सुखी माणसाचा सदरा

सुखी माणसाचा सदरा

“सदू…काम झाल्यावर जरा वरती ये…” पंकज शेठने वरच्या गच्चीतूनच आवाज दिला.

“व्हय जी…” सदूने हातातलं फावडं सावरत प्रतिसाद दिला.

सदानंद डोईफोडे. पण सगळे त्याला सदू म्हणूनच ओळखत. अगदी लहानपणापासून तो पंकज शेठकडे कामाला होता. त्या काळी शिक्षणाचं इतकं महत्व नव्हतं म्हणून शिक्षणाच्या वगैरे फंदात सदूचे वडील पडले नाहीत. पण सदूने मात्र त्याच्या मुलीला चांगल्या शाळेत घातलं होतं. आपल्या मुलीने आपल्यासारखं अडाणी राहू नये असं त्याला सारखं वाटायचं. आणि त्याच्या ह्या निर्णयाला पंकजशेठने पूर्ण पाठिंबा दिला होता. मुलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च पंकजशेठच करायचे. दिवाळी आली की सदूच्या कुटुंबाला नवीन कपडे, मिठाई असं सगळंसगळं मिळायचं.

बागेतलं काम आवरून सदू वर गेला. वर पंकजशेठ, कार्तिकीबाई आणि पंकजशेठचा परदेशात उच्च शिक्षण घेत असलेला मुलगा अपराजित असे तिघेही बसले होते. सदू नेहमीप्रमाणे खाली बसू लागला तेवढ्यात अपराजित पुढे आला आणि त्याने सदूला उठवून तो नाही म्हणत असतानाही शेजारी असलेल्या खुर्चीवर बसवले.

“सदुकाका…आजपासून तुम्ही खाली बसणार नाहीत. तुम्हीही खुर्चीवरच बसायचं.” अपराजित म्हणाला.

“पण छोटे मालक..हे काय आता वेगळं. आमची जागा तुमच्या पायाखालीच.”

“नाही सदुकाका. हे असं सगळं आपण करून ठेवलंय म्हणून पाळतोय आपण. मी इतकी वर्षे परदेशात आहे. तिकडे असं काही नाही. अगदी बागकाम करण्यापासून, सफाई करणाऱ्यांपर्यंत सर्वांना समान वागणूक आहे तिथे.”

“जैसा देश तैसा वेश छोटे मालक..”

“तेही खरंच आहे म्हणा. मी तुम्हाला बोलावलंय कारण मी एक प्रोजेक्ट करतोय आणि त्यासाठी मला तुमची मदत हविये.”

“माझी??? मी काय मदत करणार तुम्हाला?? मी तर अडाणी माणूस..”

“तुम्ही शिक्षणाने जरी अडाणी असलात तरीसुद्धा तुमचा अनुभव खूप दांडगा आहे काका. आणि अनुभवाशिवाय जास्त ज्ञान पुस्तकेही देऊ शकत नाही.”

“ज्याचे त्याचे विचार..दुसरं काय??”

“सदू काका.तुमच्या मते सुख म्हणजे नक्की काय असतं???”

“बघा हा छोटेमालक. सुख म्हणजे काय हे प्रत्येक व्यक्तीच्या विचारावर अवलंबून असतं. आपण आपलं सुख कशात मानतो यावर सगळं अवलंबून आहे. एखाद्याला नेहमी खायला पंचपक्वान हवे असतात, घालायला उंची कपडे हवे असतात. त्यात त्याच सुख असतं तर आमच्यासारख्या गरिबाला दोन वेळचं अन्न आणि अंग झाकेल एवढं कापड जरी मिळालं तेवढं पुरेसं असतं.”

“पण सदू काका..तुम्हाला असं वाटत नाही का?? की आपल्याकडे सुद्धा खूप पैसे असावे. ऐशोआरामत राहावं.”

” माफ करा छोटे मालक. पण सगळी सुखं पैशांनी विकत घेता येत नाही ना. म्हणजे आपल्या मालकांचं उदाहरण घ्या. काय कमी आहे आपल्या मालकांकडे?? सगळी सुखं लोळण घेत आहेत. पण तरीसुद्धा मालकांना मिठाई आवडत असूनही खाता येत नाही. कारण मालकांना डायबेटीस आहे.मग ते मिठाईच्या एखाद्या तुकड्यावरच समाधान मानून घेतात.”

“पण माणूस कधी समाधानी असतो का??”

“आपल्याकडील गरिबी ही मुळात आपल्या लोकांच्या मानसिकतेमधून आली आहे. आपल्याकडे आपल्या गरजेव्यतिरिक्त अवाजवी खर्च करण्यासाठी पुरेसा पैसा नाही म्हणजे आपण गरीब…अशी अनेकांची समजूत असते. स्वतःच्या घरात राहून गगनचुंबी स्वप्न पाहणाऱ्यांनी एकदा तरी थोडं बाहेर पडून पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की आपण इतरांच्या मनाने किती तरी सुखी आहोत. ”

“पण माझा प्रश्न अजूनही आहेच. माणूस समाधानी असतो का??”

“सुखाचा हव्यास हा सर्वांनाच असतो..पण म्हणून कोणाचं तरी बघून तशाच गोष्टी आपल्याला हव्यात म्हणून आहे ते सुख टाकून स्वतःच्या नशिबाला दोष देत जगण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यातच समाधान मानून जगलं तर आपलं जगणं अधिक समृद्ध होणार नाही का ??”

“पण सगळ्यांनाच हे जमतं का??”

“आता बघा. सगळ्यांना हे जमणं शक्य नाही. पण ज्याला जमलं त्याच्या सारखा सुखी माणूस दुसरा शोधूनही सापडणार नाही. आपण बऱ्याचदा आपल्याला काय हवंय ह्या पेक्षा समाज काय बोलेल ह्याचा विचार जास्त करतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे दुचाकी, चारचाकी घ्यायला पैसे नाहीत म्हणून तो सायकल वापरत असेल तर त्याला गरीब म्हटलं जायचं आणि आता तर लोकं व्यायामासाठी चारचाकी बाजूला ठेवून सायकली घेत सुटलेत. हा मी हे म्हणत नाहीये की एखाद्याची परिस्थिती गरीब असेल, त्याला खायला वेळेवर अन्न मिळत नसेल म्हणून ज्यांची परिस्थिती चांगली आहे त्यांनीही सगळं सोडून त्याच्यासारखंच हलाखीत जगलं पाहिजे. असतो नशिबाचा भाग. पण सभोवतालच्या मायाजालात न गुरफटता स्वतःची परिस्थिती ओळखून त्यानुसार छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानायला जो शिकला तोच सर्वात सुखी माणूस असं मी म्हणेन.”

©PRATILIKHIT

20012cookie-checkसुखी माणसाचा सदरा

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

संसार

संसार

वाटणी

वाटणी

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 115,793 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories