीच्या शरीरावरील वशिंड (पाठ आणि मानेच्या मधोमध असलेला त्रिकोणी उंचवटा) पकडून ठेवला. भीमाच्या या प्रयत्नांवर खुश होऊन शंकरांनी पांडवांना दर्शन देण्याचे ठरवले. आणि दर्शनानंतर पांडवांच्या आग्रहाखातर शंकर तेथेच स्थानापन्न झाले, अशी येथील पौराणिक कथा सांगितली जाते.
ऐतिहासिक
या मंदिराचे पुनर्निर्माण ८ व्या शतकात शंकराचार्यांनी केले. मुख्य मंदिराची निर्मिती ९ व्या शतकात झाली. तर आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोध्दार केला.
(केदारनाथांचे देऊळ वैशाख ते आश्विन उघडे असते. नंतर कार्तिकापासून चैत्रापर्यंत ते बर्फात बुडालेले असल्यामुळे बंद असते.)
श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग

हे मंदिर सर्वात लहान ज्योतिर्लिंग मंदिर आहे. मंदिराचे मूळ नाव कुंकूमेश्वर होते. हे मंदिर पारंपरिक दक्षिण भारतीय वास्तुकलेचा उत्तम नमुना होय. मूळ दगडी चौथरा असून अर्धे मंदिर हे लाल पाषाणाचे आहे ज्यात पंचस्तरीय शिखर रचना आहे. लाल दगडात भगवान विष्णूचे दशावतार कोरलेले पाहण्यास मिळतात. २४ खांबांपैकी काही स्तंभांवर पौराणिक जटिल नक्षीकाम केले आहे.
कथा
पती-पत्नी सुधर्मा आणि सुदेहा या जोडप्याला मुल होत नव्हते. सुदेहा कधीही आई होऊ शकत नाही याची त्यांना जाणीव झाली होती म्हणून सुधर्माने घुश्माशी लग्न केले. घुश्माने एका सुंदर मुलाला जन्म दिला. त्यानंतर सुदेहाच्या मनात ईर्षा निर्माण झाली आणि मनावर ताबा न राहता तिने घुश्माच्या अनुपस्थितीचा फायदा घेत त्या लहान बाळाची हत्या केली. घुश्मा शंकराची परम भक्त होती. महादेवांनी ते मूल पुन्हा जिवित केले. घुश्माच्या मुलाची हत्या केली या क्रोधात शंकर सुदेहावर त्रिशूळाने वार करणार इतक्यात घुश्माने त्यांना थांबवले आणि माझे मुल तर तुमच्यामुळेच पुन्हा मिळाले म्हणून तिलाही माफ करावे अशी इच्छा व्यक्त केली. इच्छेचा मान ठेवत शंकरांनी सुदेहाला माफ केले. लोक कल्याणासाठी येथेच स्थित व्हावे अशी विनंती केल्यानंतर शंकर त्याच भागात शिवलिंगाच्या रुपात स्थित झाले हेच ते घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग अशी आख्यायिका सांगितली जाते.
ऐतिहासिक
वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इ. स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. २७ सप्टेंबर १९६० रोजी हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले गेले आहे.
Also Read
हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे – १
हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे – २
हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने दह्याचे विरजण लावता येते?
गौरीं-गणपतीमध्ये गौरीच्या दोन मूर्त्यांचे पूजन का करतात??
अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती
Follow PRATILIKHIT
weapons used in Mahabharata, ancient weapons, weapons used in Ramayana, महाभारतात वापरलेली शस्त्रे , रामायणात वापरलेली शस्त्रे , bramhastra , pashupatastra, narayanastra, trishul, sudarshan, bramhadand , हिंदू पुराणातील दिव्य शस्त्रे

No Comment