
शिकण्यासारखं बरंच काही…..
17 एप्रिल,रविवार
रविवार असला तरी मुंबईची लाईफ लाइन मात्र नेहमी प्रमाणे चालू होती.गाडीला गर्दी तशी कमीच होती.एरवी असणारा प्रवाशांचा गोंधळ,धक्काबुक्की याची सवयचं असल्यामुळे काही तरी कमी असल्याची उणीव मनाला भासत होती.सुट्टीचा दिवस आणि त्यात डोक्यावर सूर्यदेव अतिप्रसन्न झाल्यामुळे कोणी घराबाहेर पडण्याचा विचार करत नसावं बहुतेक…
असे विचार डोक्यात चालू असतानाच एक कोवळ्या वयाचा मुलगा डब्यात चढला.एका हातात एक कापडाचा तुकडा आणि एकात प्लास्टिक ची मोठी पिशवी.साधारणतः १० वर्षाचा असेल.इतक्या तप्त वातावरणातही त्याच्या चेहऱ्यावर एक निरागस हास्य होतं. थोडं थांबल्यावर त्याने त्याच्या दररोजच्या कामाला सुरवात केली.हातातल्या फडक्याने त्याने डब्यातला कचरा गोळा करायला सुरवात केली.आपण आपलं घरचं स्वच्छ करत आहोत अशा अविर्भावात तो ते करत होता.
डब्याच्या एका बाजूला काही गर्भश्रीमंत मुलं बसली होती.हातात असलेल्या वेफर्स च्या पॅकेटमधून हात भरून वेफर्स काढून ते तोंडात भरत।होते.खाताना अर्धे वेफर्स खाली सांडत होते.खाऊन झाल्यावर ते वेफर्सचं पॅकेट आणि कोल्ड ड्रिंकची बाटली त्यांनी सीट च्या खाली काही विचार न करता हळूच सरकवली.आणि मग तिथून उठून दरवाज्यात उभे राहिले.
त्या मुलाचं काम मात्र चालूच होतं.त्या सीट च्या इथे पोचल्यावर त्याने ती कोल्ड ड्रिंक ची बाटली आणि वेफर्स च पॅकेट सुद्धा आपल्या पिशवीत टाकलं. सगळा डबा स्वच्छ करून झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसत होतं.
काम संपल्यावर तो सुद्धा एका दरवाज्याच्या कोपऱ्यावर जाऊन बसला.हळूच त्याने ते वेफर्सचं पॅकेट बाहेर काढलं आणि त्यात काही तरी शिल्लक असेल या आशेने त्याने त्या पॅकेट मध्ये खात घालून चाचपून बघितलं.हाताला लागलेले काही वेफर्स आणि त्या कोल्ड ड्रिंक च्या बाटलीतले उरलेले कोल्ड ड्रिंक चे शेवटचे थेंब पिऊन त्याने आपली तहान भागवली. भर उन्हात येत असलेल्या त्या वाऱ्याच्या थंडगार झुळुकेने त्याच्या पापण्या आपोआप मिटत होत्या.पण तरीही त्यातून तो स्वतःला सावरत होता.पुढच्या स्टेशन वर तो उतरला.
पण त्या १० वर्षाच्या कोवळ्या मुलाने माझ्या मनात विचारांचं काहूर माजवलं.काय गरज होती त्याला त्या ट्रेन मधला कचरा साफ करायची.बरं, त्या बदल्यात त्याला कोणी पगारही देणार नव्हतं पण तरीही सरकार ने पगार देऊन ठेवलेले सफाई कर्मचातीसुद्धा इतकी मन लावून सफाई करणार नाही जितकी तो मुलगा करत होता.आपण इतके शिकून सुद्धा कचरा इकडेतिकडे टाकतो आणि त्या काहीही न शिकलेल्या इतक्या लहान वयाच्या मुलाने केलेल्या त्या गोष्टीचं मला अप्रूप वाटलं.
आपल्याला कधी कोणाकडून काय शिकायला मिळेल याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही.अगदी काहीही न बोलता सुद्धा काही जण आपल्या कृतीतून खूप काही शिकवून जातात.आता त्या मधून काही शिकायचं कि दुर्लक्ष करायचं हे ज्याने त्याने ठरवायचं असतं.
प्रतीक प्रवीण म्हात्रे
खर्च यातून खुप सरे शिकण्या सारख आहे पण कोण शिकायला बघत नाय.
Touching incidence….
Nice
Tysm all of you…
आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमध्ये शिकण्यासारखे तर बरेच काही असते….पण ते समजून घेण्यासाठी लागणारे अभ्यासू,चिकित्सक आणि सुंदर डोळे तुला लाभलेत….खरच सुंदर!!
खरच ह्रदयाला स्पर्श करणारा अनुभव आणि त्यातून खुप काही शिकण्यासारखे👌
Tysm
nice story… अगदी काहीही न बोलता सुद्धा काही जण आपल्या कृतीतून खूप काही शिकवून जातात.आता त्या मधून काही शिकायचं कि दुर्लक्ष करायचं हे ज्याने त्याने ठरवायचं असतं…..
thanks hi line khup kahi shikvun jate
thank you