अपघात

अपघात

 

दुपारी बाराच्या सुमारास खानविड्याच्या त्या मुख्य रस्त्याच्या मध्यभागी खूप गर्दी जमा झाली होती. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकसोबत झालेल्या अपघातात जखमी झालेला साकेत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. ट्रकच्या धक्क्याने बाईकवरून उडाल्यावर बाजूच्याच शेतात पडल्याने वाचलेली जुई अर्धवट शुद्धीतच आजूबाजूला जमलेल्या जमावाकडे मदतीची याचना करत होती. पण कुणालाच तिचा आकांत ऐकू येत नव्हता. ‘अपघाताची केस आहे. पोलीस आले की बघतील काय करायचं ते’ अशी कुजबुज त्या जमावामध्ये चालली होती. त्यातीलच कुणीतरी मधेच येऊन तिला पाणी विचारत होतं तर तिने काय करायला हवं याचे सल्ले देत होतं. कुणी मदतीसाठी ओ देत नाही हे लक्षात आल्याने ती साकेतच्या मूर्च्छित चेहऱ्याकडे हताशपणे पाहत होती. दहा पंधरा मिनिटांमध्ये पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि साधारण अर्ध्या तासाने आलेल्या ऍम्ब्युलन्समधून साकेतला जवळच असलेल्या इस्पितळात हलवण्यात आलं. ऍम्ब्युलन्समधून जात असताना जुईला मागच्या महिन्यात घडलेली घटना आठवली.

विरार स्टेशनच्या रेल्वेब्रीजवरून पश्चिमेकडून पूर्वेला जात असताना त्यांना समोरून एक गर्दुल्ला येताना दिसला. त्याला टाळण्यासाठी त्यांनी त्यांचा मार्ग बदलला आणि ब्रिजच्या दुसऱ्या बाजूने ते पुढे गेले. ते खाली उतरणार इतक्यात त्यांना कुणीतरी ओरडल्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी घाईघाईने मागे वळून पाहिलं तर तो गर्दुला एका माणसाला धारधार चमच्याने भोसकत होता. तो माणूस त्याच्या हातातल्या बॅगने त्या गर्दुल्ल्याचे वार अडवण्याचा प्रयत्न करत होता. त्याच झटापटीत तो खाली पडला आणि त्या गर्दुल्ल्याने त्याच्या छातीवर बसून वार करायला सुरुवात केली. आजूबाजूला येणाऱ्याजाण्याऱ्या लोकांची एकच धावपळ सुरु होती. त्या गर्दुल्ल्याचा अवतार पाहून कुणाचीही त्याला अडवण्याची हिंमत झाली नाही. वार करून तो गर्दुल्ला निघून गेला तसा साकेत त्या माणसाच्या दिशेने जाणार इतक्यात जुईने त्याचा हात धरला.

“कुठे चाललास??” जुईने प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारलं.

” कुठे म्हणजे? तो माणूस जखमी आहे ना… त्याची मदत नको करायला??”

” तू नको जाऊस. पोलीस आले की ते बघतील काय करायचं ते.”

” अगं, असं बोलून कसं चालेल. कुणीतरी जखमी होऊन पडलंय तर त्याची मदत करायची की त्याला तसच टाकून तिथून निघून जायचं??”

“त्याच्या खुनाचा प्रयत्न झालाय साकेत. न जाणो तो माणूस कोण असेल ,त्याला का मारलं असेल..आपण मदत करायला जाऊ आणि मग पोलिसांचा आणि कोर्टाचा ससेमिरा आपल्या मागे लागेल. ”

“असं काही नाही. आपण निर्दोष आहोत तर का घाबरायचं?? आपण तर फक्त त्याला मदत करणार आहोत. फार फार तर त्याला बाजूलाच असलेल्या संजीवनीमध्ये घेऊन जाऊ. आणि तिकडून पोलिसांना फोन करू. पोलीस यायची वाट पाहायची का आपण ??”

“आणि तिकडे घेऊन गेल्यावर काय त्याला लगेच ऍडमिट करून घेणार आहेत का?? तिकडेही पोलीस केस आहे असं सांगून पोलीस येईपर्यंत थांबतील.”

“सीरिअल मध्ये पाहून तसाच विचार करू नकोस. असं नाही होत कधी. मागे आपल्या काकांचा अपघात झाला होता तेव्हा त्यांना ऍडमिट करून घेतलं होतं आणि मग पोलीस आले होते.”

“अरे पण तो अपघात होता, हा खून आहे.”

“काहीही असो… आपल्याला त्या माणसाला मदत करायला हवी जुई.”

“नको. तू जाणार नाहीयेस.तुला माझी आणि आपल्या बबड्याची शपथ आहे. मला उगाच माझ्या कुटुंबाच्या मागे पोलीस आणि कोर्टाचा ससेमिरा लावून घायचा नाहीये.” असं म्हणून ती जवळजवळ ओढतच साकेतला तिथून घेऊन गेली.

आपल्यासोबतही घडतं ना बऱ्याचदा असं. घटना घडल्यावर आजूबाजूला जमलेल्या गर्दीचा आपण सुद्धा एक भाग असतो. आपल्यालाही वाईट वाटत असतं, त्या व्यक्तीला मदत करावी अशी आपली मनापासून इच्छा असते पण आपण आपल्या मनाला आवर घालतो. कारण अशा घटना समोर असल्या की आपल्या मनात पोलिसांबद्दल एक भीती निर्माण होते की आपण काही केलं नाहीये आणि नुसती मदत करायला जरी गेलो तरी पोलीस आपल्यावर संशय घेऊन आपल्या मागे लागतील. कशाला हव्या नसत्या उठाठेवी? पोलीस आले कि बघून घेतील त्यांचं ते. असा विचार करून आपण फक्त कुणी ओळखीचं दिसत नाहीये ना याची खात्री करून तिथून निघून जातो. पण जेव्हा हाच प्रसंग आपल्यावर किंवा आपल्या कुणा ओळखीच्या व्यक्तीवर ओढवतो तेव्हा ‘खूप लोकं जमले होते पण कुणीच मदत केली नाही’ असं आपण सरळ बोलून मोकळं होतो.

आपल्या ह्या अशा भीतीपोटी रोज कितीतरी लोकांना अपघातात त्यांचा जीव गमवावा लागतो. त्यांना वेळेवर उपचार मिळाले तर त्यांचा जीव नक्कीच वाचू शकतो. यासाठी सर्वप्रथम पोलिसांची किंवा इतर गोष्टींची सामान्य जनतेच्या मनात असलेली भीती कमी व्हायला हवी आणि पोलिसांनी ही भीती घालवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. आदरयुक्त भीती नक्कीच असावी कारण पोलीस आपल्या रक्षणासाठी असतात पण जर रक्षकाचीच व्यर्थ भीती वाटायला लागली तर सामान्य लोकं तक्रार तरी कुणाकडे करणार ??

© PRATILIKHIT

13600cookie-checkअपघात

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

संसार

संसार

वाटणी

वाटणी

3 Comments

Leave a Reply

Blog Stats

  • 120,447 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories