
महिला दिन की महिला दीन
नवरात्री आणि महिला दिन ह्या दोन दिवशी आपल्याला सर्वत्र नारी शक्तीचा जागर पाहायला मिळतो. ह्या दिवशी घरी स्वतःच्या बायकोला मुठीत ठेवणारे काही लोक सोशल मीडियावर किंवा इतर सामाजिक कार्यक्रमात महिला दिनाच्या शुभेच्छा देताना दिसतात. ह्या अनेक कार्यक्रमांमध्ये महिला सबलीकरण, नारीवाद अशा अनेक विषयांवर भाषणे झाडली जातात. आणि दुसऱ्या दिवशी? परिस्थिती जैसे थे.
अनेकदा महिला सबलीकरण आणि स्त्रीवादाबद्दल सर्वसामान्यांच्या विशेषतः पुरुषांच्या मनात संभ्रम असल्याचं निदर्शनास येतं. आपण ही गोष्ट लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की, ज्यावेळी एखादी महिला आपण फेमिनिस्ट (स्त्रीवादी) असल्याचं म्हणते त्यावेळी तिला पुरुषांप्रमाणेच समान हक्क मिळणं अपेक्षित असतं. पुरुषांना पिछाडीवर टाकण्याचा किंवा त्यांना दुय्यम लेखण्याचा उद्देश त्यामागे कधीच नसतो. (काही अपवाद वगळता)
पण एखादी स्त्री आपल्या एक पाऊल पुढे जातेय, आपल्या पेक्षा जास्त यशस्वी होतेय हे पाहून काही जणांचा पुरुषी अहंकार दुखावला जातो. आणि मग त्या स्त्रीला त्या क्षेत्रात मात देता येत नाही हे पाहून ते कुरघोड्या करायला सुरुवात करतात.
भारतासारख्या देशात तर स्त्री आधीपासूनच पूजनीय आहे. प्राचीन भारतापासून स्त्रीला सर्वोच्च स्थान देण्यात आलेले आहे. समस्त सृष्टीचे जनक आणि पालक ब्रम्हा, विष्णू आणि महेश हे तिघेच जिथे स्त्री शक्तीपूढे नतमस्तक आहेत तिथे आपल्यासारख्या सामान्य माणसाची काय कथा. पण पुढे काही काळानंतर ठराविक पुरुष मंडळींनी स्वतःच्या स्वार्थासाठी स्रियांना दुय्यम स्थान देण्यास सुरुवात केली आणि पुढे तीच प्रथा कायम झाली.
शिवाय भारतात स्त्रिया आधीपासूनच सबल आहेत. राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई, महाराणी ताराबाई यांसारख्या अनेक महिलांनी ते वेळोवेळी सिद्ध केलंय. पण बऱ्याचदा महिला आपल्यावर होणारे अन्याय निमूटपणे सहन करताना दिसतात. लोक काय म्हणतील किंवा घरच्यांची बदनामी होईल म्हणून बऱ्याचदा अन्याय करणाऱ्यांना पाठीशी घातलं जातं आणि मग अशा लोकांचं फावतं.
कधीतरी महिला असण्याचा स्वतःच्या स्वार्थासाठी गैरफायदाही घेतला जातो. एखाद्यावर सूड उगवण्यासाठी किंवा कुणाच्यातरी सांगण्यावरून एखाद्या पुरुषावर आरोप केले जातात आणि मग कित्येकदा त्यांना त्यांनी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागते. कधी कधी ह्या आरोपातून त्यांची निर्दोष सुटकासुद्धा होते पण त्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत खूप वेळ गेलेला असतो आणि त्याच्यासोबतच संपूर्ण कुटूंबही उध्वस्त झालेलं असतं.
महिला सबलीकरण हे जरी अत्यंत महत्वाचं असलं तरीसुद्धा त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात नाहीये ना ह्याबाबत इतर महिलांनी जागरूक असणंही तितकंच महत्वाचं आहे. स्त्रीवादाकडे केवळ एखादा पुरुष करतो म्हणून मला ते करायचंय असं न पाहता ‘मला ते योग्य वाटतंय म्हणून मी ते करतेय’ अशा दृष्टिकोनातून पाहायला हवं. तरच खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण आणि स्त्रीवादाची व्याख्या आपल्याला समजली असं आपण म्हणू शकू.
©PRATILIKHIT
No Comment