
लायकी
‘शी यार…..माझ्या फोटोला फक्त एकशेवीस लाईक्स आलेत. त्या दिशाने सुद्धा माझ्यासोबतच फोटो टाकला होता , पण तिच्या फोटोला पाचशेच्या वर लाईक्स…’ रीना फोन बिछान्यावर फेकत किंचाळली.
“अगं तिचे फॉलोअर्स बघ, आणि तुझे फॉलोअर्स बघ. तिला जास्तीच येणार ना लाईक्स.” शौनक हसतच म्हणाला.
“हसू नकोस तू….जरा माझा फोटो स्टोरी मध्ये टाक तुझ्या आणि मला माझे फॉलोअर्स वाढवायला मदत कर.”
“पण मला एक सांग. लाईक्स इतके मॅटर करतात का??” शौनकने लॅपटॉप बाजूला ठेवत विचारलं.
“हो मग! सोशल मीडियावर खूप महत्त्वाचं असतं ते. जेवढे जास्त लाईक्स, फॉलोअर्स तेवढी सोशल मीडियावर तुमची वट जास्त. तुमच्या कमेंट्सला किंमत जास्त.”
“अच्छा. म्हणजे आता लाईक्स वरून लायकी ठरायला लागलीये वाटतं.”
“तसंच काहीसं आहे. पण तुला नाही समजणार. तू कुठे सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह आहेस इतका. शेवटचा फोटो तर मीच टाकला होता तुझ्या अकाउंटवरून. तो सुद्धा आपण मनालीला फिरायला गेलेलो तेव्हा. तुझे फॉलोअर्स पण शंभरच्या आत आहेत.”
“तुला कोण म्हणालं की की सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नाही असं. की फोटो टाकत नाही, काही शेअर करत नाही याचा अर्थ असा नाही की मला सोशल मीडियावरचं काही कळतंच नाही. आणि माझे फॉलोअर्स कमी आहेत म्हणजे माझी लायकी नाही असं समजायचं का मी???”
“म्हणजे मला अगदीच तसं नव्हतं म्हणायचं..” रीना सारवासारव करत म्हणाली.
“नाही तसंच आहे. आणि हा समज फक्त तुझा नाही तर बऱ्याच जणांचा आहे. म्हणजे एक साधं उदाहरण देतो तुला. आपले मराठी नाटक करणारे कलाकार. अर्थात नाटक हे कलाक्षेत्रातलं सर्वात कठीण काम आहे. कारण सिनेमा, मालिका या सगळ्यामध्ये रिटेक घेता येतो. पण नाटकामध्ये प्रेक्षकांच्या समोर आपली कला सादर करायची असते. एक चुकसुद्धा खूप महागात पडू शकते. आणि कलाकार ते अतिशय उत्तमरीत्या पार पाडतात. पण जर तू सोशल मीडियावर त्या कलाकारांची अकाउंट पाहिलीस तर त्यांचे फॉलोअर्ससुद्धा कमीच असतात. याउलट एखादी मॉडेल, टिकटॉक सारखे व्हिडिओ बनवणारे कलाकार यांचे फॉलोअर्स किती असतात हे मी तुला वेगळं सांगायला नको. पण म्हणून ते फॉलोअर्स कमी असणाऱ्या कलाकारांपेक्षा उत्तमच असतात असं म्हणू शकशील का तू?? जाणत्या कलाकारांच्या नखाचीही सर येणार नाही त्यांना. पण आपल्याकडे ज्याचे फॉलोअर्स जास्त तो कलाकार मोठा असा एक समज झालेला आहे.”
“पण कलाकार तर प्रेक्षकांच्या पसंतीने मोठा होतो ना. आणि फॉलोअर्स म्हणजे पण प्रेक्षकच.”
“हो पण प्रसिद्धी आणि योग्यता ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. प्रसिद्धी तुम्हाला एका रात्रीतसुद्धा मिळू शकते. पण योग्यता ही सिद्ध करावी लागते. एखादा व्यक्ती प्रसिद्ध असेल म्हणून त्याने काहीही मत मांडलं तर तो म्हणेल तीच पूर्व दिशा असं नसतं. त्याने त्याचं मत मांडलं आणि तुझं मत त्याच्या अगदी विरुद्ध असू शकतं. आणि तू बरोबरसुद्धा असू शकतेस. पण आपल्याकडे सेलेब्रिटीला अगदी आंधळेपणाने फॉलो केलं जातं आणि मग तू त्याच्या विरोधात बोललीस तर तू बरोबर असूनही कशी चुकीची आहेस हे सांगण्याचा प्रयत्न करतात त्याचे फॅन्स.”
“हा हे मी अनुभवलंय एकदा.”
“पण हा वेगळा मुद्दा झाला. माझा सांगण्याचा उद्देश हाच होता की तुझ्या फोटोला लाईक्स कमी मिळाले म्हणजे तू योग्य नाहीयेस असं नाही. आपल्या मनातली ही FOMO ची भावना पहिले काढून टाकायला हवी. सोशल मीडिया हे व्यक्त होण्याचं साधन आहे. स्वतःची किंमत ठरवण्याचं परिमाण नाही. त्यामुळे लाईक्स कमी मिळतात म्हणून तू कोणाला आवडत नाहीस असं नाही. आणि तुझं आयुष्य फक्त सोशल मीडियापुरतं मर्यादित नाही. सोशल मीडियाच्या आभासी जगाच्या पलीकडे तुझं स्वतःच असं एक जग आहे ज्यात तुझं कुटुंब, तुझे मित्रमैत्रिणी हे सगळे आहेत आहे आणि तेच तुझ्या आयुष्यात मिळालेले खरे फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियाचा जितका विचार करशील तितकी तू त्यात गुरफटून जाशील. जेवढ्यास तेवढं ठेवलेलं चांगलं. ”
“हं… बघते प्रयत्न करून…” रीना मोबाईल बंद करत म्हणाली.
“आपल्या आयुष्यात कशाचं महत्व अधिक आहे हे आपल्याला समजायला हवं रीना. अपेक्षांचं ओझं वाढत गेलं तर एक दिवस त्याखाली दबून जातो माणूस. आणि मग त्याखालून बाहेर पडता येत नाही.” एवढं बोलून शौनक पुन्हा लॅपटॉपमध्ये डोकं खुपसुन बसला पण त्यांच्या तेवढ्याशा संवादातूनसुद्धा रीनाला मात्र बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली.
©PRATILIKHIT
No Comment