
पत्रास कारण की…
प्रिय वाचक,
तसं एरवी मेसेजवर बोलणं होतं आपलं, पण म्हटलं ह्या वेळी तुम्हाला पत्रातून भेटावं. त्याला कारणही तसंच खास आहे. मराठी साहित्याच्या धगधगत्या यज्ञकुंडात आपल्याही काही समिधा असाव्यात अशी इच्छा मनाशी बाळगून २०१६ मध्ये ‘प्रतिलिखित’ ह्या ब्लॉगचा नारळ फोडला होता. इंग्रजाळलेल्या तरुणाईला थोडं मराठीचं बाळकडू पाजावं ह्या उद्धेशाने आजूबाजूला घडणारे आणि सर्वांना आपलेसे वाटतील असे अनुभव शब्दबद्ध करण्यास सुरुवात केली आणि अगदी पहिल्या लेखापासूनच तुम्ही सर्वांनी मला साथ दिलीत ते आजही तुम्ही माझ्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे आहात. तुमच्या सहकार्यामुळेच आज आपल्या ‘प्रतिलिखित’ ब्लॉगचे एक लाख व्ह्यूज पूर्ण झाले आहेत.
लिहायला सुरुवात केली तेव्हा बऱ्याच जणांनी असं देखील म्हटलं की मराठी कोण वाचतंय ??? तू इंग्रजी आणि हिंदीमध्ये लिहायला सुरुवात कर. बऱ्याचदा त्यांचं म्हणणं खरं वाटायचं कारण कधी कधी वाचकांचा हवा तसा प्रतिसाद मिळायचा नाही. पण मनात हा विचारसुद्धा यायचा की जर मी माझ्या मातृभाषेला पुढे नेलं नाही तर तो कृतघ्नपणा ठरेल. इतर भाषिक त्यांच्या भाषेतलं साहित्य लिहितातच की. काय होईल?? फार फार तर कमी लोकं वाचतील. पण जे वाचतील त्यांना ते वाचल्याचं समाधान मिळालं तर त्यातच आपला आनंद. असं ठरवून पुढचा मागचा काही विचार न करता फक्त लिहत गेलो आणि मग काही निवडक लेख/कविता घेऊन ईसाहित्य प्रतिष्ठानने माझं ‘पर्सनल से सवाल’ हे पहिलं इबुक प्रकाशित केलं.
त्यानंतर प्रेम हे असंच असतं, नियती ह्यांची तर फक्त एक लघुकथा म्हणून सुरुवात केली होती पण दोन्ही कथा तुम्हा वाचकांच्या पसंतीस उतरल्यावर लघुकथेची कादंबरी कशी झाली याचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहेत. अर्थात हे श्रेय तुमचेच आहे कारण तुम्ही एखादा भाग वाचल्यावर पुढील भागाबद्दल माझ्याकडे चौकशी करायचात आणि मला लिहिण्यासाठी हुरूप यायचा.
कोणत्याही लेखकाला हवीहवीशी वाटणारी गोष्ट म्हणजे प्रेक्षकांची दाद. आणि ती तुम्ही मला नेहमीच भरभरून देत आलात आणि पुढेही द्यालच याची मला खात्री आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे पण तूर्तास हात आखडता घेतो आणि ह्यापुढेही मी उत्तमोत्तम साहित्य लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन याची हमी देतो.
कळावे,
तुमचाच प्रतिलिखित
No Comment