नियती….(भाग ९)
इव्हेंटचं लोकेशन ठरलं आणि मग पुढच्या कामात तर अविनाश आणि रश्मी निष्णात…बाकीचं सगळं सेट अप करायला त्यांना फार काही मेहेनत करावी लागली नाही. इव्हेंट एकदम मस्त पार पडला आणि त्यांना सगळ्यांची वाहवाह सुद्धा मिळाली. त्यांच्या या इव्हेंटचा पुढे कंपनीला नक्कीच फायदा होणार होता. त्यामुळे राजसुद्धा त्यांच्यावर एकदम खुश होता.
इव्हेंट संपल्यावर अविनाशने रश्मीला त्यांचा वीकएन्डचा प्लॅन सांगितला. सलग तीन दिवस सुट्टी असल्यामुळे त्यांचा संपूर्ण ग्रुप बाईक घेऊन शेगावला जाणार होते. तसे ते सगळे बॅचलर्स… पण तरी सुद्धा शेगाव बद्दल बरंच काही ऐकून असल्यामुळे यावेळी त्यांनी तिथे जायचं ठरवलं. शेगावचा प्रवास तसा लांबचाच…पण अविनाश आणि त्याचे मित्रमंडळीही तसेच हौशी…आता रश्मीवर एक जबाबदारी येऊन पडली. ट्रीपला जाण्यासाठी घरून परवानगी कशी काढायची. देवदर्शनाच्या नावाखाली जायचं सांगितलं तरी बाईकने एवढ्या लांब जाण्यासाठी तिला घरून कधीच परवानगी मिळाली नसती. शेवटी बरंच डोकं चालवल्यावर तिला मार्ग सुचला.
” आई…….बाबा आले का ???” रश्मीने चप्पल काढता काढता दारातूनच विचारलं.
” नाही अजून…आज आल्या आल्या तुला बाबांची कशी काय आठवण आली…”
” आठवण वगैरे नाही ग…”
‘ बाबा नाही आहेत तो पर्यंत आईला पटवलेलं बरं… नंतर तिला आपल्या साईड ने घेता येईल.’ रश्मी मनात म्हणाली.
” आई…पुढच्या आठवड्यात लॉंग विकएन्ड आहे ना…तर ऑफिस मधले सगळे शेगावला जाणार आहेत….”
” बरं मग ??”
” मग मी पण जाईन म्हणते…”
” तू विचारतेय की सांगतेय…” रश्मीची आई तिला पाण्याचा ग्लास देत म्हणाली.
” दोन्ही…विचारतेय पण आणि सांगतेय पण…” रश्मी एकदम निरागस चेहरा करत म्हणाली.
” तू आणि तुझे बाबा दोघे बघा काय ते…मला उगाच मध्ये घेऊ नकोस…”
” पण तू सांगितलंस तर ते नाही म्हणणार नाही….”
” मी काहीही सांगणार नाही…तुला जायचंय तर तूच विचार…”
” बरं… बघते विचारुन..पण तू सुद्धा थोडा मस्का मारायला मदत कर हा….” रश्मी लाडीकपणे म्हणाली.
रात्री रश्मीचे बाबा घरी आले. आज त्यांना जरा उशीरच झाला यायला. चेहऱ्यावरून ते जरा त्रासलेले वाटत होते. सकाळी लवकर उठायचं, एवढा प्रवास करून कामाला जायचं, दिवसभर काम आणि मग परत गर्दीमध्ये प्रवास..जसे आपण वैतागतो तसे ते सुद्धा वैतागायचे. ‘आता जर बाबांना विचारलं तर ते काहीही विचार न करता सरळ नाही म्हणणार..’त्यापेक्षा उद्या सकाळीच विचारलेलं बरं.’ रश्मीने मनोमन विचार केला. जेवत असताना आईने तिच्याकडे पाहिलं तर तिने खुणेनेच आईला नकार दिला.
सकाळच्या चारच्या गजराने तिला जाग आली. तसं ती नेहमी उशिराच उठायची पण तिचे बाबा लवकर जायचे ना..म्हणून मग आज तीसुद्धा लवकर उठली. ती बाहेर आली तेव्हा तिचे बाबा टीव्ही समोर बसून चहा पीत होते. रश्मीला या वेळेला बाहेर पाहून त्यांना आश्चर्यच वाटलं.
” रश्मी…आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय..तू एवढ्या लवकर उठलीस….?”
” काही खास नाही बाबा…सहजच जाग आली..”
” अच्छा…. सहजच ना….”
” हो…सहज म्हणजे….ते….”
” कुठे जायचंय….” रश्मीच्या बाबांनी सरळ मुद्द्याला हात घातला.
रश्मीने चमकून आईकडे पाहिलं. आईने सहजच मान डोलावली.
“Actually बाबा…ऑफिसमधले सगळे शेगावला चाललेत..तर मी पण जाऊ का त्यांच्यासोबत…”
” हो …जा ना..त्या निमित्ताने देवदर्शन होईल आणि ऑफिसमधल्या इतर लोकांशी ओळख पण होईल…कसे जाणार आहात??”
” अजून काही सांगितलं नाहीये.. कळेल आज…पण जाऊ ना मी…” रश्मीने खात्री करून घेण्यासाठी पुन्हा एकदा विचारलं.
” हो…जा….आता तू काही लहान नाहीस…तुझं चांगलं वाईट तुला कळतं… फक्त काळजी घे इतकंच….”
” हो..थँक्स बाबा….”
” बरं…. आता जा झोप जा…तुझी सकाळ व्ह्यायला अजून वेळ आहे.
” हो….” रश्मी हसतच म्हणाली.
जाताजाता आईचा मुका घ्यायला ती विसरली नाही.
क्रमशः
©प्रतिक प्रवीण म्हात्रे
Amazing man😍👌
Thanks apu 😘