सिंघम 🦁

सिंघम 🦁

“चला बंडोजी, आज शेवटचं सारथ्य करा आमचं.” गाडीचं दार उघडता उघडता पालकर साहेब म्हणाले. साहेब आले म्हणून बंडू लगबगीने गाडीत बसला आणि त्याने गाडी स्टार्ट केली. पालकर साहेब. सरकारी पोलीस अधिकारी. गेल्याच वर्षी त्यांची ह्या गावी बदली झाली होती. लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मदत करणारे अधिकारी म्हणून ते पंचक्रोशीत ओळखले जात. अगदी सर्वसामान्य माणूससुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत होता. ते स्वतः लोकांमध्ये मिसळून त्यांची मते जाणून घेत त्यामुळे ते लोकांना त्यांच्यातीलच एक वाटत. बंडू गाडी चालवत होता खरा पण साहेबांनी ‘शेवटचं सारथ्य’ का म्हटलं हे काही केल्या त्याच्या ध्यानात येत नव्हतं.
न राहवून त्याने विचारलं.

“काय ओ साहेब. तुम्ही शेवटचं सारथ्य असं का म्हणालात?”

“बदली झालीये ना माझी. आजच लेटर आलं”

“बदली?? अशी अचानक??”

“अचानक नाही तसं म्हणायला गेलं तर. मागे ती सतीश भाईच्या मुलाची केस आली होती ना. तेव्हाच मला जरा वाटलं होतं की आपली आता उचलबांगडी होणार म्हणून.” साहेब थोड्या विचारातच म्हणाले.

“म्हणजे ओ साहेब?? मला नाही कळलं.”

“अरे मागच्या महिन्यात आपण नगरसेवक सतीश भाईच्या मुलाला अटक केली ना. बलात्काराच्या प्रकरणात. त्याला अटक केली आणि काही वेळातच मोठ्या साहेबांचा फोन आला. की काही एफआयआर वगैरे दाखल करू नका लगेच म्हणून. पण तरीही मी केला आणि कोठडीत टाकलं ना. तेव्हाच माझ्या मनाची तयारी झाली होती की बदली होईल म्हणून. हे काही नवीन नाही माझ्यासाठी. इतक्या बदल्या तशाच झाल्या आहेत.”

“गेला असेल एखाद्या बड्या नेत्याचा फोन मोठ्या साहेबांना.”

“असेल. काय माहित? हुकुमाचे ताबेदार ना आम्ही. एक दुसऱ्याचा, दुसरा तिसऱ्याचा. ”

“पण हे चुकीचं आहे ना साहेब. म्हणजे गुन्हा घडला. त्या मुलीच्या बापाने आणि मुलीने तक्रार केली. तरीसुद्धा आपण काहीच करायचं नाही का?? मूग गिळून गप्प बसायचं का?”

“प्रश्न बरोबर आहे तुझा. अगदी तुझ्याच सारखा प्रश्न सर्वसामांन्याही पडत असेल. पण काय आहे ना वरून ऑर्डर आली ना की आपलेही हात दगडाखाली येतात.”

“पण साहेब. तुम्ही ह्या गोष्टीचा विरोध नाही केला कधी? कधी तुम्हाला हे बदलावंसं नाही वाटलं.”

“किती तरी वेळा विरोध केला रे. तुला काय वाटतं माझ्या इतक्या बदल्या कशासाठी झाल्या? विरोध केला की झालीच बदली. वरिष्ठांच्या ताटाखालचं मांजर बनून राहावं लागतं”

“पण वरिष्ठ तरी असे का वागतात??”

“बघ. कसं आहे ना. प्रत्येकाच्या नाड्या ह्या कुणा न कुणाच्या हातात असतात. म्हणजे जर तुम्ही कॉर्पोरेट मध्ये असाल तर तुमचं प्रमोशन तुमच्या बॉसच्या हातात असतं. तुम्हाला जर कामावरून काढून टाकलं, किंवा तुम्हाला काम आवडत नसेल तर तुम्ही एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत जाऊ शकता. पण पोलिस कसं करणार ना तसं. सगळ्यांना थोडीच सिव्हिल सर्व्हिस मध्ये वगैरे जाता येतं. पोलीस तसे मध्यमवर्गीय कुटुंबातलेच. त्यांच्या नोकरीवरच तर घर चालतं ना त्यांचं. मग जर त्यांनी विरोध केला आणि त्यांची नोकरी गेली तर त्यांच्या घरादाराचं काय. बाकीच्यांना त्याचं काही सोयरसुतक नसतं रे.”

“पण सर्वसामान्य लोकांची हीच धारणा असते की पोलीस हा त्यांच्या संरक्षणासाठी असतो. आणि त्यांच्यावर जर गुन्हेगारांना पाठीशी घालायची वेळ आली तर कसं चालणार.” बंडू गाडी हळू करत म्हणाला.

“चुकीचं बोललास तू. सर्वसाधारण लोकांच्या मनात ही भावना असते की पोलीस त्यांच्या संरक्षणासाठी नसून त्यांना लुटण्यासाठी आहे. म्हणूनच तर जेव्हा नाक्यावर एखादा ट्रॅफिक पोलीस उभा दिसतो तेव्हा लोकं त्यांचा मार्ग बदलतात. कुठे नाकाबंदी करण्यात आली असेल तर लोकांना लुटण्यासाठी ती केलेली आहे असा सर्वसामान्य जनतेचा समज असतो. आणि हे मी सांगत नाही हा. तर मी हे स्वतःच्या कानांनी ऐकलंय आपल्या ऑफिसमध्ये. मागच्याच महिन्यात एक वृद्ध आले होते. त्यांचं काहीतरी काम होतं. बराचवेळ बसून होते पण कुणी लक्ष दिलं नाही तेव्हा मी त्यांना माझ्या केबिनमध्ये बोलावलं. त्यांनी माझ्यासमोर पैशाचं पुडकं ठेवलं व म्हणाले ‘साहेब सध्या एवढेच पैसे आहेत हो माझ्याकडे. जमिनीची केस कधी पासून दाखल केलीये पण कुणीच लक्ष देत नाही. अजून पैसे हवेत का तुम्हाला??’ म्हणजे ही अशी इमेज आहे आपली लोकांमध्ये.”

“हे मात्र बरोबर आहे साहेब.”

“हे सगळं जर बदलायचं असेल तर त्याची सुरुवात आपल्या पासून नाही तर ह्या सिस्टीमच्या पिरॅमिडच्या वरच्या टोकापासून व्हायला हवी. निवडून दिलेले राज्यकर्ते, नेते, अधिकारी हे सत्ताधारी नाही तर जनतेचे सेवक म्हणून तिथे बसले आहेत ह्याची जाणीव त्या सगळ्यांना व्हायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज स्वतःला जनतेचे सेवक म्हणवत, जनतेचे राज्य म्हणून स्वराज्याचा वेळोवेळी उल्लेख करत पण आपल्या इथे नेते,अधिकारी जनतेला त्यांचे सेवक समजतात. जनतेने त्यांच्या समोर नाक घासलं पाहिजे, त्यांच्या समोर पदर पसरला पाहिजे असं त्यांना वाटतं. आणि अशा मोठ्या लोकांच्या हाताखालची माणसं स्वतःला काय मोठे दादा समजतात. अगदी त्यांच्याकडे हलकं काम करणारा माणूस सुद्धा त्याच्या एरियामध्ये भाई म्हणून संबोधला जातो. आपला बाप किंवा आपला साहेब अमुक अमुक आहे ह्या ब्रिदवाक्यावर सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे प्रकार काही कमी नाहीयेत. हल्लीच मागच्या महिन्यात घडलेली काही ताजी उदाहरणं आहेत ना. वडील मंत्री आहेत म्हणून नियम तोडून बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर दादागिरी करणारे पाहिलेस ना तू.”

“पण बरेच जण म्हणजे अगदी सर्वसामान्य कुटुंबातील लोकं ही परिस्थिती बदलावी म्हणून मोठमोठ्या परीक्षा देतात. पण मग ते सुद्धा असा बदल का नाही घडवू शकत?”

“बघ. सगळ्यांच्याच वाटेला असे कटू अनुभव नाही येत. असं समज तुझी एखाद्या ठिकाणी पोस्टिंग झाली. त्या ठिकाणचा एकदा लोकल गुंड किंवा लोकल नेता आहे . त्याला जनतेचा सपोर्ट आहे. त्याचे बरेच बेकायदेशीर धंदे चालतात. पण तो तिकडचा दादा म्हणून तिथे असलेले सगळे पोलीस त्याच्या खिशात आहेत. अशा वेळी तू एक तडफदार पोलीस म्हणून तिथे जॉईन झालास. तुझा सगळं कारभार कायदेशीर. त्याच्या ह्या बेकायदेशीर धंद्याची कुणकुण तुला लागली. तू त्याचा धंदा बंद केलास. त्याने तुला लाच देऊ केली. तू ती घेतली नाहीस. त्याने सर्वतोपरी तुला मॅनेज करायचा प्रयत्न केला. पण तू बदलला नाहीस. आणि केस दाखल केलीस. त्याने तो ज्याही हांजी हांजी करतो त्याला ह्याबद्दल सांगितलं. त्याने वरती सांगितलं आणि मग तुझ्यावर प्रेशर आणायचा प्रयत्न केला गेला. तुझं कुणी ऐकून घेत नसेल आणि तुझ्या वरिष्ठांनीही तुला ह्यातून बाहेर पडायचा आदेश दिला पण तू त्यांचं काही ऐकलं नाहीस. तुझं काय होणार पुढे ?? बघ ही जर एका पिक्चर ची स्टोरी असती ना तर त्यामध्ये तू ह्या सिस्टीमच्या विरोधात लढून जिंकला असतास. पण खऱ्या आयुष्यात होत नाही ना तसं. तू अडसर ठरतोयेस अशी शंका जरी आली ना तरी तुला पद्धतशीरपणे बाजूला केलं जातं. तुला वाटेल की तू मीडियाकडे जाशील. मीडिया काही काळ उचलून धरेल तुला आणि त्यांच्यावर त्यांचं चॅनेल वाचवायची वेळ आली ना की तुझी बातमी कशी गायब करतील तुला कळणार पण नाही.”

“मग लोकांना न्याय मिळतो की नाही?”

“मिळतो ना. जेव्हा एका पॉवरफुल व्यक्तीच्या विरुद्ध दुसरी पॉवरफुल व्यक्ती उभी असते. त्यांना मिळतो ना न्याय. सामान्य जनतेला मात्र केस उभी करण्यापासून धडपड करावी लागते. तिकडून जो त्यांचा संघर्ष सुरु होतो तो निकाल लागेपर्यंत सुरूच असतो. आणि बऱ्याचदा निर्णय लागेपर्यंत आरोपीचा शिक्षा भोगायचा काळ पूर्ण झालेला असतो किंवा तो मेलेला असतो.

“पण मग साहेब यावर काही उपाय नाही?? सर्वसामान्य जनतेने भोगतच राहायचं??”

“आहे ना. पण तो जनतेपेक्षा वर जे बसतात ना त्यांच्या हातात आहे. त्यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करणं थांबवायला हवं. त्यांच्या हुद्द्याचा, त्यांच्या पॉवरचा उपयोग स्वतःचा खिसा भरण्यासाठी न करता जनतेच्या कल्याणासाठी करायला हवा. त्यांनी केवळ खुर्चीवरच बसून न राहता जनतेमध्ये मिसळून जनतेशी संवाद साधायला हवा. तरच ते जनतेचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवू शकतात. त्यांनी स्वतःला मालक न समजता ह्या जनतेचा सेवक समजायला हवं. आणि त्यांच्या हाताखालच्या माणसांना, त्यांच्या नातेवाईकांना पाठीशी न घालता त्यांनाही सर्वसामान्य नागरिकासारखं वागवायला हवं. जो पर्यंत हा बदल त्यांच्यामध्ये होणार नाही; तू,मी किंवा इतर कुणीही कितीही डोकं फोडलं तरी काहीही बदल होणार नाही. आणि हा बदल स्वेच्छेने व्हायला हवा. कुणाच्या बळजबरीने नाही. तरंच हे सगळं थांबेल. तो पर्यंत हे सगळं असच सुरु राहणार आणि आपण सगळे त्यात असेच भरडले जाणार.”

© PRATILIKHIT

14380cookie-checkसिंघम 🦁

Related Posts

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

2 Comments

Leave a Reply

Blog Stats

  • 123,226 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories