संसार

संसार

“हॅलो अक्षय, आज भेटूया का आपण?? ” अक्षयने फोन उचलताच पलीकडून आवाज आला.

“हो, चालेल ना. कुठे भेटूया???”

“सरगम कॅफे?? आपल्या दोघांनाही बरं पडेल तिथे यायला.”

“चालेल. भेटूया संध्याकाळी सातला.”

“डन” एवढं बोलून नंदिनीने फोन कट केला.

नुकतंच अक्षय आणि नंदिनीचं लग्न ठरलं होतं. अरेंज मॅरेजच. एका विवाहसंस्थेच्या माध्यमातून दोघांचा एकमेकांशी संपर्क झाला आणि मग पुढे दोघांच्या घरच्यांनी सगळं सांभाळून घेतलं. बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाल्यावर दोन्ही बाजूंनी होकार आला आणि दोन्ही बाजूंचे पाहुणे दुसऱ्या स्थळाच्या घराची पायरी चढले. अक्षय त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक. दिसायला सर्वसाधारण असला तर त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर तो आयटी कंपनीमध्ये मॅनेजर होता. नंदिनी तिच्या घरातलं शेंडेफळ. मोठ्या बहिणीचं आणि भावाचं लग्न झालं होतं. नंदिनी फॅशन डिझायनर. तसे दोघंही एकदम विरुद्ध टोकाचे. अक्षय एकदम शांत आणि त्याच्या अगदी उलट नंदिनीचा स्वभाव. पण तरीही दोघांचं छान जमून आलं होतं.

संध्याकाळी अक्षय कॅफेमध्ये पोहोचला तेव्हा नंदिनी आधीच तिथे पोहीचली होती.

“हॅलो, सगळ्यात आधी सॉरी, तसा मी लवकरच निघालो होतो पण ट्रॅफिक लागलं खूप. एका टेम्पोचा अपघात झाला होता त्यामुळे एकच लेन सुरू होती.” अक्षय खुर्चीवर बसत म्हणाला.

“अरे ईटस ओके, बस ना…”

“हो.”

“काय घेणार आहेस तू?? तो वेटर दोनदा येऊन गेला टेबलवर.”

“मी कोल्ड कॉफी.”

“बरं ठीकये. ” एवढं बोलून नंदिनीने ऑर्डर देऊन टाकली.

“आज सुट्टी तुला???” अक्षयने पाणी पितापिता विचारलं.

“म्हटलं तर सुट्टी म्हटलं तर नाही.” नंदिनी हसत म्हणाली.

“अरे हो, फ्रिलांसर ना तुम्ही, मनाचे राजे..”

“ए, असं काही नाही हा. आम्हांला पण डेडलाईन असतात.” नंदिनी थोड्या तोऱ्यातच म्हणाली.

“हो, हो…मी कुठे म्हणालो काही…” अक्षय आपली बाजू सावरत म्हणाला.

“बाय द वे, मला थोडं बोलायचं होतं. मी विचार केला की फोनवर बोलण्यापेक्षा भेटून बोलूया.”

“हो बोल ना..काय झालं??”

“तू काय विचार केला आहेस आपल्याबद्दल??”

“म्हणजे??” अक्षयने प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारलं.

“म्हणजे लग्नानंतर आपण कुठे राहणार आहोत??”

“कुठे म्हणजे?? माझ्याच घरी राहणार ना..घरजावई वगैरे करायचा विचार आहे की काय तुझा.” अक्षय मस्करीच्या सुरात म्हणाला.

“नाही रे, पण आपण वेगळे राहणार ना लग्नानंतर??”

“एक एक मिनिट, हे कोण म्हणालं तुला??”

“अरे कुणी म्हणालं नाही रे, मीच विचारतेय तुला.”

“पण वेगळं राहायची गरजच काय ना?? माझं घर आहे ना.”

“ते तुझं घर नाहीये, तुझ्या आईबाबांच आहे.”

“शेवटी एकच ना, माझं काय आणि आईबाबांचं काय.”

“पण लग्नानंतर आपल्याला आपलं वेगळं घर बघावंच लागेल ना??”

“काय गरज आहे त्याची?? हे घर सुद्धा मोठंच आहे. दोन रूम आहेत. मागे घर घेताना लग्नाचा विचार करूनच मी हे घर घेतलय.”

“पण मला लग्नानंतर सासू सासऱ्यांसोबत नाही राहायचंय. मला वेगळं राहायचंय.”

“का??”

“अरे आपले विचार वेगळे, आपली मतं वेगळी. त्यांना नाही पटत ती. आणि मग उगाच बंधनं येतात. त्यापेक्षा वेगळं राहिलेलं बरं ना..”

“नाही, मला नाही पटत ते.”

“तू इमोशनल होऊन विचार करू नकोस. प्रॅक्टिकल विचार कर.”

“दोन्ही बाजूने विचार केला तरी मी माझ्या मतावर ठाम आहे. मी वेगळं राहणार नाहीये. ”

“अरे पण…मीही माझ्या आईवडिलांपासून लांब होतेच आहे ना. ”

“ती रीत आहे नंदिनी. लग्नानंतर सासरी जायची. त्याला पर्याय नाही. पण लग्न झाल्यावर गरज नसतानाही वेगळं राहणं हा विचारच मला पटत नाहीये. मला मान्य आहे की आपल्या आणि आपल्या पालकांच्या विचारांमध्ये फरक आहे पण म्हणून वेगळं राहणं हा त्यावर मार्ग असूच शकत नाही. आपण नातं जोडतोय, सौदा करत नाही आहोत. घर म्हंटल की भांड्याला भांडं लागणारच ना. जेव्हा आपले पालक उतारवयात येतात तेव्हा त्यांना आपल्याकडून आधाराची अपेक्षा असते. ते आपल्या प्रगतीच्या आड येत नाहीत पण म्हणून आपण त्यांना वाऱ्यावर टाकून द्यायचं का?? त्यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी नाही तर ते आपलं कर्तव्य आहे. तुझ्या दादाचंही झालंय ना लग्न. तुमच्या वहिनीने असा काही निर्णय घेतला असता तर तुम्ही समर्थन केलं असतं का तिचं??”

“प्रत्येकाचे विचार वेगळे असतात रे..”

“अरेंज मॅरेज म्हणजे एक प्रकारचा सौदाच झालाय हल्ली. हुंडा न घेता केला जाणारा सौदा. मुलांच्या अपेक्षा काय. फार फार तर मुलगी दिसायला सुंदर असावी. नोकरीला असावी. मुलींच्या अपेक्षांची लिस्ट तर लांबलचकच. मुलींपेक्षा त्यांच्या घरच्यांची. मुलगा दिसायला चांगला हवा, चांगला जॉब हवा, स्थिर हवा, मुलाचं स्वतःच घर असावं, गाडी असावी, मुलगा एकुलता एक असावा. एवढं सगळं आधीपासून आहेच आणि त्यात आता तुमची इच्छा काय?? मुलाने लग्नानंतर वेगळा संसार थाटावा??”

“भविष्यात घडणाऱ्या काही गोष्टींचा विचार आताच केलेला बरा ना…”

“भविष्यातल्या गोष्टींचा विचार करून तर तू हे बोलायलाच नको होतंस. ज्यांची मजबुरी आहे त्यांनी वेगळं राहील तर ठीक आहे. समजू शकतो आपण. पण म्हणून सगळ्यांनीच वेगळं राहावं असं काही नाही. पुढे मुलंबाळं झाल्यावर काय होतं माहितीये तुला??ज्या वयात त्यांना घरची माया मिळायला हवी त्या वयात त्यांना पाळणाघरात ठेवावं लागतं. का?? ह्याच वेगळं राहण्याच्या निर्णयामुळे. सगळ्यांच्याच नशिबी एकत्र राहणं नसतं पण आपल्या नशिबी आहे तर तुला ते नकोय???”

“मला तसं म्हणायचं नव्हतं….पण” नंदिनी सारवासारव करत म्हणाली.

“नंदिनी. मला कळलंय तुला काय म्हणायचंय ते. पण एक लक्षात ठेव की माझे आईवडील माझ्यासाठी ओझं नाहीयेत. मी त्यांना सांभाळत नाहीये तर ते मला सांभाळतात. आणि मी त्यांच्यापासून वेगळं व्हायचा विचार नाही करू शकत. आणि तुझ्या मनात हा विचार आला. आता जरी माझ्या बोलण्यामुळे तुझ्या मनातून तो विचार गेला तरी नंतर परत येणार नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे आपण इथे थांबलेलंच बरं. निघुया आपण. तुला घरी सोडतो. घरच्यांना काय सांगायचं ते आपण नंतर ठरवू. ” एवढं बोलून अक्षय उठला आणि नंदिनी काहीही न बोलता त्याच्यामागून चालू लागली.

©प्रतिलिखित

24312cookie-checkसंसार

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

वाटणी

वाटणी

शहीद

शहीद

2 Comments

  1. sir hi katha mala aardhvat vate aahe pudhe kay jhal hya baadal pan liha please sir…

    khup chan lihala aahe tumhi sir…

Leave a Reply

Blog Stats

  • 123,027 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories