
राजकारणा पलीकडची मैत्री
राजकारणा पलीकडची मैत्री
“अण्णा दोन चहा दे… सम्या तू भजी खाणार आहेस??” नेहमीच्या अण्णाच्या टपरीवरच्या बाकावर बसत शशीने आवाज दिला.
“हो चालेल… आताच बाईक रॅली करून आलोय… खूप भूक लागलीये…” समीर गळ्यात घातलेल्या पार्टीच्या शेल्याने चेहरा पुसत म्हणाला.
“आज कसली रॅली होती??”
“अरे ते आमच्या विभागातल्या नळाची कामं रखडलीयेत ना… त्या मागणीसाठी नगरसेवकाच्या ऑफिसवर गेलो होतो.”
“अच्छा… तुम्हीच दिलाय निवडून… आणा वठणीवर तुम्हीच…”
“आम्ही म्हणजे लोकांनी… आमचा उमेदवार पडला ना… आता जो निवडून आलाय त्यांच्यापर्यंत मागण्या पोहोचायला नको… त्यासाठीच हा सगळा खटाटोप.”
“हा ते पण आहेच म्हणा… पण साला उमेदवार आपला असो किंवा दुसऱ्यांचा… पिच्छा तर पुरवावा लागतोच.”
“ते ही खरच आहे…” शशी हसत म्हणाला.
“शशीदादा तुमचा पक्ष कोणता हो ??” त्यांचं बोलणं ऐकत असलेल्या अण्णाने कुतूहलाने विचारलं.
“साहेब विरोधक आहेत आमचे…” शशीने काही बोलायच्या आतच समीर चहाचा एक घोट घेत म्हणाला.
“आणि तरीही तुम्ही एकत्र बसून चहा पिताय ??” अण्णाने आश्चर्याने विचारलं.
“चहा प्यायला कुठल्या पक्षाचं थोडीच असावं लागतं…” शशी हसत म्हणाला.
“तसं नाही दादा… पण तुम्ही दोघे विरुद्ध पार्टीचे… म्हणजे तुमच्यात पण राडे वगैरे होतच असणार ना खूप… मी सोशल मीडियावर पाहतो ना.. एका पक्षाचे लोकं दुसऱ्या पक्षाच्या लोकांना, त्यांच्या नेत्यांना किती शिव्या देतात. त्यांनी काही चांगलं केलं तरीही त्यात वाईट काय तेच शोधतात. दुसऱ्यांना कमी लेखण्यातच त्यांना मजा येते. आणि याउलट तुम्ही… तुमच्या दोघांची मैत्री मी किती तरी वर्षांपासून पाहतोय. मला वाटायचं तुम्ही दोघं एकाच पक्षातले आहेत. मग एकमेकांचे विरोधक असून पण तुमची मैत्री इतकी घट्ट कशी??” अण्णाने प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारलं.
“राजकारण आणि मैत्री ह्यात गल्लत करतोय तू अण्णा… आमच्या पक्षाचे विचार जरी पटत नसले तरीही एक जागरूक नागरिक म्हणून आमचे विचार सारखेच आहेत. आमच्या विभागात आमच्या पक्षाचा उमेदवार आमची कामं करतो म्हणून आम्ही त्याला पाठिंबा देतो. ह्या विभागात सम्याचा उमेदवार त्यांची कामं करतो म्हणून सम्या त्याला पाठींबा देतो.”
“पण तरीही तुम्ही विरुद्ध पक्षातलेच ना… तुमचाही उमेदवार इथे पडला तेव्हा तुम्ही चिडलाच असाल ना…” अण्णा पुन्हा म्हणाला.
“कसंय ना अण्णा… आम्ही दोघं लहानपासूनचे मित्र. आमचे विचार तसे सारखेच. आजूबाजूच्या परिस्थितीकडे पाहतच आम्ही मोठे झालो. ती परिस्थिती बदलावी असं आम्हाला नेहमी वाटायचं. पण कसंय ना घाण साफ करायची असेल तर त्यात उतरावं लागतं. बदलाची सुरुवात आपल्यापासून करायची असते. असं कंपल्सरी नाहीये की शशीला आमच्या पक्षाचे विचार पटतील. मलाही त्यांच्या पक्षाच्या काही गोष्टी खटकतात. पण त्याचा परिणाम आम्ही आमच्या मैत्रीवर होऊ देत नाही. वेळप्रसंगी आमचे वाद होतातही पण आम्ही त्याचं भांडण कधीच होऊ दिलं नाही. कारण आमचं ध्येय एकच आहे. बदल. त्याचसाठी तो त्याच्या विभागात झटतोय आणि मी माझ्या. मला कल्पना आहे की मी खूप सामान्य कार्यकर्ता आहे. पक्षातल्या घराणेशाहीमुळे मला किंवा शशीला कदाचित पुढे मोठं होता येणारही नाही. आम्हाला शेवटापर्यंत कार्यकर्ता म्हणूनच राहावं लागेल. पण निदान आम्ही आम्हाला खटकत असलेल्या गोष्टी, लोकांच्या समस्या पक्षातल्या मोठ्या लोकांपर्यंत पोहोचवू तरी शकतो. उद्या पुढे जाऊन जर शशी त्याच्या पक्षातून मोठा झाला तर मला आनंदच होणार आहे. कारण तेव्हा मी केलेल्या तक्रारीचा तो त्या विशिष्ट पक्षाचा नेता म्हणून नाही तर जनतेचा सेवक म्हणूनच ऐकून घेईल हा मला विश्वास आहे.” समीर शशीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.
“आणि मुळ मुद्दा काय आहे ना अण्णा… पक्षातले मोठे लोकं कार्यकर्त्यांना काय वाटेल, त्याची काय मतं असतील ह्याचा विचार कधीच करत नाही. ते त्यांना हवा तेव्हा, हवा तो, हवा तसा निर्णय घेऊन मोकळे होतात. आधी ज्यांना विरोध करत होते नंतर त्यांच्याच मांडीला मांडी लावून एकत्र बसतात, पंगती झडतात. ते त्यांचं राजकारण खेळतात मग सामान्य कार्यकर्त्यांनी काय नेहमी एकमेकांची डोकीच फोडत बसायचं का?? हे कुठेतरी बदलायला हवं. हा सगळ्या प्रकारामुळे मित्रामित्रांमध्ये खूप फूट पडतेय. आमच्या साहेबांनी अमुक एक वक्तव्य केलं, त्याला प्रत्युत्तर म्हणून समोरचा अमुक काहीतरी बोलला ह्यावरूनही वाद होतायेत. जनतेची कामं करायचं बाजूला ठेवून नेते मंडळी एकमेकांना टोले लगवण्यात व्यस्त आहेत आणि त्यावरून उगाच भांडण होतायेत. ” शशीनेही आपलं म्हणणं मांडलं.
“तुमच्यासारखा विचार सगळ्यांनी केला तर देशाचं केवढं भलं होईल..” अण्णा भाबडेपणाने म्हणाला.
“सगळ्यांचे विचार सारखे नसतात अण्णा… फक्त कशाला महत्व द्यायचं आणि कशाला नाही हे आपलं आपल्याला समजायला हवं.” समीर शशीकडे पाहत म्हणाला आणि शशीनेही त्यावर मान डोलावली.
©प्रतिलिखित
No Comment