
संवाद
संवाद
आज अक्षता ऑफिसला जरा लवकरच पोहोचली. विकेंडचे मेल्स चेक करून ती कॉफी प्यायला उठणार इतक्यात तिला दरवाजातून आदिश येताना दिसला. त्याला विचारावं कॉफी हवीये का म्हणून ती डेस्कजवळच थांबली. तेवढ्या वेळात तिने ओडीसीवरून एक नजर फिरवली. सोमवार असल्याने आलेल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले होते. त्यातच आदिशने येऊन बॅग डेस्कवर जोरात आपटली.
“काय रे?? मंडे ब्लूज वाटतं ??” अक्षताने हसतच विचारलं.
“हं …. नाही… तसं काही नाही ..” आदिशने उडवाउडवीचं उत्तर दिलं.
“मग आल्या आल्या आदळआपट कशासाठी? क्लायंटचा कॉल आला होता का? परत काही चेंजेस सांगलेयेत का?”
“नाही.. ” आदिशने जरा रागातच उत्तर दिलं.
“मग का सकाळी सकाळी मूड ऑफ झालाय तुझा?”
“ही समृद्धी यार.. सारखी भांडत असते माझ्यासोबत.. ”
“आता नवरा बायको म्हटलं की थोडीफार भांडण तर होणारच ना..”
“पण ती नेहमीच भांडते..”
“सगळ्या पुरुषांना असंच वाटतं. पण काय झालं सांगशील…”
“यार तिच्या फ्रेंड्सना तिच्या गोष्टी माझ्यापेक्षा जास्त माहित असतात..”
“म्हणजे… ??”
“म्हणजे ती प्रत्येक गोष्ट तिच्या फ्रेंड्सना सांगते… अगदी मला माहित नसलेल्या गोष्टीसुद्द्धा त्यांना माहित असतात.”
“ऐक आपण एक काम करू. कॅन्टीन मध्ये जाऊन मस्त कॉफी पितापिता बोलू. इकडे नको. ” विषय थोडा गंभीर आहे हे ओळखून अक्षता म्हणाली.
दोघे कँटीनमध्ये जाऊन बसले. श्यामने त्यांना कॉफी आणून दिली. एरवी चिल असणाऱ्या आदिशला असं वैतागलेल पाहून श्यामने खुणेनेंच अक्षताला काय झालं असं विचारलं. अक्षताने सुद्धा खुणेनेच त्याला सगळं ठीक असल्याचं सांगितलं.
“हा बोल आता.. . काय झालंय… नीट सांग मला…” अक्षता सिरीयस होत म्हणाली.
“परवा सॅमला बरं वाटत नव्हतं म्हणून ती ऑफिसमधून लवकर घरी आली होती.”
“बरं मग..”
“पण तिने मला तिला बरं वाटत नाहीये ह्याबद्दल काही सांगितलंच नाही. रात्री जेव्हा तिच्या मैत्रिणीने तिची विचारपूस करायला कॉल केला तो मी उचलला. तेव्हा मला कळलं. ”
“तू उगाच टेन्शन घेशील म्हणून तुला सांगितलं नसेल. ”
“हे एक झालं.. पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला माहित नसतात पण तिच्या फ्रेंड्स ना माहित असतात.”
“मला एक सांग… तुमचा संवाद होतो नीट??”
“हो मग.. बोलतो ना रोज..”
“बोलणं आणि संवाद होणं ह्यात फरक आहे आदिश.”
“म्हणजे…”
“तू कधी विचार केलायेस का की समृद्धी काही गोष्टी तुला का सांगत नाही..”
“असा विचार तर नाही केला… पण कारणही माहित नाही मला…” आदिश खांदे उडवत म्हणाला.
“कारण तू फक्त तिचा नवरा झालास आदिश. तू तिचा मित्र कधी झालाच नाहीस. ”
“म्हणजे ?”
“म्हणजे असं की तुमच्या दोघांचं अरेंज मॅरेज. त्यात ती आधी मुंबईला होती जॉब साठी त्यामुळे लग्नाच्या आधी तुमचं फार भेटणंही झालं नाही. लग्न झाल्यावर ती पुण्याला आली पण तिचे इथे कुणी फार मित्र मैत्रिणी नाहीत. घरात तुम्ही दोघेच असता. दिवसभर तुम्ही दोघे जॉबवर, संध्याकाळी थकून भागून घरी पोहोचता. तुला तर बऱ्याचदा निघायला उशीर होतो त्यामुळे तुमचं जे काही बोलणं होत असेल ते जास्त करून विकेंडलाच. त्यात पण तुमच्यात जर मनमोकळेपणाने बोलणं होत नसेल तर ती काय करणार?”
” पण तीने बोलायला हवं ना.. ना सांगता मला कसं कळणार?”
“बोलण्यासाठी आधी कंफर्टेबल असावं लागतं आदिश. तुमचं लग्न होऊन दोनच महिने झालेत. त्यातपण तुमच्यात अजून तो कम्फर्ट नाही आलाय ह्याचा अर्थ तुमचा संवाद होत नाहीये.”
“असेल कदाचित…”
“मुळात कोणतही नातं टिकण्यासाठी संवाद खूप महत्वाचा असतो. आणि आपला संवाद फ्रेंड्सशी जितका मनमोकळेपणाने होतो तेवढा इतर कुणाशीही होत नाही. म्हणून नात्यात नवरा बायको एकमेकांचे मित्र झाले तर संसार सुखाचा होतो. टिपिकल नवरा बायकोसारखं वागण्याचा जमाना गेला आता. तुम्ही दोघेही जॉब करता , दोघांनाहि आपापले प्रॉब्लेम्स आहेत ते जो पर्यंत तुम्ही एकमेकांसोबत शेअर करणार नाहीत तो पर्यंत तुमच्या घरातलं वातावरण मोकळं कसं होणार?”
“मी हा विचार कधी केलाच नव्हता गं… म्हणजे मी काही अगदीच टिपिकल वगैरे नाहीये हे तुलाही माहितीये. पण आमच्यात नीट संवाद होत नाहीये हे कधी माझ्या लक्षातच नाही आलं. ”
“देर आये दुरूस्त आये… तुमच्या नात्याला जरा वेळ दे… बघ सगळं नीट होईल. वेळ देणं म्हणजे काय रे.. ? वेगळं असं काहीच करावं नाही लागत त्यासाठी. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायचा असतो. त्यातूनच प्रेम फुलत जातं. सगळ्याच स्त्रियांना महागडे गिफ्ट्स नको असतात. आम्हाला तुमचा वेळ हवा असतो. कधीतरी शांत बसून मनमोकळेपणाने बोलावं, कधी तरी लॉन्ग ड्राइव्हला जावं, एकमेकांची आवड जपावी हेच सगळं हवं असतं नात्याला. समृद्धी उत्तम आर्टिस्ट आहे हे तिच्या इंस्टाग्राम पेजवरून कळतंय. लग्नाच्या आधी केलेल्या किती तरी पेंटिंग्सचे फोटो आहेत तिच्या अकाउंटवर. लग्नानंतर कधी स्वतःहून तू तिला कॅनव्हास, कलर्स आणून दिलेस?”
“नाही. म्हणजे कधी हा विचारच नाही आला मनात…”
“म्हणून म्हणतेय वेळ द्या एकमेकांना, समजून घ्या. यातूनच नातं खुलत होईल.”
“तुझ्याकडे काउन्सिलिंग डिपार्टमेंटची जबाबदारी दिलीये ते योग्य आहे गं.. म्हणजे अगदी मला कळू देता माझा ब्रेन वॉश केलास तू…” आदिश हसतच म्हणाला.
“बरं चल आता.. खूप कामं पडलीयेत… तो कुंटे आला असेल एव्हाना ” अक्षता खुर्चीतून उठत म्हणाली.
“हो… चल चल…” आदिशसुद्धा धडपडत उठला. पण आज संध्याकाळी घरी जाताना समृद्धीसाठी कॅनव्हास, कलर्स घेऊन जायचं त्याने मनाशी पक्क केलं होतं.
©प्रतिलिखित
एका संवेदनशील मुद्द्याला अगदी बरोबर हात घालून त्यावर एक उत्तम असा उपाय पण अगदी सहज पणे उदाहरनासहित पटवून दिला आहे.
मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर लिखाण आहे तुझ😊👌
मनःपूर्वक आभार