सलाम नारी शक्तीला….
तसं बघायला गेलं तर सुरवातीपासूनच संपूर्ण विश्व पुरुषप्रधान संस्कृतीचे पालन करत आलेलं आहे. स्त्री शक्तीला नेहमी दुय्यम स्थान देण्यात आलं आहे. पण आजच्या एकविसाव्या शतकात मात्र परिस्थिती बरीचशी बदललेली दिसते. कारण स्वतःची क्षमता सिद्ध करून स्त्रियांनी संपूर्ण जगाला त्यांची दखल घेण्यास भाग पाडलं आहे. ज्या क्षेत्रांमध्ये स्त्रियांचा कधी विचारही केला गेला नाही अगदी त्या क्षेत्रांमध्ये सुद्धा हल्लीच्या स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत.
आता तुम्ही म्हणाल की हे तर सगळं आम्हाला माहीत आहे..मग परत परत काय तेच सांगतोय…तर…वर्षातले नऊ दिवस का होईना आपण मूर्ती रुपात असलेल्या देवीला म्हणजे एका स्त्रीला पूजतो..कारण तिने महिषासुराचा वध करून संपूर्ण सृष्टीला संकटातून मुक्त केलं. पण आज तीच स्त्री रोज तिच्यावर होणारे अन्याय, तिच्यावर येणाऱ्या सर्व संकटांना तोंड देऊन ठामपणे उभी आहे तर त्या स्त्रीला आपण ते महत्व देतो का??
असं म्हणतात की सौभाग्याचा आधार नसला तर एका स्त्रीला घर सांभाळणं कठीण जात..परंतु आज अशी किती तरी उदाहरणं आहेत ज्या मध्ये एकाकी पडलेल्या स्त्रीने संपुर्ण संसाराचा रहाटगाडा हिमतीने ओढला आहे. किंबहुना स्त्रिया नेहमी दूरदृष्टीने विचार करतात.
इतिहास साक्षी आहे की प्रत्येक युगपुरुष घडण्यामागे एका स्त्रीचा महत्वाचा वाटा आहे. जर जिजाऊ नसत्या तर आज कदाचित वर्तमान काही वेगळाच असता..त्यांना शहाजीराज्यांचा पाठिंबा होता याबाबत दुमत नाहीच परंतु परमुलूखात असूनसुद्धा जिजाऊंनी दूरदृष्टी ठेवून छत्रपती शिवाजी महाराज्यांचा योग्य ते मार्गदर्शन केलं. संपूर्ण राज्य, स्वकीय विरोधात असताना अहिल्याबाई होळकरांनी तेवढ्याच हिमतीने उभे राहून राज्य सांभाळलं.
असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते..आणि ते तितकंच खरं आहे. पुरुष कितीही यशस्वी असला, कर्तृत्ववान असला तरी सुद्धा मनुष्याला एक भावनिक आधार लागतोच..एक आई म्हणून, पत्नी म्हणून, एक बहीण म्हणून किंवा एक मैत्रीण म्हणून स्त्री ही सतत पुरुषाच्या मागे ठामपणे उभी असते..त्यामुळे नारीशक्ती ही पुरुषाच्या यशाचं कारण असते असं म्हटल्यास काही वावगं ठरणार नाही…
सलाम त्या शक्तीला….
© प्रतिक प्रवीण म्हात्रे
No Comment