भूतकाळ

भूतकाळ

“समर्थ, आजच जाणार आहेस ना त्या मुलीला भेटायला??” समर्थच्या आईने स्वयंपाकघरातूनच विचारलं.

“हो, आता निघेन थोड्या वेळाने. माझ्यासाठी डिनर नको बनवू हा. मी बाहेरच खाईन.”

“ठीक आहे. किती वाजता भेटणार आहात तुम्ही??”

“सात वाजता…”

“अरे मग आवर लवकर, साडेसहा तर झाले इथेच..”

“आई, मी बाईकने जाणार आहे ना, पोचेन दहा मिनिटांमध्ये. आणि मला कुठे तयारीला एवढा वेळ लागतो.”

“तरीसुद्धा आवर आणि निघ, ती मुलगी तिथे पोहोचायच्या आधी तू तिथे हजर हवास.”

“हो हो, निघतो गं…” एवढं बोलून समर्थ त्याच्या रूमच्या दिशेने निघाला.

समर्थचं लग्नाचं वय झालं होतं त्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याच्यामागे मुलगी बघण्यासाठी तगादा लावला होता. तशी बरीच स्थळं आली पण कधी गुण जुळले नाही, कधी मुलीकडच्यांना स्थळ पसंत पडलं नाही,कधी समर्थला मुलगी आवडली नाही. ह्या एका मुलीशी सगळं जुळत असल्यामुळे आज त्यांची भेट होणार होती.

समर्थ तिच्या आधी त्यांनी ठरवलेल्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचला आणि त्याने तिला तो पोहोचल्याचा मेसेज करून बाजूलाच असलेल्या वेटरला पाणी आणायला सांगितलं. ती मुलगी तिच्या ऑफिस वरून थेट तिथे येणार होती त्यामुळे त्यांनी तिच्या ऑफिसच्या जवळ असलेलंच रेस्टॉरंट निवडलं होतं.

वेळ घालवण्यासाठी उगाच इकडे तिकडे बघत असताना समर्थची नजर दरवाजातून येणाऱ्या तिच्यावर थबकली. अवनी. गव्हाळ रंग, मध्यम बांधा, आयलायनर लावल्यामुळे नजरेस भिडणारे काळेभोर डोळे, फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक, एका बाजूने खांद्यावरून रुळणारे केस आणि हातात एक प्लॅटिनमचं ब्रेसलेट. त्यातच तिने घातलेला आकाशी रंगाचा कुर्ता तिच्या गव्हाळ रंगाला अगदीच साजेसा दिसत होता.

“हाय…”

“हाय…प्लिज बस ना…”

“मला उशीर तर नाही झाला ना??”

“नाही, मीसुद्धा पाच मिनिटे आधीच आलोय.”

“अच्छा.”

“तुला पाणी हवंय???” असं विचारून तिच्या उत्तराची वाट न बघताच समर्थने वेटरला खूण केली.

“तुझी पहिलीच वेळ???” अवनीने थेट विचारलं.

“हो, म्हणजे भेटायची पहिलीच वेळ. ह्या आधी मुली पाहिल्या होत्या पण काही ना काही कारणांनी प्रकरण पुढे सरकलं नाही. आपली कुंडली जुळली आणि नाऊ हिअर वी आर…”

“अच्छा, माझी तिसरी वेळ. म्हणजे आधी एकदा समोरच्याने नकार दिला, एकदा मी.”

“अरेंज मॅरेज म्हटलं की ह्यासाठी तयार राहावंच लागतं.” समर्थ हसत म्हणाला.

“ते ही आहेच म्हणा, तुझं अजूनही वर्क फ्रॉम होमच सुरू आहे???”

“हो, कदाचित पुढच्या महिन्यापासून ऑफिस सुरू करणार असं म्हणतायेत, पण नक्की काही सांगता येत नाही.”

त्यानंतर बराच वेळ ते गप्पा मारत बसले. दरम्यान त्यांची दोन चिकन सँडविचसुद्धा फस्त करून झाली. गप्पा मारता मारता दोघांनाही एकमेकांबद्दलच्या अनेक गोष्टी समजल्या. दोघांचेही स्वभाव तसे मोकळे असल्यामुळे त्यांना बोलायला काही अडचण आली नाही.

“तुला आणखी काही विचारायचंय का मला??” सगळ्या नॉर्मल गप्पा संपल्यावर अवनीने विचारलं.

“आणखी म्हणजे???”

“म्हणजे माझ्या भूतकाळाबद्दल वगैरे….”

“मी विचारणार नव्हतो खरंतर, पण आता तू विषय काढलाच आहेस तर..”

“का?? तुला नाही वाटलं माझा भूतकाळ जाणून घ्यावा असं??”

“माझा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे ह्याबद्दल.”

“म्हणजे??”

“म्हणजे बघ ना, आपल्या जनरेशनच्या दृष्टिकोनातून विचार केला आपल्या सगळ्यांचाच काहीना काही भूतकाळ असतोच. काहींचं नातं टिकतं काहींचं नाही टिकत. पण आपण मूव्ह ऑन होतो ना. मग भूतकाळावरून एखाद्याची पारख का करावी आपण?”

“पण नात्यात पारदर्शीपणा असला की मग पुढे प्रॉब्लेम येत नाही.”

“हो पारदर्शीपणा तर असावाच, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये.पण भूतकाळ ऐकून एखाद्याबद्दल मत बनवणं मला पटत नाही. ”

“म्हणणं तर बरोबरच आहे तुझं, पण आपल्या कुटुंबापैकीही कुणाला ह्याबाबत कल्पना नसते बऱ्याचदा.”

“हे बघ, जे झालं ते झालं. ते जर इतकंच गंभीर असेल तर त्याबद्दल बोलायलाच हवं. पण काही घटनांवरून एखाद्याबद्दल मत ठरवणं चुकीचंच. फक्त आपला भूतकाळ आपल्या वर्तमानात डोकावत नाही ना , आणि पुढे त्याचा आपल्या भविष्यावर काही परिणाम होणार नाही ना ही आपली जबाबदारी असते.तेवढी काळजी घेतली की मग पुढे काही मॅटर होत नाहीत. सद्यपरिस्थिती पाहता भूतकाळ नाही अशी मुलं मुली अगदी क्वचितच सापडतील. सध्याच्या आयुष्यात काय चाललंय ह्याबद्दल मात्र आपण बोलायला हवं. कारण बऱ्याचदा इच्छा नसताना किंवा कुणाच्या दबावाखाली मुलं मुली लग्नाला तयार होतात आणि लग्न झाल्यावर जी प्रकरणं होतात त्याबद्दल तर तुला माहितीच आहे. त्यामुळे जे काही आहे ते अगदी स्पष्टपणे समोर आलं तर आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचतात. कारण जेव्हा लग्न होतं तेव्हा दोन्ही कुटुंब एकत्र आलेली असतात. आणि ते मोडल्यावर केवळ मुलगा मुलगीच नाही तर त्यांच्या कुटूंबालाही तो त्रास भोगावा लागतो.”

“सध्या अशा घटना तर खूप घडतायेत. ”

“हो, म्हणून तर मी म्हणालो ना तुला, की भूतकाळाबद्दल जाणून घेण्यापेक्षा मला तुझ्या वर्तमानाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. कारण तो आपलं भविष्य ठरवणार आहे. भूतकाळ नाही. जर भूतकाळ भविष्यावर परिणाम करणारा असेल तरच त्याबद्दल बोलावं अन्यथा त्याबद्दल विचार करत बसू नये. तुला माझा भूतकाळ जाणून घ्यायचाय का??”

“तुझं म्हणणं पटतंय मला त्यामुळे आपण वर्तमानाबद्दलच बोलू..” अवनी हसत म्हणाली आणि समर्थही तिच्या हसण्यात सामील झाला.

©प्रतिलिखित

23752cookie-checkभूतकाळ

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

संसार

संसार

वाटणी

वाटणी

2 Comments

  1. khupch bhari sir lihla aahe. kharch ekek je vishay gheta na tye kharcha khup vegale ani aajch pidhila sajeshe astat.

    khupcha chan lihiila aahe kiti kautuk karav tevdha kami aahe

Leave a Reply

Blog Stats

  • 121,012 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories