Adipurush Review

Adipurush Review

खरंतर रिव्ह्यू लिहायची इच्छा नव्हती कारण रिव्ह्यू लिहिण्यासारखं काहीच नाहीये चित्रपटात. पण ओम राऊतला दुसरा चान्स द्यायला हवा, हे मुळ रामायण नाहीये, हे रामायण आताच्या नव्या पिढीचं आहे रामानंद सागरांचं रामायण पाहिलेल्या पिढीचं नाहीये, आदीपुरुष हा हॉलिवूडच्या मारवेल, डीसीच्या सिनेमांना उत्तर आहे अशा काही कमेंट्स पाहिल्या आणि लिहिण्याचा मोह आवरला नाही.

पहिली आणि महत्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायला हवी की रामायण ही काही पिढीनुसार बदलत जाणारी गोष्ट नाहीये. पिढ्या बदलत जातील पण रामायण कायम तेच राहील. अगदी जसं आमच्या पिढीपर्यंत पोहोचवलं गेलं आहे अगदी तसच्या तसं ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे त्याच्या मूळ संकल्पनेत काहीही बदल न करता. सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन तुम्हाला जर तुमच्या मनाप्रमाणे बदल करायचे असतील तर रामायण, महाभारत किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हे ते विषय नाहीत. हे विषय जसे उपलब्ध आहेत तसेच्या तसेच हाताळले गेले पाहिजेत. त्यामध्ये बदल करता कामा नये.

चित्रपटात पटणाऱ्या गोष्टी जवळजवळ नाहीच पण खटकणाऱ्या गोष्टीच जास्त आहेत. शूर्पणखेच्या प्रसंगात प्रभू श्री रामांना केसांवरून हात फिरवत, स्टाईल मारत धबधब्यातून बाहेर येताना दाखवलंय तिथेच त्या भूमकेतलं मर्म निघून गेलंय. पुढे वेगवेगळे स्टंट सुद्धा करताना दाखवलं आहे. रावणाकडे पुष्पक विमान होतं वटवाघळासदृश्य ड्रॅगन नाही हे शेंबड पोरसुद्धा सांगेल. त्या पुष्पक विमानातूनच रावणाने सीतेचं हरण केलं हे आपल्याला माहीत आहे. तरीसुद्धा त्याचा वापर सीता हरण प्रसंगात न दाखवता सिनेमामध्ये हनुमान लंकेत गेला असताना किनाऱ्यावर पार्क केलेलं दिसतं. जटायू आणि संपाती ह्या दोन पक्षीराज गिधाडांचा उल्लेख रामायणात केला असतानाही जटायूला गरुड दाखवण्याचा पराक्रम दिग्दर्शकाने केला आहे. कुबेराची सोन्याची लंका काळी कुळकुळीत दाखवून लंकेच्या संकल्पनेवरच रोलर फिरवलेला आहे. बिभीषणाच्या हाती मद्याचा ग्लास देऊन दिग्दर्शकाला नक्की काय सुचवायचं आहे त्यालाच ठाऊक.

चित्रपटातील पात्रांच्या वेशभूषेबद्दल तर काही बोलायलाच नाही. रावण, बिभीषण, इंद्रजित तर छपरी सलूनमध्ये जाऊन आल्यासारखे दाखवले आहेत. इंद्रालाही पराजित करणारा इंद्रजित तर टॅटू काढणारा छपरी वाटतोय. ‘राघव जहाँ, विजय वहा’ च्याऐवजी ‘जय श्री राम’ हेच वाक्य हनुमानाच्या तोंडी हवं होतं जे एकदाही ऐकू आलेलं नाही. जेव्हा इंद्रजिताच्या अस्त्राने लक्ष्मण मूर्च्छित होतात तेव्हा त्यांचे उपचार सुषेण नामक वैद्याने केल्याची नोंद रामायणात आढळते परंतु ह्या चित्रपटात बिभीषणासोबत आलेल्या महिलेने काहीतरी वेगळाच प्रकार केलेला दिसून येतो. तसेच एकही लढाईचा सिन लक्ष्मण- इंद्रजित किंवा रावण-रामाच्या युद्धाला न्याय देत नाही.

आता मुख्य गोष्ट ही की जर दिग्दर्शक आणि लेखकाच्या मते ‘Adipurush’ हा चित्रपट मूळ रामायण नसून रामायणाचा संदर्भ घेऊन आताच्या पिढीसाठी केलेली कलाकृती आहे तर मग चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांनी जिथे रामायणकथा ऐकवली जाते तिथे पवनपुत्र हनुमान उपस्थित असतात असे सांगून प्रत्येक चित्रपटगृहात एक सीट चिरंजीवी हनुमानासाठी राखीव ठेवण्याच्या मोठमोठ्या वलग्ना का केल्या? ह्याचा अर्थ जर चित्रपट चालला तर रामायण आणि नाही चालला तर त्यावर बेतलेली वेगळी कलाकृती सांगून वेळ मारून नेण्यासाठीची बतावणी आहे का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

Adipurush चित्रपट पाहूच नये असं माझं स्पष्ट मत आहे. बरेच जण म्हणतायेत की आपण इतर चित्रपट एक मजा म्हणून पाहतो तसाच हाही पाहायला काय हरकत आहे? तर वाईट हे आहे की ह्या चित्रपटाची संपूर्ण कथा आधीपासूनच अस्तित्वात आहे त्यामुळे चित्रपटात कथा असण्या नसण्याचा प्रश्नच नाही. दिग्दर्शकाला ती कथा फक्त सिनेमॅटिक स्वरूपात दाखवायची होती पण त्यांनी त्याची माती केलीये. सिनेमा कुठल्याही स्वरूपात रामायण वाटत नाही आणि मुळात रामायण हा विषय मज्जेत बघून येण्याचा नाहीये ना. आताच्या लहान मुलांना इतिहास, संस्कृती कळावी ह्यासाठी रामायण पाहायचंय पण इथे कायतरी वेगळंच आहे. लहान मुलांपैकी ज्याला अजून रामायणाचा गंधही नाही त्याने हा चित्रपट पाहिला आणि त्यालाच प्रमाण समजलं तर नंतर राम सीतेच्या मूर्तीसमोर त्याचे हात जोडले जातील का??? त्यांना प्रभू श्री राम, लक्ष्मण, सीता, हनुमान हे दैवी न वाटता बॅटमॅन, सुपरमॅन यांसारखे फिक्शन कॅरॅक्टर नाही वाटणार का??? आपला धर्म, आपली संस्कृती, आपली परंपरा आपल्याला आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायची आहे आणि ती आपली नुसती जबाबदारी नाही तर आपलं कर्तव्य आहे.

जय श्री राम 🚩🚩🚩

©प्रतिलिखित

 

39560cookie-checkAdipurush Review

Related Posts

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

माझ्या स्वप्नातील भारत – India in my dreams

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

वाढती बेरोजगारी – एक भीषण समस्या. (Unemployment)

To be or not to be that is the question…    इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

To be or not to be that is the question… इंजिनिअर व्हावं की होऊ नये हा एकच सवाल आहे

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 121,012 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories