
गांधीजींची हत्या का करण्यात आली?
गांधीजींची हत्या का करण्यात आली?
अहिंसेचे पुरस्कर्ते असलेल्या गांधीजींची हत्या का करण्यात आली?
13 जानेवारी 1948 रोजी दुपारी जवळपास 12 वाजता महात्मा गांधी दोन मागण्यांसाठी उपोषणाला बसले. त्यांची पहिली मागणी होती की भारताने पाकिस्तानला 55 कोटी रुपये द्यावे आणि दुसरी मागणी होती की दिल्लीत मुस्लिमांवर होणारे हल्ले थांबवावे.
उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारी रोजी केंद्र सरकारने पाकिस्तानला तात्काळ 55 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे कट्टर हिंदू गांधीजींवर खूप चिडले, विशेषतः हिंदू महासभा.
महात्मा गांधींनी उपोषण सोडलं आणि प्रार्थना सभेनंतर केलेल्या भाषणात ते म्हणाले, “मुस्लिमांना त्यांच्या घरातून बाहेर काढलं जाऊ नये आणि हिंदू शरणार्थींनी कुठल्याही प्रकारच्या हिंसेत सहभागी होता कामा नये.”
दोन्ही देशांमधला फाळणीचा मुद्दा निकाली निघत नाही तोवर पाकिस्तानला 55 कोटी रुपये देऊ नये, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. खरंतर फाळणीनंतर दोन्ही देशांमध्ये भारत पाकिस्तानला विनाअट 75 कोटी रुपये देणार, असा करार झाला होता. यातले 20 कोटी रुपये पाकिस्तानला मिळाले होते. 55 कोटी रुपये देणं बाकी होतं.
पाकिस्तानने पैशांसाठी तगादा लावणं सुरू केलं होतं आणि भारत करार मोडू शकत नव्हता. दिलेलं वचन मोडता कामा नये, असं गांधीजींचं म्हणणं होतं. कारण तसं केल्यास द्विपक्षीय कराराचं उल्लंघन झालं असतं.
सरकारने गांधींच्या उपोषणाच्या दोन दिवसानंतरच पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आणि या घोषणेसोबतच गांधी कडव्या हिंदुत्त्वाद्यांसाठी खलनायक बनले. पाकिस्तानला 55 कोटी रुपये द्यावे, या गांधींच्या मताशी सरदार पटेलही सहमत नव्हते. कपूर आयोगाच्या चौकशीत पटेल यांची मुलगी मणीबेन पटेल साक्षीदार क्रमांक 79 म्हणून हजर झाल्या होत्या.
मणीबेन यांनी कपूर आयोगाला सांगितलं, “मला आठवतं की माझे वडील पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याच्या महात्मा गांधी यांच्या मताशी सहमत नव्हते. पाकिस्तानला ही रक्कम दिल्यास जनता नाराज होईल, असं माझ्या वडिलांना वाटायचं आणि पाकिस्तानसंबंधीच्या सर्व मुद्द्यांचं निराकरण झाल्यानंतरच ही रक्कम देण्यात यावी, असं आम्हाला वाटायचं.”
गांधींना मारणारे नथुराम गोडसे कोण होते ?
नथुराम गोडसे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील बारामती गावातले . चितपावन ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील विनायक वामनराव गोडसे हे पोस्ट खात्यामध्ये कामाला होते. मुळात नथुरामचं खरं नाव नथुराम नव्हतंच तर त्यांचं खरं नाव रामचंद्र होतं . त्यांना सर्व प्रेमाने नथुराम म्हणायचे.
नथुराम पाचवी पर्यंत गावात शिकले त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना पुण्यात पाठवले. नथुरामवर गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता. नथुराम गांधीजींना आदर्श मानायचे. १९३० दरम्यान नथुरामच्या वडिलांची रत्नागिरी येथे बदली झाली. त्यावेळी नथुरामसह त्याचे सर्व कुटूंब रत्नागिरीला आले आणि तिथे त्यांची स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याशी भेट झाली आणि मग नथुरामच्या आयुष्याला वेगळी वळण मिळालं.
गांधी हत्येनंतर नेमकं काय घडलं?
10 फेब्रुवारी 1949 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळच्या रस्त्यावर गाड्यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली होती. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.महात्मा गांधी हत्या प्रकरणाचा त्यादिवशी निकाल येणार होता. लाल किल्ल्याच्या आतच विशेष न्यायालय स्थापन करण्यात आलं होतं.
सकाळी बरोबर 11.20 मिनिटांनी नथुराम गोडसेसह इतर आठ आरोपींना कोर्टात आणण्यात आलं. यापैकी केवळ सावरकरांचा चेहरा गंभीर होता. नथुराम गोडसे, नारायण आपटे आणि विष्णू करकरे हसत हसत कोर्टात आले.काळा कोट घातलेले न्यायमूर्ती आत्माचरण 11.30 मिनिटांनी कोर्टात आले. आपल्या खुर्चीत बसताच न्या. आत्माचरण यांनी नथुराम गोडसेचं नाव घेतलं आणि गोडसे उठून उभे झाले. त्यानंतर एकापाठोपाठ एक सर्वांची नावं त्यांनी घेतली.
न्या. आत्माचरण यांनी गांधीहत्येसाठी दोषी ठरवत नथुराम गोडसे आणि नारायण आपटे यांना देहदंडाची शिक्षा सुनावली. विष्णू करकरे, मदनलाल पाहवा, शंकर किस्टया, गोपाळ गोडसे आणि दत्तात्रय परचुरे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
न्यायमूर्तींनी सावरकरांची निर्दोष मुक्तता करत त्यांना तात्काळ सोडण्याचे आदेश दिले.
न्यायालयाने निकाल सुनावताच आरोपीच्या पिंजऱ्यातून बाहेर येताना नथुराम गोडसेसह सर्वांनीच ‘हिन्दू धर्म की जय, तोड के रहेंगे पाकिस्तान आणि हिन्दू हिन्दू हिंदुस्तान’ अशी घोषणाबाजी केली. न्यायालयात घोषणाबाजी करण्याची नथुराम गोडसे यांची ही काही पहिलीच वेळ नव्हती.
लाल किल्ल्यात सुनावणी सुरू असताना 8 नोव्हेंबर 1948 रोजी साक्ष पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने नथुराम यांना तुम्हाला काही म्हणायचं आहे का, असं विचारलं. त्यावर गोडसे म्हणाले की त्यांना त्यांनी लिहिलेलं 93 पानी जबानी वाचायची आहे.
गोडसे यांनी 10.15 मिनिटांनी वाचायला सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी सांगितलं की हे भाषण सहा भागात आहे. पहिल्या भागात कट आणि कटाशी संबंधित गोष्टी, दुसऱ्या भागात गांधींचं सुरुवातीचं राजकारण, तिसऱ्या भागात गांधींच्या राजकारचा शेवटचा टप्पा, चौथा भाग गांधीजी आणि भारताचा स्वातंत्र लढा, पाचव्या भागात स्वातंत्र्याचं स्वप्न भंगणं आणि शेवटच्या भागात ‘राष्ट्र विरोधी तुष्टीकरण’ असल्याचं ते म्हणाले.
गोडसे यांनी प्रसार माध्यमांना विनंती केली की त्यांची जबानी संदर्भ न देता कुणीही छापू नये. 45 मिनिटं वाचून झाल्यावर गोडसे भोवळ येऊन पडले. काही वेळानंतर त्यांनी पुन्हा भाषण वाचायला सुरुवात केली. संपूर्ण जबानी वाचायला पाच तास लागले. वाचत असताना ते वारंवार पाणी पीत होते. गोडसे यांनी त्याचा शेवट ‘अखंड भारत अमर रहे’ आणि ‘वंदे मातरम’ या घोषणांनी केला.
चीफ प्रॉसिक्युटरने गोडसे यांचं हे भाषण कोर्टाच्या रेकॉर्डमधून काढण्याची विनंती केली. हे भाषण अजिबात महत्त्वाचं नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. यावर गोडसे कोर्टात म्हणाले की त्यांना भारताच्या वर्तमान सरकारवर अजिबात विश्वास नाही कारण हे सरकार ‘मुस्लीम धार्जिणे’ आहे. न्या. आत्माचरण यांनी गोडसे यांचं भाषण रेकॉर्डवरून काढण्यास नकार दिला आणि न्यायालयात लिखित साक्ष गृहित धरली जाते, असं सांगितलं. त्या दिवशीदेखील कोर्टात अलोट गर्दी होती.
9 नोव्हेंबर 1948 रोजी न्या. आत्माचरण यांनी गोडसे यांना 28 प्रश्न विचारले. एका प्रश्नाच्या उत्तरात गोडसे म्हणाले, “होय. गांधीजींवर गोळी मी झाडली. गोळी झाडल्यावर एका माणसाने मागून माझ्या डोक्यावर वार केला आणि रक्त येऊ लागलं. मी म्हणालो मी जी योजना आखली होती त्यानुसारच काम केलं आणि याचा मला अजिबात पश्चाताप नाही. त्याने माझ्या हातून पिस्तूल हिसकावलं. पिस्तूल ऑटोमॅटिक होतं आणि चुकून कुणावर गोळी झाडली जाऊ नये, अशी काळजी मला वाटत होती. त्या माणसाने माझ्यावर पिस्तूल रोखलं आणि म्हणाला मी तुला गोळी घालेन. मी म्हणालो माझ्यावर गोळी झाड. मी मरायला तयार आहे.”
Follow PRATILIKHIT
https://pratikpravinmhatre.com/
1 Comment