नियती….पर्व दुसरे ( भाग २१)

पोंमुडीच्या ट्रिप नंतर रश्मी आणि विराजस यांचं चांगलच जमायला लागलं होतं. त्यातच मागची ट्रिप विराजसने एकदम छान प्लॅन केल्याने सर्वांना त्यानेच पुढची ट्रिप प्लॅन करावी असा सगळ्यांचा हट्ट होता. नाग विराजसनेही फार आढेवेढे न घेतला निखिल आणि त्यांच्या जीआर च्या मदतीने पुढचं ठिकाण शोधायला सुरुवात केली. एक दोन दिवस शोधल्यानंतर मग विराजसने डीलरला फोन करून हाऊसबोट ची चौकशी केली आणि घासाघीस करून पुढील आठवड्याचा अँलिपी ला जायचा प्लॅन नक्की केला.

अँलिपीला जाण्याआधी आगाऊ पैसे भरणे गरजेचे होते. कारण जर पैसे भरायला उशीर केला असता तर त्यांना आयत्या वेळेवर हाऊसबोट मिळाली नसती आणि विराजसचा याची पक्की कल्पना होती. म्हणून त्याने सगळ्यांच्या मागे लागून आगाऊ रक्कम जमा करून दोन हाऊसबोट ठरवून टाकल्या. रश्मीच्या ग्रुपकडून पैसे जमा करण्याची जबाबदारी त्याने रश्मीकडेच सोपवली होती. त्या निमित्ताने त्या दोघांमधली मैत्री बऱ्यापैकी वाढली. अँलिपीला दोघांचेही ग्रुप एकाच हाऊसबोट वर राहणार असं त्यांनी आधीच ठरवून ठेवलं होतं. विराजस आणि रश्मी दोघांचेही ग्रुप अजूनही त्यांच्या मैत्रीबद्दल अनभिज्ञ होते.कधी एकदा शनिवार होतो आणि अँलिपीला पोहोचतो असं त्यांना झालं होतं.

पण तिथे पोहोचले आणि पाहतो तर काय…डीलरने सगळा घोळ करून ठेवला होता. तिथे दोन मोठ्या आणि एक छोटी अशा तीन हाऊसबोट तयार होत्या. विराजसने बराच वाद घातला. पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. आणि त्या लहान बोटीवर कोणीही जाण्यासाठी तयार नव्हतं. विराजसने आजूबाजूला पाहिलं. निखिल आणि त्याच्या ग्रुपचे सगळे मेंबर एका बाजूला उभे होते. विराजसचं लक्ष जाताच निखिलने त्याला तिथे बोलावलं.

” वीरा…आपण जाऊ त्या बोटीवर..बोट लहान असली तरीसुद्धा एकदम मस्त आहे. आपल्याला दोन रूम खूप झाल्या..आणि शिवाय सगळ्यांची कटकट सुद्धा नाही..आपण आपलं मस्त एन्जॉय करू…”
विराजसने सगळ्यांवरून नजर फिरवली. सगळ्यांनीच मूक संमती दिल्याने विराजसला मान्य करावंच लागलं. आणि थोड्याच वेळात त्या तीनही बोटी वेगवेगळ्या दिशेने भ्रमंती करण्यासाठी रवाना झाल्या.

अँलिपीला हाऊसबोट मध्ये राहणं हे प्रत्येक ट्रॅव्हलरचं स्वप्न असतं. बोट धावत असताना पाण्यावरून येणारी ती थंडगार वाऱ्याची झुळूक, मध्येच कोसळणारी एखादी पावसाची बारीक सर, आणि त्यात आजूबाजूला दिसणारी हिरवीगार झाडी..मुख्यतः नारळाची…स्वर्गसुख अनुभवल्याचा भास होतो.

बराच वेळ फिरून झाल्यावर तीनही बोट शेवटी एका जवळ येऊन थांबल्या. पण यातही नशीब थोडंस परीक्षा घेतंच होतं. रश्मीची बोट एका बाजूला होती, त्याच्या बाजूला दुसरी बोट आणि दुसऱ्या टोकाला विराजसची बोट. एका बोटीतून दुसऱ्या बोटीमध्ये जावं म्हणजे दिव्यच होतं. बोटीला असलेल्या मोठ्या खिडकीतून बाहेर पडायचं… आणि समोरच्या बोटीची खिडकी येईपर्यंत बोटीच्या बाजूला बांधलेल्या बांबूवरून चालत तिथपर्यंत पोहोचायचं..यात जरा जरी तुमचा अंदाज चुकला तर सरळ पाण्यात बुडलाच म्हणून समजा..कारण तीनही बोटी एकमेकांच्या बऱ्यापैकी जवळ होत्या. पाण्यात पडलं तर योग्य ठिकाणी डोकं वर काढता आलं तर ठीक नाहीतर पडलेला बोटीखालीच अडकून पडण्याची भीती. त्यातच त्या पाण्यात अनेक प्रकारच्या वेली फोफावलेल्या. पण शेवटी मुंबईचं रक्त ते..कसं शांत बसणार..मुली सोडुन विराजससकट सगळेच हे जलदिव्य पार करून तिसऱ्या बोटीवर पोहोचले. ती बोट मोठी असल्यामुळे डीजे ची सोय त्याच बोटीवर केलेली होती. एका बाजूला सगळे नाचत होते तर दुसऱ्या बाजूला विराजस, सुजित आणि इतर दोन तीन जण पत्त्यांचा डाव मांडून बसले होते. अक्षय बोटीच्या टोकाला उभा राहून आजूबाजूचा परिसर निरखत होता.

डीजेच्या निमित्ताने थोडावेळ का होईना दोन्ही ग्रुप एकत्र येऊन नाचत होते. साडेनऊ वाजले तसा विराजस आणि त्याचा ग्रुप त्यांच्या बोटीवर जायला निघाले. पुन्हा एकदा जलदिव्य पार करायला. कारण एकदा का त्यांची बैठक बसली की नंतर हे दिव्य पार करणं थोडं कठीणच होतं. शिवाय मुलीही त्या बोटीवर कंटाळून गेल्या होत्या.

रात्री जेवल्यानंतर या सगळ्याची धमाल चालू होती. हिमांशी सोडून बाकी सगळे जण मैफिलीचा आनंद घेत होते. हिमांशीला थोडी कणकण असल्याने तिने आराम कारण पसंत केलं. दंगा चालू असतानाच त्यांना झोप लागली. विराजस आणि निखिल मात्र जागे होते. त्यांना काही केल्या झोप येत नव्हती. मग ते दोघे वरती जाऊन गार हवा अंगावर झेलत होते. अशा शांत आणि थंडगार वातावरणात विराजसला सिगारेट पेटवायचा मोह आवरला नाही आणि मग निखिल आणि तो सिगारेटचे झुरके घेत वरतीच बसून राहिले.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना परतीचा प्रवास करायचा होता. साडेदहा वाजता बोट किनाऱ्याला लागल्यावर ते आपापल्या बस मध्ये बसले आणि जाता जाता रस्त्यात येणाऱ्या अँलिपी बीच वर थोडावेळ थांबून पुन्हा आपल्या हॉस्टेलकडे रवाना झाले.

क्रमशः

6950cookie-checkनियती….पर्व दुसरे ( भाग २१)

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

संसार

संसार

वाटणी

वाटणी

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 114,924 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories