
Crop – सेट – Upload
“अक्षू… त्या समीरचं स्टेटस पाहिलं का??” अक्षयाच्या व्हाट्स अँपवर कीर्तीचा मेसेज झळकला.
“नाही गं…माझ्याकडे नंबर सेव्ह नाहीये. नवीन मोबाईल घेतला ना. सगळे जुने कॉन्टॅक्ट सेव नाही केलेत. का काय झालं??”
“ब्रेक अप झालंय वाटतं बिचाऱ्याचं..😂😂😂”
“कशावरून?” अक्षयाने प्रश्न केला.
“थांब. स्क्रीनशॉट पाठवते.” एवढं बोलून अक्षयाच्या उत्तराची वाट न बघताच किर्तीने स्क्रीनशॉट पाठवलासुद्धा.
“खूपच सॅड वाटतोय गं.” अक्षयाने स्क्रीनशॉट पाहून म्हटलं.
“हो. आणि काय आजच नाही..गेल्या आठवड्यापासून असे दर्द भरे स्टेटस टाकतोय तो. मजनू टाईप.”
“कोण होती मुलगी?? तुला काही माहीत आहे??”
“हो. ती ब वर्गातली समिधा आहे ना..ती..”
“अच्छा…”
“बऱ्याच वर्षांपासून सुरू होतं वाटत त्यांचं.”
“ओह….असं आहे तर.”
“हो ना…आणि समीर भलताच सिरीयस होता वाटतं तिच्या बरोबर. त्याच्या घरी पण माहीत होतं.”
“काय सांगतेय..मग तरी ब्रेकअप???” अक्षयाने सिरीयस होऊन विचारलं.
“समिधा त्याला सोडून दुसऱ्याच्या मागे लागली ना..समीर ची घरची परिस्थिती काही फार चांगली नाही. म्हणून कदाचित तिने….” किर्तीने हसण्याचा इमोजी पाठवत म्हटलं.
“समीरशी तुझं काही बोलणं झालं यावर???”
“नाही गं…एवढा वेळ कुणाला आहे..त्याचे स्टेटस पाहते मी…नुसता मजनू…मला इतकं हसायला येतं म्हणून सांगू. आजचं तर खूप भारी होतं. ‘जिंदगी में हमेशा एक बात याद रखना, किसी को रुलाकर सपने सजाए नहीं जाते।’ ”
“कीर्ती! मला सांग, मागे तुझ्या आवडत्या अभिनेत्याने सुशांतने आत्महत्या केली ना??”
“हो. का गं??” सुशांतचं नाव ऐकताच कीर्ती थोडी गंभीर झाली.
“मी असं ऐकलं की त्याने सोशल मीडियावर तो डिप्रेस होता वगैरे असे इंडिकेशन दिले होते.”
“हो. त्याच्या पोस्ट बघ ना किती सेन्सेटिव्ह होते.”
“आणि मग एखाद्या लाटेप्रमाणे व्यक्त व्हा अशा आशयाच्या पोस्ट टाकल्या गेल्या होत्या. मला आठवतंय तू सुद्धा सलग दोन तीन दिवस अशा आशयाच्या पोस्ट टाकल्या होत्यास. बरोबर ना??”
“हो. पण त्याचा इथे काय संबंध???”
“इथेच तर खरी मेख आहे. ”
“म्हणजे??? मला नाही समजलं.” किर्तीने पुन्हा प्रश्न केला.
“बघ. सध्या फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्स अँप सगळीकडे स्टेटस किंवा स्टोरीस अपलोड केल्या जातात. कुणाचा वाढदिवस असला टाका स्टेटस, कुणाला शुभेच्छा द्यायच्या आहेत टाका स्टेटस, काही नवीन बनवलं टाका स्टेट्स. इतकंच नाही तर हल्ली सरळ टोमणा न मारता स्टेटस टाकून टोमणा मारायचं फॅड आलंय. आपण पाहतो, वाचतो, आवडलं तर रिप्लाय करतो, नाही आवडलं किंवा समजलं नाही तर इग्नोर करतो. काही वेळा तर आपण समजून न घेताच नेक्स्ट करतो.”
“हो. दिवसभरात कचऱ्यासारखे पोस्ट येतात. थोडीच ना आपण सगळ्यांचे पोस्ट बघत बसणार आहोत.”
“मान्य आहे. पण आपण कधी हा विचार करतो का की ते स्टेटस त्या व्यक्तीने का ठेवलं असेल? कुणाच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची सवय वाईट हे आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत.”
“हो, बरोबर.”
“पण मग सुशांत सिंग राजपुतच्या खासगी आयुष्यात त्याने घेतलेल्या निर्णयाला आपण का इतकं महत्व दिलं?? त्याच्या जाण्याची बातमी आली, सगळ्यांनीच त्याबद्दल स्टेटस टाकले, पुढे बॉलिवूड मधल्या नेपोटीझमबद्दल बरंच वादळ उठलं आणि काही दिवसांनी लोक विसरून सुद्धा गेले.”
“हो. त्या वेळेनुसार लोक व्यक्त होतात.”
“बरोबर. आपण असा विचार करतो की तो मोठा ऍक्टर होता. त्याचे फॅन फॉलोअर्स होते. आणि तो कशाला त्याच दुःख त्याच्या फॅन्सला सांगेल. त्याच्या मित्रमैत्रिणींना सांगेल ना तो.”
“पण त्याच्या मित्रमैत्रिणींनी पण त्याचं ऐकून घेतलं नाही ना. त्याला व्यक्त होता आलंच नाही.”
“मग तू तरी आता काय वेगळं करतेय???”
“म्हणजे???”
“समीरच्या परिस्थिती बद्दल बोलतेय मी.असे कितीतरी लोक आपल्या संपर्कात आहेत ज्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा तणाव असतो. ते व्यक्त व्हायचा प्रयत्नही करतात पण त्यांच्यापैकी कुणी काही सांगायला सुरुवात केली की आपण ‘ झालं याचं रडगाणं सुरू’ असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो.आणि मग चुकून त्याने काही वेगळं पाउल उचललं की मग ‘व्यक्त व्हायला हवं होतं रे त्याने…’ असं बोलून मोकळं होतो.”
“हो गं..हा विचार मी केलाच नाही. माणूस सोशल मीडियावर तेव्हाच व्यक्त होतो जेव्हा खऱ्या आयुष्यात त्याचं ऐकणारं,त्याला समजून घेणारं कुणी नसतं. म्हणजे बरेच जण लक्ष वेधून घेण्यासाठी असं करतात. पण समीर तसं नाही करणार.”
“आता कसं म्हणालीस..”
“मी बोलते त्याच्याशी. न जाणो थोडंस बोलल्याने त्याचं मन हलकं होईल.”
“नक्कीच त्याला आधार वाटेल. आणि तो अनोळखीही नाहीये..तुम्ही एकाच प्रोजेक्ट ग्रुप मध्ये होतात. ”
“हो..मी करते त्याला फोन. चल बाय. आणि थँक्स. माझी चूक समजावून सांगितल्याबद्दल.”
© PRATILIKHIT
No Comment