आत्महत्या : अडचणीवरचा उपाय की निव्वळ एक पळवाट ??

वाढत चाललेलं आत्महत्यांचं प्रमाण..ते ही हल्लीच्या तरुण पिढीमध्ये. इतकी वर्षे जी गोष्ट आपण हसण्यावारी नेली आता तीच गोष्ट गांभीर्याने घेण्याची वेळ आलेली आहे. मागच्याच आठवड्यात एकाच परिसरातील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. एकाच वय बावीस वर्षे तर एकाच सव्वीस. या आत्महत्यांचं नेमकं कारण जरी कळलेलं नसलं तरी या घटनेमुळे तरुण पिढीमध्ये वाढत चाललेल्या आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
या सर्व घटनांमुळे आजच्या पिढीच्या क्षमतेवर असं प्रश्नचिन्ह उभं केलं जातंय की आताची पिढी ही मानसिक ताण तणाव सांभाळण्यासाठी किंवा एखाद्या दडपणाखाली कोणताही निर्णय घेण्यासाठी सक्षम नाही. पण आजच्या पिढीतलाच एक तरुण म्हणून मला हा दावा खोडून काढावासा वाटतो. मान्य आहे की तरुण आत्महत्या करतायेत पण त्यामागची नेहमी कारणं शोधून काढणं महत्वाचं आहे. त्यांना त्यांचं जीवन संपवाव असं का वाटतं, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या त्यांना एवढा मोठा निर्णय घेण्यासाठी भाग पाडतात हे शोधून काढायला हवं. अनेक मानसोपचार तज्ञांनी या मागची कारणं शोधली असली तरी आत्महत्यांचं प्रमाण तसूभरही कमी झालेलं नाही.
परीक्षेत नापास झाल्यामुळे किंवा ब्रेकअप झाल्यामुळे हल्लीची मुलं आत्महत्या करतात असं आपल्याला वरचेवर ऐकायला मिळतं. पालक आपल्या मुलांकडून बऱ्याच अपेक्षा ठेवून असतात आणि त्या पूर्ण करू शकलो नाही म्हणून त्या दडपणाखाली अनेक मुलं आत्महत्या करतात. जर आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर आपल्या मुलाने आत्महत्या करावी असं कोणत्याही पालकांच्या मनात नसतं. केवळ पालक आणि विद्यार्थी या दोघांमध्ये हवा तसा संवाद घडत नसल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर एक दडपण येतं. यावर उपाय हाच की प्रत्येक पालकाने आपल्या मुलाशी किंवा मुलीशी या बाबतीत मोकळेपणाने बोललं पाहिजे. ज्यामुळे त्याला असलेल्या अडचणी तो त्यांच्या पालकांसमोर त्याच्या पद्धतीने मांडू शकेल.
दुसरं सर्वश्रुत कारण म्हणजे ब्रेकअप. पण त्यामध्ये आत्महत्या करण्यासारखं काहीच नाहीये असं मला तरी वाटतं. रिलेशनशिप ही चांगलीच गोष्ट आहे पण नेहमीच वर्क होईल असंही काही नाही. याबाबतीत पालकांपेक्षा मित्रांची भुमिका जास्त महत्वाची असते. कारण आपल्या मित्राची गर्लफ्रेंड किंवा त्याच्या रिलेशनशिप मधल्या अडचणी या बाबतीत त्याच्या पालकांपेक्षा त्याच्या मित्रमैत्रिणींनाच जास्त ठाऊक असतात. आणि त्याच्यासोबत या गोष्टी शेअर करायला त्यांना जास्त सोपं जातं. त्यामुळे आपल्या कोणत्या मित्राची मानसिक स्थिती नेहमीपेक्षा वेगळी वाटत असेल तर दुर्लक्ष न करता त्याला समजून घेऊन समजावणं जास्त महत्वाच असतं. अर्थात ही केवळ त्यांचीच जबाबदारी आहे असं नाही तर तुम्ही अशा मनस्थिती मधून जात असाल तर गप्प बसण्यापेक्षा तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते समोरच्याशी बोलल्याने त्या अडचणी नक्कीच दूर होऊ शकतात. फक्त आपल्याला व्यक्त होण्याची गरज आहे. आतल्या आतच गुरफटून जाण्यापेक्षा मनातल्या गोष्टी बाहेर काढणं केव्हाही चांगलं.
इतरही अनेक कारणं असू शकतात पण सगळ्या गोष्टींचा उलगडा होणं जरा कठीणच.. जर ह्या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार केला आणि त्यावर वेळीच उपाय शोधला तरच ह्या गोष्टीला आळा बसू शकतो.
© PRATILIKHIT

No Comment