
नास्तिक
गणपतीच्या दर्शनासाठी घरी आलेल्या सगळ्या मित्रांना प्रसाद देत असताना ओटीवर बसलेल्या शंतनूकडे माझं लक्ष गेलं. त्याला प्रसाद देण्यासाठी मी हात पुढे केला तर प्रसाद न घेता तो नुसताच हसला.
“अरे शंतनू, मला माहित आहे तू नास्तिक आहेस. प्रसाद म्हणून नको पण मिठाई म्हणून तर घे. ” असं म्हणून मी त्याच्या हातावर बळेच प्रसादाचा पेढा ठेवला.
“आलोच हे बॉक्स ठेवून.” असं म्हणून पेढ्यांचं बॉक्स बंद करून मी ते जागेवर ठेवण्यासाठी गेलो. बाकीची मंडळी हॉलमध्ये बसून गप्पा मारत होती. शंतनू एकटाच बाहेर झोपाळ्यावर बसला होता म्हणून मी त्याच्याशेजारी जाऊन बसलो.
“शंतनू … एक विचारू का??” आज शंतनूचं मत जाणून घ्यायचंच ह्या विचाराने मी विषयाला हात घातला.
“हा विचार ना..” शंतनू मोबाईलमधून डोकं न काढताच म्हणाला.
“तुझा देवावर विश्वास का नाही रे??” मी प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारलं.
“अरे यार, तू आता इथे सुरु नको करू. उगाच कशाला स्वतःचा सुद्धा मूड ऑफ करून घ्यायचाय तुला??”
“मूड ऑफ नाही रे. उत्सुकता आहे मला जाणून घ्यायची. ”
“बघ. असं काही कारण नाहीये ज्यामुळे माझा देवावरचा विश्वास उडालाय वगैरे. पण मला नाही वाटत की देव वगैरे असं काही असतं म्हणून. कारण प्रत्येक गोष्टीला एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. ”
“पण जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरु होतं शंतनू.”
“असं काही नाहीये रे. लोकं म्हणतात असं कारण आपण अजून त्या गोष्टींबद्दल काही शोधू शकलेलो नाही. पण अशा कितीतरी गोष्टी आहे ज्या आधी चमत्कार म्हणून गणल्या जायच्या आणि नंतर त्यामागचं वैज्ञानिक कारण शोधून काढलं शास्त्रज्ञांनी.”
“पण तुला हेही लक्षात घ्यायला हवं की जेव्हा शास्त्रज्ञ विश्वाची निर्मिती कशी झाली याचा अभ्यास करत होते तेव्हा त्यांना एक असा कण(पार्टीकल) सापडला की ज्याशिवाय विश्वाची निर्मिती अजिबात शक्य नव्हती. आणि म्हणूनच शास्त्रज्ञांनी त्या कणाचे नाव ठेवले ‘देवकण’. म्हणजेच गॉड्स पार्टीकल. इतकंच नाही तर आपण ज्याला पवित्र मानतो त्या ओमकाराच्या सकारात्मक ऊर्जेवर संपूर्ण जगभरात व्याख्यानं दिली जातात.”
“पण म्हणून देव आहे असं कसं मानायचं??”
“बरं ठीके. देव वगैरे आपण थोडं बाजूला ठेवू. पण तू हे तरी मान्य करशील की नाही की अशी एखादी सकारात्मक ऊर्जा आहे आपल्या सभोवताली जिच्या मार्फत सगळ्या गोष्टी घडतात. अगदी लहान लहान जीवापासून ते आपल्या आकाशगंगापर्यंत अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याची आपण कधीच कल्पना करून शकत नाही. पण ह्या गोष्टी अस्तित्वात आहेत. आणि ‘ऊर्जा’ (एनर्जी )असते हे विज्ञानाने सुद्धा मान्य केलाय. फक्त तिची रूपे वेगवेगळी आहेत. बरोबर.??”
“हं.. ऊर्जा असते हे तर खरंय.”
“बरं. मग आता मला सांग सकारात्मक ऊर्जा (पॉसिटीव्ह एनर्जी) म्हणजे काय??”
“आपल्याला एखादं काम करायला उत्साह निर्माण करणारी गोष्ट म्हणजे पॉसिटीव्ह एनर्जी असं आपण म्हणू शकतो. ”
“अगदी बरोबर. आणि आपल्या सगळ्यांनाच त्या सकारात्मक ऊर्जेची गरज असते. काही लोकं म्हणजे उदाहरण घ्यायच झालंच तर तू, तू बऱ्यापैकी खंबीर आहेस. कोणताही निर्णय तू अगदी सहज घेतो. आणि त्यातून होणाऱ्या परिणामांनाही तू अगदी सहज सामोरा जातोस. त्यामुळे तुला मानसिक आधाराची फारशी गरज भासत नाही. पण सगळ्यांनाच हे जमत नाही. आणि मग अशावेळी तो मानसिक आधार त्या शक्तीवर असलेली श्रद्धा देते. त्या श्रद्ध्येमुळे लोकांना त्यांच्या अडचणींवर मात करायला नवी उमेद येते.”
“पण आपले हिंदूंचे देव वेगळे आणि बाकी धर्मियांचे देव वेगळे.”
“तू श्रद्धा आणि धर्म ह्यामध्ये गल्लत करतोय. मी आज तुझ्यासमोर एक हिंदू म्हणून नाही तर श्रद्धाळू म्हणून बसलोय. आणि आजचा संवाद हा नास्तिक आणि श्रद्धाळू असा आहे. कसंय ना, हे संपूर्ण विश्व ज्या शक्तीने निर्माण केलं तिने त्या विश्वाची विभागणीसुद्धा केलीये. अगदी छोट्या न दिसणाऱ्या जिवाणूंपासून ते अजस्त्र देवमाशापर्यंत. प्रत्येक प्राण्यांच्या जाती आहेत. त्यांच्या पोटजाती आहेत. तसंच माणसांचं पण आहे. आणि प्रत्येक माणूस हा त्याच्या जातीनुसार, त्याच्या धर्मानुसार वागतो. लोकं म्हणतात की हे धर्म, जात मानवानेच निर्माण केलेत. मान्य आहेत की हे मानवानेच निर्माण केलेत पण हे फक्त मानवांमध्येच नाहीये. तू प्राण्यांमध्ये बघितल्यास तर गट तिथेही असतात. मुंग्यासुध्दा दुसऱ्या मुंग्यांची वारुळे जिंकून घेतात, डोमकावळे आणि कृष्णकावळ्यांचं आपापसात पटत नाही. हे सगळं नैसर्गिक आहे. आणि ह्याच अनुषंगाने जर तू विचार केलास तर हिंदूंचे देव, मुस्लिमांचा अल्ला, ख्रिश्चनांचा येशूख्रिस्त आणि अगदी बौद्ध धर्मियांचा गौतम बुद्ध या सगळ्यांनाच एक आध्यात्मिक शक्ती म्हणूनच पुजलं जातं. कारण त्या शक्तीची उपासना केल्यावर एक मानसिक समाधान मिळतं, बळ मिळतं. ”
“अरे पण माणसाने स्वतःवर विश्वास ठेवायला हवा ना. मग काय गरज ह्या सगळ्याची??”
“माणसाचं मन आहे ना, ते जे ठरवतं तेच होतं. एकदा त्यात भीती बसली ना की मग माणूस आयुष्य शिल्लक असूनही जगत नाही. कोरोनाच्या काळात पाहिलंच असेल तू. भीतीपोटी कितीतरी जणांचा मृत्यू झाला. सापाच्या विषाने मरण्याऐवजी साप चावल्याच्या भीतीने जास्त मारतात माणसे. तसंच आहे. आपली जर एखाद्या शक्तीवर श्रद्धा असली तर तिच्या आशीर्वादाने आपल्या अडचणी दूर होतीलच, आपलं चांगलंच होईल हे माणूस आधीच मनाशी ठरवून असतो. आणि मग त्या सकारात्मक ऊर्जेमुळे त्याला हवं तसं घडून येतं. ”
“अरे पण याचा दुरुपयोग सुद्धा होतो ना. लोकांच्या श्रद्ध्येचा गैरफायदा घेतला जातो.”
“श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यात फरक आहे. जेव्हा त्या शक्तीचा वापर लोकं स्वतःची दुखं दूर करण्यासाठी करतात तेव्हा ती श्रद्धा पण त्या शक्तीच्या नावाचा उपयोग लोकं स्वतःच्या स्वार्थासाठी करतात तेव्हा ती अंधश्रद्धा. पूर्वी सामान्य जनतेला शिक्षणाअभावी काही गोष्टी समजायच्या नाही त्यामुळे काही लोकं त्या शक्तीच्या नावाचा गैरवापर करायचे. आता परिस्थिती बदलते आहे. पण हेही तितकच खरं आहे की एखाद्या माणसाने त्या शक्तीच्या नावाचा गैरवापर केला म्हणून त्या शक्तीला बोल लागत नाही. तू मला नेहमी म्हणतोस की हिंदूंमध्ये अंधश्रद्धा खूप आहे. पण हे फक्त हिंदू धर्मातच नाहीये तर सगळ्याच धर्मात आहे. आणि त्या धर्मातील कुणीतरी वाईट वागला म्हणून त्या धर्माला बोल लागत नाही. तो दोष त्या माणसाचा असतो, धर्माचा नाही. ”
“तू म्हणतोय ते ही अगदीच न पटण्यासारखं नाहीये.”
“कसंय शंतनू. नास्तिक असणं हा काही अपराध नाहीये. पण तू नास्तिक आहेस म्हणून तू इतरांच्या श्रद्ध्येवर हसणं हे चुकीचं आहे. आपल्या मनाला पटतं ते आपण करायचं. नास्तिक असलेलेसुद्धा नंतर देवाला मानायला लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. शेवटी आपल्या मनावर असतं. मानायचं की नाही ते. माणसाला येणाऱ्या अनुभवांवरून माणूस मत बनवतो. तुला खोटं वाटेल पण मला लहानपणापासून देवाशी गप्पा मारायची सवय आहे. माझ्या मनात जे काही आहे ते सगळं मी त्याच्यासमोर बोलून मोकळा होतो. मला छान वाटतं मग. मन प्रसन्न होतं.”
“पाहिलंय मी तुला बऱ्याचदा. शाळेसमोरून जरी गेलास तरी शाळेत असलेल्या सरस्वतीच्या मूर्तीला नमस्कार करतोस. पण तू सांगितलेल्या गोष्टी मी नाकारूही शकत नाही कारण त्या खऱ्या आहेत आणि मेंदूला पटणाऱ्या आहेत. आज पहिल्यांदा कुणीतरी मला इतकं छान समजून घेतलं आणि इतकं छान समजावलं. त्याबद्दल खरंच धन्यवाद.”
“बरं. आता जेवणात उकडीचे मोदक केलेत. खाशील की नाही??” मी झोपाळ्यावरून उठत म्हणालो.
“अरे हा काय प्रश्न झाला का??” शंतनू प्रसन्नपणे हसला आणि मीही त्याच्या हसण्यात सामील झालो.
©PRATILIKHIT
खूप वैचारिक रित्या मांडले….good one..👌
खूप खूप धन्यवाद 😇😇
माणूस हा मूलतः कोणत्याही गोष्टीचा पाईक किंवा विरोधक नसतो, त्याच्या ठायी असलेले पूर्वग्रह आणि अज्ञान हे त्याला योग्य गोष्टी पासून दूर ठेवतात. मग योगायोगाने किंवा स्व कुतूहलाने माणसाला त्याच्या प्रश्नांची उकल होते तेव्हा त्याला त्याच्या अज्ञानाची जाणीव होते आणि शंतनु प्रमाणे हुशार माणूस त्या गोष्टी मान्य करून आपले पूर्वग्रह दूर करतो….
सुंदर लेखन प्रतिक💕
मनःपूर्वक आभार रोहित