छावा… #Review by Pratilikhit

छावा… #Review by Pratilikhit

छावा….

सिंहाचा छावा… मुफासा आणि सिम्बाच्या आभासी जगतात लहान मुलांना बाहेर काढून त्यांना खऱ्या छाव्याची ओळख करून देणारा चित्रपट. छत्रपती संभाजी महाराजांवर आजवर मराठी भाषेमध्ये बरेच सिनेमे आले परंतु भारतभर प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट. महाराजांवर चित्रपट असला की तो चित्रपट चांगला किंवा वाईट हे बोलण्याचा प्रश्न येत नाही कारण प्रत्येक कलाकार, दिग्दर्शक आणि संपूर्ण टीमने त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स दिलेला असतो. आणि प्रेक्षकसुद्धा तो चित्रपट पाहायला छत्रपतींच्या ठायी आपलं आद्य कर्तव्य म्हणून जातात.

विकी कौशलबद्दल काय बोलावं… तो छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अक्षरशः जगलाय. शिव आणि रुद्र… दोन्हीही महादेवांचीच नावे… परंतु रुद्राचा रौद्रावतार कसा असू शकतो हे छत्रपती संभाजी महाराजांकडे पाहून कळतं. संगमेश्वराच्या प्रसंगात विकी कौशलने तो रौद्रावतार ज्या प्रकारे साकारलाय त्याला तोडच नाही.

रश्मीकाने सुद्धा येसूबाईंची भूमिका उत्तम केलीये. स्वराज्याच्या महाराणी म्हणून त्यांच्या शब्दात असणारी जरब, त्यांची वाघिणीची नजर प्रत्यक्षात आणण्याचा तिने पुरेपूर प्रयत्न केलाय. परंतु का कुणास ठाऊक येसूबाईं समोर आल्यावर डोळ्यासमोर प्राजक्ता गायकवाडने साकारलेल्या महाराणी येसूबाईच येत होत्या.

अक्षय खन्नाने साकारलेला औरंग्या आजवरच्या औरंग्याच्या सगळ्या भूमिकांपेक्षा वेगळा आहे. क्रूरकर्मा म्हणून ओळख असलेल्या औरंग्याची पावले दख्खनमध्ये पडल्यावर त्याने जनतेचा केलेला छळ पडद्यावर दाखवण्याचं धाडस केल्याबद्दल दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना सलाम… ह्या सीनपैकी किती सिनना सेन्सॉरची कात्री लागली असेल माहीत नाही पण झाडांवर लटकवलेले लोकांचे मृतदेह आणि लोकांच्या रक्ताच्या पाण्याने लाल होऊन वाहणारं नदीचं पाणी, त्यात वाहणारे मृतदेह पाहून तेव्हाची परिस्थिती काय असू शकते ह्याचा विचार करूनच अंगावर काटा येतो. स्वतःच्या बापाचा आणि भावांचा खून करणारा क्रूरकर्मा औरंग्या ने नक्कीच करू शकतो ह्याबाबत काही दुमत नाही.

बाकी भूमिकांबद्दल बोलायचं झालं तर आशुतोष राणा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत चपलख बसतो. पण हंबीररावांच्या भूमिकेला चित्रपटात कमी वेळ दिला गेलाय असं जाणवलं. येसाजी कंक, बहिर्जी नाईक, सोयराबाई यांच्या भूमिकाही चांगल्या झाल्या आहेत. मराठी अभिनेते संतोष जुवेकर, आशिष पतोडे यांच्याही भूमिका महत्वाच्या आहेत. गणोजी आणि कान्होजी शिर्क्यानी केलेली गद्दारी पाहिली की आपोआप मुठी वळतात. छत्रपती शिवाजी महाराज गद्दारांना का मृत्युदंड देत असत हे हा प्रसंग पाहून कळतं. केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी अखंड हिंदुस्तानासाठी महत्वाच्या असलेल्या हिंदवी स्वराज्याशी बेईमानी करणारे मराठे म्हणून घेण्याच्या लायकीचेच नाहीत असं मनोमन वाटून जातं.

इतिहासात प्रभू श्री रामांनंतर समुद्रात सेतू बांधायचं धाडस कुणी केलं असेल तर ते छत्रपती संभाजी महाराजांनी. जंजिऱ्याचा तो प्रसंग किंवा त्याचं व्यवस्थित वर्णनतरी चित्रपटात हवं होतं. एकंदरीत चित्रपट खूप उत्तम आहे आणि सगळ्यांनी पहावा असाच आहे.

क्रूरकर्मा औरंग्या ८८ वर्षे जगला… जर छत्रपती शिवाजी महाराज अजून पाच ते दहा वर्षे जगले असते तर? जर छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरमधल्या लढाईत पकडले गेले नसते तर? जर सोयराबाईंनी पुत्रप्रेमासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यात अंतर पडू दिलं नसतं तर? जर कान्होजी आणि गणोजी यांनी टीचभर वतनाच्या मोहात अडकून आपल्याच बहिणीच्या कुंकवाशी, स्वराज्याच्या छत्रपतींशी बेईमानी केली नसती तर? तर भारताचा इतिहास कदाचित पूर्णपणे वेगळा असता… इंग्रज तर लांबची गोष्ट पण मोगलांना हिंदुस्थानचा चेहरा कदाचित नीट पाहताही आला नसता. परंतु इतिहासामध्ये जरतरला महत्व नसतं. घडलेल्या घटनांचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात.

छत्रपती शिवाजी महाराज की जय…. छत्रपती संभाजी महाराज की जय…. ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव…

ChhaavaOn14Feb #Chhaava #chhaavareview #review #छावा #छावारिव्ह्यू

77990cookie-checkछावा… #Review by Pratilikhit

Related Posts

Animal Movie Teaser | Review in Marathi

Animal Movie Teaser | Review in Marathi

The Vaccine War Review

The Vaccine War Review

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 259,665 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories