सर्वपित्री अमावस्या का आणि कशासाठी करतात?

सर्वपित्री अमावस्या का आणि कशासाठी करतात?

सर्वपित्री अमावस्या

सर्वपित्री अमावस्या म्हणजे काय?

गेलेली व्यक्ती आणि वेळ कधीच परत येत नाही. कोणाचे आभार मानायचे राहून जातात, तर कोणाची माफी. बरेच काही बोलायचे, सांगायचे राहून जाते. अशा आपल्यातून निघून गेलेल्या आप्त-स्वकीयांशी, संवाद साधण्याचा, ऋणनिर्देश करण्याचा आणि मनात दाटलेल्या भावनांना वाट मोकळी करून देण्याचा काळ म्हणजे पितृपंधरवडा आणि त्याचाच समाप्तीचा दिवस ‘सर्वपित्री अमावस्या.’

मृत पूर्वजांना पितर म्हणतात. भाद्रपद कृष्णपक्ष अर्थात अनंत चतुदर्शी नंतरचा पंधरवडा, पितृपक्ष किंवा महालय म्हणून ओळखला जातो. महालय शब्दाचा अपभ्रंश `म्हाळ’ असा झाला. या पंधरा दिवसांत, पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध विधी केला जातो. परंतु, आपल्या पिढीला आजोबा, पणजोबांच्या पुढचे पूर्वज नावानिशी माहीत नाहीत, तर त्यांची तिथी तरी कुठून माहीत असणार? यावर तोडगा म्हणून, ज्या पितरांची तिथी माहीत नसते, अशा सर्व पितरांचा श्राद्ध विधी सर्वपित्री अमावस्येला केला जातो.

हा विधी का आणि कुणासाठी?

 

आपण स्वत:ला स्वयंभू समजत असलो, तरी तो आपला भ्रम आहे. आपल्या जडण-घडणीत अनेक लोकांचा हात असतो. साधा प्रवास करत असताना, आपल्याकडे जरी मर्सडिज असली, तरी प्रवासाचा रस्ता खाचखळग्यांनी भरलेला असेल, तर प्रवासाचा आनंद घेता येत नाही. पण तोच, जर एखादा रस्ता गुळगुळीत असेल, तर प्रवासाचा आनंद द्विगुणित होतो. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याची गाडी भरधाव वेगाने जावी, यासाठी आपल्या पूर्वजांनी तो मार्ग सुकर करून ठेवला आहे. मग या प्रवासात त्यांची आठवण ठेवून, त्यांचे आभार तर मानले पाहिजेतच ना? म्हणून तर वाहनांच्या मागे आई वडिलांची पुण्याई, दादाचा आशीर्वाद’, `आजीची माया’ वगैरे संदेश लिहिलेले नजरेस पडतात. पूर्वजांची स्मृती जागृत ठेवून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी धर्मशास्त्राने पितृपंधरवड्याचा काळ निश्चित केला आहे.

पितृपक्षात एका व्यक्तीने श्राद्ध केले असता ती व्यक्ती सात गोत्रांतील आपल्या संबंधितांचा उद्धार करतो, असे समजले जाते. श्राद्ध करणारा व्यक्ती हा त्याचे वडील, आजोबा, पणजोबा तसेच आई, आजी, पणजी यांच्या नावाने पिंडदान, तर्पण करतो. त्याचबरोबर आईचे वडील, आजोबा, पणजोबा, आईची आई, आजी, पणजी यांचाही या श्राद्धात उल्लेख येतो. त्याचप्रमाणे पत्नी, मुलगा, मुलगी, बंधू, भगिनी, काका, मामा, आत्या, मावशी, मोक्षगुरू, पितागुरू यापैकी जे मृत झाले असतील, त्यांचेही स्मरण केले जाते. एवढेच नव्हे तर त्याचे मित्र, उपकारकर्ते, जगात ज्यांना कोणी वारस नाही, ज्यांना कोणी पिंडदान, तर्पण करायला नाही, करीत नाही, त्यांच्यासाठीही सदर व्यक्ती धर्मकार्य करीत असते. त्यामुळे ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केले नाही, त्याने केवळ सर्वपित्री अमावास्येलाच श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात, असे सांगितले जाते.

श्राद्ध कर्माचा विधी आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेला आहेच. त्यातील प्रत्येक विधीला विशिष्ट महत्त्व आहे. गुरुजींना बोलावून मंत्रोच्चारांसह हे श्राद्ध कर्म केलं जातं. परंतु, काही कारणास्तव हे विधी करता आले नाहीत तर वाईट वाटून घेऊ नका. विधी शक्य नसल्यास साधा, सात्विक स्वयंपाक करून कावळ्याला, कुत्र्याला आणि गायीला श्रद्धेने तो नैवेद्य दाखवावा. तसेच, पूर्वजांची स्मृती ठेवून यथाशक्ती अन्नदान, वस्त्रदान किंवा अन्य स्वरूपातील कोणतेही दान केले, तरीदेखील श्राद्ध विधीचे फल प्राप्त होते. गरजवंताला मदतीचा हात देऊन, पूर्वजांनी केलेल्या संस्काराची जाणीव ठेवणे, हा श्राद्धविधीचा गर्भितार्थ आहे. श्रद्धा असेल, तरच श्राद्ध. श्रद्धेने केलेली कोणतीही गोष्ट लाभते.

हस्त नक्षत्रातील पावसाच्या पाण्याने दह्याचे विरजण लावता येते?
गौरीं-गणपतीमध्ये गौरीच्या दोन मूर्त्यांचे पूजन का करतात??
अष्टविनायक गणपतीची नावे व माहिती

Follow PRATILIKHIT

 

47682cookie-checkसर्वपित्री अमावस्या का आणि कशासाठी करतात?

Related Posts

नरक चतुर्दशीची पौराणिक कथा । Narak Chaturdashi in Marathi

नरक चतुर्दशीची पौराणिक कथा । Narak Chaturdashi in Marathi

श्रीकृष्ण कोण होता?

श्रीकृष्ण कोण होता?

हिंदू पुराणांतील काही महत्वाचे नाग

हिंदू पुराणांतील काही महत्वाचे नाग

गटारी अमावस्या की गताहारी अमावस्या?

गटारी अमावस्या की गताहारी अमावस्या?

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 240,494 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories