वाटणी

वाटणी

“हॅलो अभ्या, कुठे आहेस?”

“घरीच आहे रे, काय झालं?”

“अरे जरा रपेट मारायला बाहेर जात होतो, म्हटलं तुला विचारूया येतोस का म्हणून?”

“येतो की, पण थोडा वेळ दे. आताच डिनर करून झालं. भांडी घासतोय. ती झाली की कॉल करतो तुला. मग निघ तू घरून.”

“काय??? तू भांडी घासतोय??” समीर हसतच म्हणाला. “आणि स्वाती कुठे गेली?”

“आहे ती सुद्धा घरीच, बाकीचं आवरतेय .”

“आणि ती घरी असतानाही तू भांडी घासतोयस?? किती वाईट दिवस आले रे तुझ्यावर..” समीर आणखीनच जोरात हसत म्हणाला.

“कसले वाईट दिवस रे… ”

“अरे कपडे धुणं , भांडी घासणं , जेवण बनवणं ही बायकांची कामं आहेत रे… आपण कशाला करायची?”

“आणि मग आपली काम काय?? आयतं बसून सगळं बघत राहणं?”

“अरे आपण रोज जॉबला जातो. स्वाती आणि अंजली घरीच असतात. त्यामुळे घरची कामं त्यांनीच करायची. कारण ही कामं बायकांची हे आधीपासून ठरलेलं आहे.” समीर ठामपणे म्हणाला.

“आणि हे कुणी ठरवलं?”

“हे पूर्वी पासूनच असंच चालत आलेलं आहे. पुरुषांनी बाहेरची सगळी कामं करायची आणि बायकांनी घरची.”

“पण पूर्वी बायका जॉब वगैरे सुद्धा करत नव्हत्या. आता त्याही आपल्यासारख्याच जॉब करतात. स्वाती आणि अंजली आता ह्या कोरोनामुळे घरी आहेत. नाहीतर त्याही आपल्यासारख्याच बाहेर पडायच्या ना नोकरीसाठी.”

“हो, पण मग नंतर घरी आल्यावर घरचं काम त्याच करायच्या ना.”

“हो करायच्या, कारण आपल्याला यायला उशीर व्हायचा. पण ह्या लॉकडाऊन मध्ये बऱ्याच गोष्टींची जाणीव झाली रे मला. ”

“म्हणजे??” समीरने विचारलं.

“पहिलं म्हणजे आता एकविसाव्या शतकातही कपडे धुणं , भांडी घासणं , जेवण बनवणं ही कामं बायकांची आहेत असं समजणारा माणूस मला महामूर्ख वाटतो. अरे जीवनावश्यक कामं आहेत ही. सगळ्यांनाच यायला हवी. त्यात स्त्री पुरुष असं वर्गीकरण करणं चुकीचं नाही वाटत तुला?”

“अरे पण हे काही आपण नाही सुरु केलंय. खूप आधीपासूनच सुरु आहे हे.”

“पण आपण बदलू तर शकतो ना. पूर्वीचा काळ वेगळा होता रे. तेव्हा पुरुष एकटेच घराबाहेर पडायचे कामासाठी. बायका घरीच राहून घरची सगळी कामं करायच्या. आता काळ बदललाय. नोकरीसोबतच घरातली कामं करताना आपल्या बायकांची किती दमछाक होते दिसतं ना आपल्याला. ”

“हो दमछाक तर होतेच…” समीर स्वतःशीच म्हणाला.

“मग आपण थोडी मदत केली तर कुठे बिघडलं ना. रोज नाही पण जेव्हा शक्य असेल तेव्हा मदत करावी. तेवढंच त्यांचा थोडा भार हलका केल्याचं समाधान. ”

“पण तू नेहमी म्हणतोस ना की पूर्वापार जे चालत आलय ते जतन करायला हवं. आपल्या परंपरा वगैरे. ”

“चांगल्या परंपरा जपाव्या, ज्या बदलण्याची खरंच गरज आहे त्या बदलाव्या. आणि ही पद्धत बदलण्याची गरज आहे असं मला वाटतं. इतर दिवशी नाही रे पण एखाद विकेंडला आपण जेवण बनवलं तर काय हरकत आहे. पुण्याला होतो तेव्हा तू आणि मी आलटून पालटून जेवण बनवायचो विकेंडला. आठवतंय ना… आपली कामं सुद्धा आपणच करायचो. मग आता त्यातलं थोडंसं केलं तर काय हरकत ना. तुझ्या सारखं चिकन अंजलीला नक्कीच बनावता येत नसेल. तू कधी बनवलंस शेवटचं?” अभिने भांडी घासता घासताच विचारलं.

“चार पाच वर्ष झाली असतील. पण रेसिपि अगदी लक्षात आहे माझ्या. आणि साल्या, तुलाही काही कमी गोष्टी येत नाही. आई बाबांच्या घरी असतानासुद्धा तुझा नाश्ता तूच करून खायचास. तुझ्या आवडीने. भाजी खायचे नखरे ना तुझे..”

“त्याच सवयी आता कामी येतात रे. बऱ्याचदा नाश्ता मीच बनवतो. ऑम्लेट बनवण्यात माझा कुणी धरू शकत नाही माहितीये ना तुला. कधी कधी बिर्याणी वगैरे पण बनवतो. स्वाती आणि अंबर दोघांनाही आवडतं माझ्या हातचं खायला. कधी झाडू मी मारतो, स्वाती लादी पुसते. कधी स्वाती कपडे धुते मी भांडी घासतो. त्यामुळे कामं पटापट होतात आणि दोघांनाही बराच वेळ मिळतो. ”

“सही बात बोली है भाई तुने. मीही उद्यापासून मदत करेन अंजलीला. आणि हो, पुढच्या रविवारी माझ्या घरी लंच फिक्स. तू, स्वाती आणि अंबर येताय माझ्या घरी. खाओ इस हात से बना चिकन.”

“चलो डन.”

“आणि झाली की नाही तुझी भांडी घासून?? निघू का मी??”

“हो झाली. निघ. गेटवर भेटतो तुला.” अभि सर्व आवरत म्हणाला.

“ठीके.” एवढं बोलून समीरने फोन कट केला.

अभिने मागे वळून पाहिलं तर स्वाती त्याच्याकडे बघून हसत होती. अभिसोबत लग्न केल्याचं समाधान त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं.

©प्रतिलिखित

24202cookie-checkवाटणी

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

संसार

संसार

शहीद

शहीद

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 123,226 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories