
कुंकू, टिकली
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘कुंकू, टिकली’ हा विषय ट्रेंडिंगला आहे. शेफाली वैद्य ह्यांनी सुरू केलेल्या #NoBindiNoBusiness ह्या हॅशटॅगमुळे हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
कपाळावर टिळा लावण्याचं शास्त्रीय कारण पहिले आपण समजून घेतलं पाहिजे. हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यात टिळा लावणे ही प्रथा आहे. स्त्री आणि पुरुष कपाळावर कुंकू, चंदन, गंध यांचा टिळा लावतात. या परंपरेचा वैज्ञानिक तर्क असा आहे की दोन्ही डोळ्यांच्या मधोमध आज्ञा चक्र असते. याच चक्र स्थानावर टिळा लावला जातो. या चक्रावर टिळा लावल्याने आपली एकाग्रता वाढते. टिळा लावताना बोटाचा किंवा अंगठ्याचा जो दाब पडतो, त्याच्यामुळे कपाळातून जाणाऱ्या नसांचा रक्त प्रवाह नियंत्रित आणि व्यवस्थित होतो. रक्त पेशी सक्रीय होतात.साधारणपणे चंदन, कुंकू, माती, हळद, भस्म याचा टिळा लावण्याची पद्धत आहे. कपाळावर चंदनाचा टिळा लावला तर मेंदूमध्ये सेराटोनिन आणि बीटा अँडोर्फिनचा स्त्राव योग्य प्रमाणात होतो. कुंकूमध्ये पारा असतो. या पा-यामध्ये धातूचे प्रमाण अधिक असल्याने ताण दूर होतो आणि डोके शांत आणि प्रसन्न रहाते. कुंकू लावताना ज्ञानाचक्रावर दाब दिला जातो त्यामुळे कपाळावरील बिंदू दाबले जातात त्यामुळे चेहऱ्याच्या स्नायूंना रक्तपुरवठा होतो.
कुंकू, टिकली लावायची की नाही हा जिचा तिचा / ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला आठवतंय मी शाळेत असताना नेहमी कपाळाला टीळा लावूनच जायचो. माझ्या वर्गातील इतर तीन चार मुलं सुद्धा कळपाला चंदनाचा, अष्टगंधाचा किंवा भस्माचा टिळा लावून यायची. नंतर कॉलेज सुरु झाल्यावर ती सवय मागे पडली. पण त्यामुळे ती संस्कृती मागे पडली किंवा कॉलेजला गेल्यावर शिंग फुटली आणि आपल्या संस्कृतीची लाज वाटायला लागली असा त्याचा अर्थ होत नाही. आजही सणासुदीला पारंपारिक वेशभूषा केल्यावर कपाळी चंद्रकोर लावून मिरवतोच ना आपण. पुरुष असो किंवा स्त्री, कपाळी असलेल्या टिळ्यामुळे समोरच्याच लक्ष आपोआप आपल्याकडे वेधलं जातं.
टिकली लावली नाही म्हणून आक्षेप नको आणि टिकली लावली म्हणून जुनाट वगैरे असा शिक्काही नको. जाहिराती बऱ्याचदा दिशाभूल करणाऱ्या असतात. आजही कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये किंवा इतर समारंभात पारंपरिक पोशाख केल्यानंतर महिला हमखास टिकली लावतातच. आपलं सौंदर्य कसं खुलतं हे प्रत्येक महिलेला माहीत असतं आणि त्यानुसार त्या बिंदी, कुंकू, टिकली वगैरे निवडतात.
त्यामुळे कुंकू, टिकली लावावी की लावू नये हा काही वादाचा विषय नाहीये. पण होतं असं की हिंदू धर्मातील अत्यंत चांगल्या असणाऱ्या रूढी, परंपरा ह्या अशाप्रकारे लोकांसमोर आणल्या जातात आणि त्यामुळे इतर लोकांना बोलायला आयता विषय मिळतो.
©प्रतिलिखित
No Comment