संसार (भाग २)

संसार (भाग २)

“नंदिनी… आज अक्षय भेटला होता मला. तू काही सांगितलं नाहीस आम्हाला तुमचं काय ठरलं ते.” समर्थने नंदिनीच्या रूममध्ये येत विचारलं.

“मी सांगणारच होते दादा तुला….” नंदिनी अडखळत म्हणाली.

“कधी?? वेळ निघून गेल्यावर??”

“म्हणजे???”

“म्हणजे अक्षयसारखं इतकं चांगलं स्थळ तुला हातून घालवायचंय का???”

“माझी जी इच्छा होती ती मी त्याला बोलून दाखवली, त्याला ती मान्य नाही तर पुढे विचार करण्यात काय अर्थ ना.” नंदिनी खांदे उडवत म्हणाली.

“पण तुझ्या मनात ती इच्छा आलीच का?? तुला का वेगळं राहायचंय??” समर्थने थेट प्रश्न केला.

“स्वतःची स्पेस असली की जरा बरं असतं ना.”

“मग मी आणि किर्तीने उद्या हाच विचार केला तर चालेल तुला???”

“तू का करशील असा विचार?? इथे तुला तुमची स्पेस मिळते ना… आपले आई बाबा तर किती चिल आहेत…”

“मग अक्षयच्या आईबाबांचा काय प्रॉब्लेम आहे तुला???”

“अरे तो म्हणाला होता मला की त्याचे आईबाबा थोडे स्ट्रिक्ट आहेत असं.”

“मग काय झालं ना… लग्न फक्त दोन माणसंच नसतं गं, दोन कुटुंबांचं असतं. दोन्ही बाजुंनी जुळवून घ्यावच लागतं.”

“अरे पण नंतर प्रॉब्लेम होऊ शकतो ना…”

“असं नसतं गं. बघ, प्रत्येक वेळी तुला सासू सासऱ्यांचं म्हणणं पटेलच असं नाही, आणि ते पटावं अशी अपेक्षाही करत नाही मी. कारण आपल्या आईबाबाच्या वयाचे लोकं आणि आपल्यात एक जनरेशन गॅप आहे, आणि तो कायम राहणार. आता तुला खरं सांगायचं झालं तर किर्तीलाही आपल्या आईच्या बऱ्याचशा गोष्टी पटत नाहीत. अगदी आपल्याला तरी कुठे पटायच्या?? म्हणून काय आपण घर सोडून गेलो का?? आपण जेवढं आपल्याला पटलं तेवढं ऐकलं, जे नाही पटलं त्याकडे कानाडोळाच केला ना. तसंच कीर्तीसुद्धा करतेय. घर टिकवून ठेवावं गं. हं, जर तुला पर्यायच नसेल वेगळं राहण्यावाचून ठीक आहे. पण अक्षयशी लग्न झाल्यावर तुला वेगळं राहण्याची काहीही गरज नाहीये असं मला तरी वाटतं. कारण त्याचं घर आपल्याच शहरात आहे, ते सुद्धा दोन बीएचके. फक्त तुला त्याच्यासोबतच त्याच्या आईवडिलांशीही जुळवून घ्यावं लागेल इतकंच. आणि सवय झाली की काही वेगळं वाटत नाही गं. कीर्तीसुद्धा जमवून घेतेच ना..”

“पण तुमचं किती छान चाललंय ना सगळं…”

“असं तुला वाटतंय. एक गोष्ट लक्षात ठेव की बायको आणि आई यामध्ये पुरुषाचं बिचाऱ्याचं मरण असतं. बायकोचं ऐकलं तर आईला वाईट वाटतं आणि आईची बाजू घेतली की बायकोला वाईट वाटतं. दोघींना खुश ठेवणं म्हणजे तारेवरची कसरत असते गं. ती तुला नाही कळणार. आपल्या आई आणि किर्तीमध्येसुद्धा कितीतरी मतभेद होतात. अर्थात त्यात चूक दोघींचीही नसते. कारण दोघीही आपापल्या जागी बरोबर असतात. आता ह्या वेळी होतं असं की कुणीतरी एकाने नमतं घ्यावं लागतं. शब्दाला शब्द वाढला की वाद होतात. म्हणून मग अशावेळी कीर्ती मौन बाळगणं पसंत करते. अर्थात आमच्यात त्याबद्दल बोलणं होतं पण तो पर्यंत सगळं वातावरण निवळलेलं असतं. तेवढ्यापुरतीच असतात गं भांडण. घर म्हटलं की भांड्याला भांड लागणारच. ते काय अन्याय नाही करणार आहेत तुझ्यावर.”

“पण दादा, मला वेगळं राहावंसं वाटत असेल तर माझं काय चुकलं??”

“बघ, मागे तू मला म्हणाली होतील की मुली त्यांच्या आईवडिलांपासून दूर जातात मग मुलांनी जायला काय हरकत आहे. मुलंही जातातच की त्यांच्या आईवडिलांपासून लांब. जॉब साठी वगैरे जवळपास साठ टक्के मुलं त्यांच्या घरापासून लांब असतात. कारण त्यांना पर्याय नसतो. आणि मुलीने लग्न होऊन मुलाच्या घरी जावं की रितच आहे गं. आणि ही सगळ्याच धर्मात सारखीच आहे. धर्मातच कशाला सगळ्याच सजीवसृष्टीची रीत आहे ती. ”

“हं… माझा निर्णय चुकला का???”

“बघ, निर्णय तुलाच घ्यायचाय. पण बरं झालं की तू तुझ्या मनातलं आधीच अक्षयला सांगितलं. लग्नानंतर सांगितलं असतं तर कदाचित प्रॉब्लेम झाला असता. पण अक्षयसारखा मुलगा तू गमावू नये असं मला तरी वाटतं. तू विचार कर. हवं तर किर्तीशी सुद्धा बोल. तिचं आणि तुझं चांगलं जमतं ना. काय ते ठरव पक्कं. मी अक्षयला सांगितलंय तुला थोडा वेळ द्यायला. तुझा निर्णय झाला की मग मी अक्षयला फायनल काय ते सांगेन. ”

“ठीक आहे. थँक यू..” नंदिनी हसतच म्हणाली.

“अगं वेडाबाई, चल आता जेवायला. आई हाक मारत होती.” समर्थ बेडवरून उठत म्हणाला.

“हो.” एवढं बोलून नंदिनी त्याच्याबरोबर निघाली पण समर्थशी बोलल्यावर मनोमन तिचा अक्षयशीच लग्न करण्याचा निर्णय पक्का झाला होता.

©प्रतिलिखित

24650cookie-checkसंसार (भाग २)

Related Posts

संवाद

संवाद

संसार

संसार

वाटणी

वाटणी

शहीद

शहीद

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 125,541 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories