
हिंदू कालमापन पद्धती आणि कालचक्र
आपल्या प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये काळाच्या अगदी छोट्या परिमाणापासून म्हणजे त्रुटीपासून (१ त्रुटी म्हणजे ०.३ मायक्रोसेकंद) ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत वेळेची गणना केली आहे. हिंदू धर्मामध्ये मनुस्मृती ग्रंथामध्ये या कालपरिमाणाचा उल्लेख येतो.
चत्वार्याहुः सहस्राणि वर्षाणां तत् कृतं युगम् । तस्य तावत्शती सन्ध्या सन्ध्यांशश्च तथाविधः ॥ ६९ ॥
इतरेषु ससन्ध्येषु ससन्ध्यांशेषु च त्रिषु । एकापायेन वर्तन्ते सहस्राणि शतानि च ॥ ७० ॥
यदेतत् परिसङ्ख्यातमादावेव चतुर्युगम् । एतद् द्वादशसाहस्रं देवानां युगमुच्यते ॥ ७१ ॥
दैविकानां युगानां तु सहस्रं परिसङ्ख्यया । ब्राह्ममेकमहर्ज्ञेयं तावतीं रात्रिमेव च ॥ ७२ ॥
चार सहस्त्र वर्षांचे (४०००) एक कृतयुग (सत्ययुग) होते. तेवढीच शतवर्षे (४*१००) सकाळ आणि संध्याकाळच्या संधीकाळाची ||६९|| (म्हणजेच ४०००+४००+ ४०० = ४८०० वर्षे)
बाकीच्या तीन युगांमध्ये युगांची सहस्त्रवर्षे आणि संधीकाळाची शतवर्षे एकेकाने (एक हजार वर्षाने आणि १०० वर्षाने कमी होतात ) ||७०|| (म्हणजेच त्रेतायुगाची वर्षे ४००० -१००० =३००० आणि प्रत्येक संधीकाळाची वर्षे ४००-१०० =३०० असे करून एकूण त्रेतायुगाची वर्षे ३०००+३००+३०० = ३६०० वर्षे. याचप्रमाणे द्वापरयुगाची २०००+२००+२०० = २४०० आणि कलियुगाची १२०० वर्षे)
अशा प्रकारे चतुर्युगची एकूण १२००० वर्षे (४८००+३६००+२४००+१२००) म्हणजे एक दैवयुग किंवा महायुग ||७१||
अशी १००० दैवयुगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि तेवढीच वर्षे म्हणजे ब्रह्मदेवाची एक रात्र ||७२|| (म्हणजेच १२०००००० वर्षे ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि १२०००००० वर्षे ब्रह्मदेवाची एक रात्र असे एकूण २४०००००० वर्षे (दोन कोटी चाळीस लाख वर्षे) म्हणजे ब्रह्मदेवाचा एक संपूर्ण दिवस.
वरच्या युगामध्ये संधीकाळ हा एक युग संपून दुसरे सुरु होणाच्या मधला काळ. असे युग बदलत असताना जगामध्ये मोठी उलथापालथ होत असते.
भग्वदगीतेमध्ये सुद्धा ८व्या अध्यायात म्हणले आहे – सहस्रयुगपर्यन्तमहर्यद्ब्रह्मणो विदु: | रात्रिं युगसहस्रान्तां तेऽहोरात्रविदो जना: ||
म्हणजेच १००० चतुर्युगे किंवा १००० महायुगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि तेवढीच रात्र म्हणजे ब्रह्मदेवाची एक रात्र. अश्या प्रकारे कालपरिमाणाविषयी वेगवेगळ्या ग्रंथामध्येही एकवाक्यता दिसून येते.
महायुगांचा हा काळ अत्यंत मोठा असल्याने तो विभाजित केलेला आहे. ७१ महायुगे म्हणजे एक मन्वंतर आणि अशी १४ मन्वंतरे म्हणजे ब्रह्मदेवाचा १ दिवस. थोडक्यात ब्रह्मदेवाचा १ दिवस म्हणजे ७१*१४ = ९९४ महायुगे आणि मन्वंतरानंतरची संधीकाळ (मन्वंतरानंतरचा संधीकाळ जो साधारणपणे चतुर्युगच्या अर्धा असतो) धरून १००० महायुगे होतात.
१४ मन्वंतरांचे १४ मनू. सध्या ७ वे मन्वंतर सुरु आहे ज्याचा मनू आहे वैवस्वत. प्रत्येक मन्वंतरात ७ ऋषी जे सप्तर्षी नावाने ओळखले जातात आणि प्रत्येक मन्वंतरात ते वेगळे असतात. या मन्वंतरातले सप्तर्षी म्हणजे कश्यप,अत्री, वशिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, भारद्वाज. हे सप्तर्षी आपण तारामंडळात पाहू शकतो आणि अनेक वर्षानंतर पृथ्वीचा आस आणि फिरण्याची गती आणि पोल बदलल्यामुळे हेही बदलत असतात जसा ध्रुवतारा बदलतो. प्राचीन ग्रंथानुसार असे मानले जाते की मनू हा त्याच्या काळापुरता शासक आहे.
अलीकडे कलियुगाची एकूण वर्षे ४,३२,००० आहेत असे बऱ्याच ठिकाणी लिहिलेले आढळते जे चूक आहे. असे मानले जाते की मानवाचा १ वर्ष म्हणजे देवांचा १ दिवस. याप्रमाणे वर सांगितलेली १२०० कलियुगाची वर्षे दैवयुगामध्ये परिणत करून १२००*३६० = ४३२००० असे सांगितले जाते जे चुकीचे आहे. मनुस्मृतीमध्ये कालगणना करताना मानवाचा १ वर्ष म्हणजे देवांचा १ दिवस घ्यावा असे कुठेही वर्णन नाही. वर दिलेल्या संस्कृत श्लोकांचा अर्थ लावून त्याप्रमाणे कालगणना केल्यास पुन्हा ३६० ने गुणण्याचे प्रयोजन राहत नाही.
परमहंस योगानंदांचे गुरु स्वामी श्रीयुक्तेश्वर यांनी याचे सुरेख विवेचन (The Holy Science) मध्ये केलेले आहे. कालचक्र कसे चालते याचे सुंदर लेखन त्यात सहजरित्या समजावून दिले आहे.
ब्रह्मदेवाचे एकूण आयुष्य १०० ब्रह्मवर्षे मानले आहे. म्हणजेच साधारणपणे २४०००००० * ३६५* १०० = ८७६,०००,०००,००० वर्षे. एक वर्ष म्हणून ३६० दिवस मोजण्याचा प्रघात आहे. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाचे एकूण आयुष्य ८६४,०००,०००,००० वर्षे भरते. एका ब्रह्मदेवाचे आयुष्य संपले की महाप्रलय होतो ज्यामध्ये संपूर्ण विश्व नष्ट होते. नंतर पुन्हा नवीन ब्रह्मदेवाचा उदय आणि पर्यायाने विश्वाचा देखील.
हे कालचक्र असेच पुन्हा सुरु राहते. असे हे कालचक्र अव्याहतपणे सुरु असते. अश्या असंख्य जीवसृष्ट्या (सध्याच्या विज्ञान भाषेत बोलायचे झाल्यास multiverse) एका वेळी अस्तित्वात असतात ज्याचे असंख्य ब्रह्मदेव असतात. केवळ आपल्या विश्वाबाबत बोलायचे झाल्यास अनेक वेळा आपले विश्व निर्माण झाली आणि अनेक वेळा नष्ट झाले असे मानले जाते. नक्की किती ब्रह्मदेव होऊन गेले याची कोणालाच कल्पना नाही.
Also Read
नवरात्रीत देवीने मारलेले राक्षस
नवरात्रीमधील देवीची नऊ रूपे (Nine forms of Devi – Nav durga)
हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने दह्याचे विरजण लावता येते?
गौरीं-गणपतीमध्ये गौरीच्या दोन मूर्त्यांचे पूजन का करतात??
अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती
Follow PRATILIKHIT
No Comment