का झालं इस्रायलचं आर्यन डोम फेल??

का झालं इस्रायलचं आर्यन डोम फेल??

एक अभेद्य कवच मानली जाणारी इस्राईलची आर्यन डोम डिफेन्स सिस्टिम शनिवारी हमासने केलेल्या हल्ल्यापुढे अपयशी ठरल्याचं दिसून आलं. अपेक्षेपेक्षा जास्त रॉकेटचा मारा अत्यंत कमी वेळात झाल्याने ही डिफेन्स सिस्टीम ओव्हरलोड झाली.

गेल्या काही वर्षांपासून हमास ही दहशतवादी संघटना आर्यन डोमची दुर्बलता शोधण्यावर काम करत होती. यावेळी त्यांनी साल्व्हो रॉकेट अटॅकचा वापर करून इस्राईलची जगात सर्वात जास्त यशस्वी ठरलेली आर्यन डोम डिफेन्स सिस्टिम भेदली. साल्व्हो रॉकेट अटॅक पद्धतीमध्ये अत्यंत कमी वेळात मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रांचा मारा करून शत्रूच्या डिफेन्स सिस्टीमला चकवलं जातं आणि नियंत्रण यंत्रणेला सर्व लक्ष्ये रोखणे अवघड होऊन जातं. त्यामुळे पहिलं क्षेपणास्त्र निकामी करण्याच्या प्रयत्नात असताना  दुसऱ्या अनेक क्षेपणास्त्रांचा अचानक हल्ला होतो. यावेळी हमासने केवळ वीस मिनिटांमध्ये तब्बल पाच हजार रॉकेट्सचा मारा केला होता.

हमास सतत त्याचे क्रूड रॉकेट तंत्रज्ञान विकसित करत आहे आणि गेल्या काही वर्षांत त्याने तेल अवीव आणि अगदी जेरुसलेमसह इस्रायलमधील प्रमुख शहरे कव्हर करण्यासाठी आपली श्रेणी वाढवली आहे.

 

काय आहे आर्यन डोम?

इस्रायलवर रॉकेट हल्ल्याचा धोका ओळखून २००६ साली आयर्न डोम ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. यामुळे शत्रू राष्ट्राकडून डागण्यात आलेल्या रॉकेटला हवेतच नष्ट करण्यात येते.

कमी अंतरावर जमिनीपासून हवेत मारा करणारी ही एक हवाई सुरक्षा यंत्रणा (Air Defence System) आहे. ज्यामध्ये एक रडार आणि तामिर इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा (एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मारा करणाऱ्या बाबीला मध्येच अडवणारे क्षेपणास्त्र) समावेश आहे. या यंत्रणेचा वापर इस्रायलच्या दिशेने येणारे रॉकेट, तोफ (सी-रॅम) तसेच विमान, हेलिकॉप्टरचा हवेतच प्रतिकार करण्यासाठी केला जातो.

२००६ सालच्या इस्रायल-लेबनॉन युद्धामुळे आयर्न डोमची उत्पत्ती झाली. या युद्धावेळी लेबनॉनमधील हेजबुल्लाह दहशतवाद्यांनी इस्रायलवर हजारो क्षेपणास्त्र डागली होती. त्यानंतर इस्रायलने देशातील नागरिकांचे प्राण आणि शहरे वाचविण्यासाठी राफेल ॲडव्हान्स डिफेन्स सिस्टम कंपनीला नवीन हवाई सुरक्षा यंत्रणा निर्माण करण्याची जबाबदारी दिली. इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजने सदर यंत्रणा निर्माण केली.

२०११ साली अखेर आयर्न डोम यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. संबंधित यंत्रणेचा यश मिळण्याचा दर ९० टक्के असल्याचा दावा राफेल कंपनीने केला आहे. २००० पेक्षा जास्त क्षेपणास्त्रांना निकामी करण्याची क्षमता यंत्रणेत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार यंत्रणेचा यश मिळण्याचा दर ८० टक्क्यांच्या पुढे आहे. राफेलने त्यांच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, “हवाई हल्ल्यांपासून तसेच युद्धाच्या भूमीवर आणि शहरी भागांतदेखील यापासून संरक्षण केले जाऊ शकते.”

 

आर्यन डोम कसे कार्य करते?

आयर्न डोममध्ये तीन मुख्य प्रणाली कार्यरत आहेत. ज्या ठिकाणी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे, त्या ठिकाणी धोक्यांपासून संरक्षण देण्यासाठी या तिन्ही प्रणाली एकत्रितपणे काम करतात. यामध्ये डिटेक्शन आणि ट्रॅकिंग रडार (Detection and Tracking Radar आहे, जे नजीक येत असलेल्या धोक्याची सूचना देते. युद्ध व्यवस्थापन आणि शस्त्र नियंत्रण प्रणाली (Battle Management and Weapon Control System) आणि क्षेपणास्त्र डागण्याचा विभाग (Missile Firing Unit) अशा तीन प्रणाली आहेत.

दिवस असो किंवा रात्र आणि हवामानाची परिस्थिती कशीही असली तरी ही यंत्रणा चोखपणे आपले काम करू शकते.

कोणत्यारी एअर डिफेन्स सिस्टिमचे दोन महत्त्वाचे घटक असतात. “एक म्हणजे रडार, ज्या माध्यमातून छोट्यातला छोटा धोकाही ओळखता आला पाहिजे आणि दुसरे म्हणजे त्या धोक्याचा अचूकपणे माग काढणे.” आपल्या दिशेने येत असलेले धोके ओळखणे आणि त्याचा माग काढणे यासाठी दोन ते तीन प्रकारचे रडार आहेत, जे कोणत्याही एअर डिफेन्स सिस्टिममध्ये कार्यरत असतात. जेव्हा आपण शस्त्र प्रक्षेपित करतो, तेव्हा ट्रॅकिंग रडारच्या माध्यमातून त्याचा अचूक ठिकाणी मारा केला जातो. त्यानंतर शस्त्र स्वतःची जबाबदारी पार पाडते.

एकदा का क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले, त्यानंतर ते लक्ष्यापर्यंत पोहोचायला हवे, त्याने छोट्यातले छोटे लक्ष्य अचूक ओळखून त्यावर मारा करायला हवा. पण, प्रत्येकवेळी लक्ष्यावर थेट हल्ला होईलच, असे नाही. त्यामुळेच प्रत्येक क्षेपणास्त्रामध्ये प्रॉक्झिमिटी फ्यूज नावाची यंत्रणा बसवलेली असते. या यंत्रणेत लेझर नियंत्रित फ्यूज असतात. जेव्हा क्षेपणास्त्र लक्ष्याच्या आसपास दहा मीटर अंतरावरून जात असेल, तर ही यंत्रणा कार्यान्वित होते आणि क्षेपणास्त्राचा स्फोट होतो, ज्यामुळे लक्ष्याचे नुकसान होऊन ते नष्ट होते.

 

 

आर्यन डोमचा खर्च किती?

पूर्ण युनिटची किंमत ५० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त असू शकते. त्यातील एका इंटरसेप्टर तामीर क्षेपणास्त्राची किंमत जवळपास ८० हजार डॉलर आहे. याउलट यंत्रणेकडून निकामी करण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्राची किंमत ही १००० डॉलरपेक्षाही कमी असते. आपल्या सीमेवर आलेल्या क्षेपणास्त्राचा माग काढण्यासाठी आयर्न डोम यंत्रणेतून प्रत्येक वेळी दोन तामीर क्षेपणास्त्र सोडले जातात. या यंत्रणेसाठी लागणारा खर्च आणि त्यातून नष्ट करण्यात येणाऱ्या रॉकेटची किंमत याची तुलना करणे योग्य ठरणार नाही. खर्चिक असली तरी या यंत्रणेमुळे प्रतिबंधक उपाय राबविता येतात. शत्रूचे क्षेपणास्त्र निकामी केल्यामुळे अनेकांचा जीव वाचतो. तसेच शत्रूचे क्षेपणास्त्र आपल्या सीमेत न आल्यामुळे राष्ट्राचे मनोबलही वाढते.

 

का आहे इस्रायल-पॅलेस्टाईनमध्ये वाद?

इस्रायल आणि पॅलेस्टाईन हा वाद दुसऱ्या महायुद्धानंतर चालत आलेला आहे. अरब हे पॅलेस्टाईनमधील मूळ निवासी आहेत. पण ज्यूंसाठी इस्रायलची स्थापना झाली. संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावानुसार १९४७ ला हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्याअगोदरही बऱ्याच घटना घडल्या होत्या. ब्रिटिशांच्या मध्यस्थीने १९१७ ला ज्यूंसाठी स्वतःचं घर म्हणून पॅलेस्टाईनमध्ये जागा देण्यात आली, ज्याला बॅलफोर करार असं म्हटलं जातं. पहिल्या महायुद्धानंतर कोणाचं कोणत्या देशावर नियंत्रण असेल याची विभागणी ब्रिटनने केली, ज्यात ब्रिटनने पॅलेस्टाईन स्वतःला ठेवलं.

पहिल्या महायुद्धानंतर मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागलं. ज्यू ऑटोमन साम्राज्यात फक्त ३ टक्के होते, तर ३० वर्षातच ही लोकसंक्या पॅलेस्टाईनमध्ये ३० टक्क्यांनी वाढली. स्थानिक अरबी लोकांकडून ज्यू नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जागा खरेदी केली. काही वर्षांनी दुसऱ्या महायुद्धात ज्यूंचा युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात छळ करण्यात आला. ज्यूंची युरोपात अक्षरशः कत्तल करण्यात आली, ज्यूंना गॅस चेंबरमध्ये टाकून मारण्यात आलं. हा इतिहासातला मोठा नरसंहार मानला जातो. ४२ लाख लोक यावेळी मारले गेले असं सांगितलं जातं. ज्यू लोकसंख्या अत्यंत कमी असतानाही त्यापैकी ४२ लाख लोकांना मारण्यात आलं. यानंतर प्रत्येक ज्यू आपला जीव वाचवण्यासाठी इस्रायलकडे पळाला.

 

इस्रायलची निर्मिती

दुसऱ्या महायुद्धानंतर अस्तित्वात आलेल्या संयुक्त राष्ट्राकडे हा मुद्दा देण्यात आला. यावेळी इस्रायलच्या बाजूने प्रस्ताव मंजूर झाला. पॅलेस्टाईन आणि इस्रायल असं विभाजन करण्यात आलं. ज्यूंची लोकसंख्या जास्त असलेला भाग इस्रायलला, तर पॅलेस्टाईन अरबींना देण्यात आला. यासोबतच जेरुस्लेमचा मुद्दाही किचकट झाला. कारण, इथे निम्मी लोकसंख्या मुस्लीम, तर निम्मी ज्यू होती. त्यामुळे या भागावर आंतरराष्ट्रीय नियंत्रण ठेवण्यात आलं.

संयुक्त राष्ट्राकडून ही घोषणा होताच इजिप्त, सीरिया, इराक, ट्रान्स जॉर्डन या देशांनी इस्रायलवर हल्ला केला. पण नव्याने जन्म घेतलेल्या इस्रायलने धैर्याने या युद्धाचा सामना केला आणि या सर्व देशांना पिटाळून लावलंच, शिवाय त्यांची जागाही हिसकावून घेतली. १९४७ ला मिळालेल्या जागेपेक्षा जास्त क्षेत्रफळ इस्रायलने मिळवलं होतं. या युद्धात इस्रायलने स्वतःला वाचवलं असलं तरी मोठी समस्या समोर आली. या युद्धात इस्रायलमधून जवळपास ७ लाख लोकांनी स्थलांतर केलं आणि विविध देशात आसरा घेतला. यामुळे गाझावर इजिप्तने, तर वेस्ट बँकवर जॉर्डनने कब्जा केला, तर उर्वरित भागावर इस्रायलचा ताबा होता. त्यामुळे मूळ देश असलेल्या पॅलेस्टाईनचं अस्तित्वच धोक्यात आलं.

पॅलेस्टाईनची मागणी काय?

सध्या जेरुस्लेमचा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण, या शहरात ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्माचे प्रसिद्ध धार्मिकस्थळं आहेत. पण इस्रायलने या शहरावर नियंत्रण ठेवल्याने वाद निर्माण झाला आहे. जेरुस्लेमच्या पूर्व भागात मुस्लीम, पश्चिमेला ज्यू आणि मध्य भागात ख्रिश्चन लोकसंख्या जास्त आहे. मुस्लीम धर्माची मक्का आणि मदीना नंतरची सर्वात प्रसिद्ध मशिदही जेरुस्लेममध्येच आहे. संयुक्त राष्ट्राच्या करारानुसार, हे शहर इस्रायलला देण्यात आलेलं नाही. पण इस्रायलकडून हीच आपली राजधानी असल्याचा दावा केला जातो. पण जगाकडून याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. सर्व देशांचे दुतावास अजूनही तेल अविवमध्येच आहेत.

दुसरा मोठा मुद्दा हा पॅलेस्टाईन विस्थापितांचा आहे. जवळपास ५० लाख पॅलेस्टाईन नागरिक सीरिया, जॉर्डन, इजिप्त आणि इतर देशांमध्ये विस्थापित म्हणून राहतात. त्यामुळे भविष्यात कधीही शांतता करार झाला तर या पॅलेस्टाईन नागरिकांना देशात घेतलं जावं अशी पॅलेस्टाईनची मागणी आहे. पण इस्रायलचा यासाठी स्पष्ट नकार आहे. कारण, इस्रायलची लोकसंख्याच ८० लाख आहे, त्यात ५० लाख पॅलेस्टाईन नागरिकांना घेतलं तर सुरेक्षाचा मुद्दा निर्माण होईल, असं इस्रायलचं म्हणणं आहे.

 

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

का आहे भारत आणि कॅनडामध्ये वाद?

46822cookie-checkका झालं इस्रायलचं आर्यन डोम फेल??

Related Posts

Best Life Quotes in Marathi | 100+आयुष्याशी निगडित मराठी स्टेटस

Best Life Quotes in Marathi | 100+आयुष्याशी निगडित मराठी स्टेटस

का करावी शेतकऱ्यांनी आधुनिक शेती ?

का करावी शेतकऱ्यांनी आधुनिक शेती ?

लालबागचा राजा प्रसिद्ध असूनही का मिळतो मुंबईच्या राजाला प्रथम विसर्जनाचा मान?

लालबागचा राजा प्रसिद्ध असूनही का मिळतो मुंबईच्या राजाला प्रथम विसर्जनाचा मान?

का आहे भारत आणि कॅनडामध्ये वाद?

का आहे भारत आणि कॅनडामध्ये वाद?

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 125,702 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories