वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)
बेरोजगारी हा शब्द ऐकला की आपण मागचा पुढचा काहीही विचार न करता सरळ वाढलेल्या लोकसंख्येला दोष देऊन मोकळे होतो. वाढलेल्या लोकसंख्येमुळे आपल्या देशात नोकऱ्यांची संख्या कमी आहे, मूलभूत सुविधांची कमतरता आहे असे मुद्दे सर्रास मांडले जातात. अरे पण अजून किती काळ आपण आपल्या अकार्यक्षमतेचं खापर लोकसंख्येवर फोडणार आहोत? आहे देशाची लोकसंख्या दीडशे कोटींच्या आसपास…बरं मग? ह्या मध्ये काही बदल होणार नाही हे माहीत असतानादेखील वास्तव स्वीकारून आपण त्यावर मात करण्यासाठीचे प्रयत्न करत असताना कुठेतरी कमी पडत आहोत.
भारतातील उद्योगविश्वाला गती यावी म्ह्णून पंतप्रधानांनी मेक इन इंडिया ची हाक दिली. आज बऱ्याचशा परदेशी वस्तूंचं उत्पादन हे आपल्या देशात होतं. पण केवळ कंपनी परदेशी असल्याने त्या उत्पादनावर परदेशी कंपनीचा टॅग लावून ते अवाच्या सव्वा किंमतींत विकलं जातं. आणि परदेशी ब्रँड पाहून आपण ते घेतोही. आज जगभरातल्या अनेक ब्रँडची भारत हि एक लाभदायक बाजारपेठ आहे.
आत्मनिर्भर बनण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ च्या अंतर्गत केंद्र सरकारने वीस लाख करोड रुपयांचं आर्थिक पॅकेज घोषित केलं आहे जे भारताच्या एकूण जीडीपीच्या जवळपास दहा टक्के आहे. हे अभियान समस्त भारतवासीयांसाठी किती महत्वाचं आहे हे लक्षात घ्यायला हवं कारण या अभियानाअंतर्गतच अनेक नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
ह्याशिवाय वीजनिर्मिती, ऊर्जानिर्मिती अशा क्षेत्रातही आपल्याला आणखी प्रगती करायला हवी. एकदा एका मुख्य शहराला वीजपुरवठा करणारी लाईन बंद पडली आणि त्यामुळे सगळे व्यवहार काही काळासाठी ठप्प झाले. पण उपनगरातील किंवा खेड्यातील लोकांना ही गोष्ट काही नवीन नाही. कारण तिथल्या रहिवाशांना नेहमीच लोडशेडिंगला सामोरं जावं लागतं. ह्या सर्व ठिकाणांना जर शहराप्रमाणे चोवीस तास वीज उपलब्ध झाली तर तिथेही उद्योग धंदे सुरू होऊन त्यांचीही प्रगती होऊ शकेल. शेती हा आपला परंपरागत व्यवसाय असूनही आपण आधुनिक शेतीकडे अजून वळलेलो नाही. त्यामुळे शेतात खूप मेहनत घेऊनसुद्धा अपेक्षित प्रमाणात उत्पादन मिळत नाही. देशातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन व मदत मिळणे आता अनिवार्य झाले आहे.
बेरोजगारी कमी करण्यासाठी दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण पद्धतीत सुधार करणे होय.
शिक्षण पद्धतीतील परिवर्तनावर लक्ष द्यायला हवे. एकदा शाळा पार पडली की कॉलेज मध्येही विद्यार्थी थिअरीमध्येच अडकून पडतात आणि मग कॉलेज संपवून नोकरीसाठी बाहेर पडल्यावर गाठीशी काहीच अनुभव नसल्याने सध्याच्या स्पर्धेच्या युगात त्यांचा निभाव लागणं कठीण होऊन बसतं. त्यासाठी ज्या क्षेत्रात ते विद्यार्थी आहेत त्या क्षेत्रातच कॉलेजच्या अभ्यासक्रमामध्येच एक दोन महिन्यासाठी इंप्लान्ट ट्रेनिंग, इंटर्नशिपवगैरे सारख्या गोष्टी समाविष्ट करायला हव्यात. जेणेकरून आपण जे काही शिकतोय त्याचा खऱ्या आयुष्यात, औद्योगिक क्षेत्रात कसा आणि काय उपयोग होतो हे त्यांना समजेल आणि त्याचा त्यांना पुढे जाऊन नक्कीच फायदा होईल.
आता तो काळ राहिला नाही जेव्हा विद्यार्थ्यांसमोर डॉक्टर, इंजिनिअर, कॉमर्स, सायन्स आणि आयटीआय एवढेच पर्याय होते. आता करिअर करण्यासाठी अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत पण दुर्दैवाने विद्यार्थ्यांना त्याबाबत नीटसं मार्गदर्शन केलं जातं नाही त्यामुळे त्यांना त्याबाबत फार काही माहीत नसतं. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहेत त्यामुळे त्यांना योग्य वयात योग्य ते मार्गदर्शन मिळालं तर त्याचा फायदा त्या विद्यार्थ्यांसोबतच देशालासुद्धा होईल.
पुढे येणारं युग हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आता मनुष्य जी कामे करतो ती कामे एखादा रोबोट किंवा एखादा सॉफ्टवेअर करेल तेही मनुष्यपेक्षा जास्त वेगाने आणि अचूकपणे. त्यामुळे भविष्यात पुढे सध्या असलेल्या नोकऱ्यांच्या संध्या कमी होतील हे जरी खरं असतं तरीही नवीन नोकऱ्यांच्या संधीही उपलब्ध होतील हेही तितकंच खरं आहे. फक्त आपल्याला वेळेनुसार आणि काळानुसार स्वतःला विकसित करणं आवश्यक आहे. येणारं नवीन तंत्रज्ञान, येणाऱ्या नवीन पद्धती आत्मसात करण्याशिवाय दुसरा काही पर्याय आपल्यासमोर नाही.
berojgari ek bhishan samasya nibandha
423200cookie-checkवाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)yes
Like this:
Like Loading...
No Comment