
शक्तिरूपेणसंस्थिता
जेव्हा जेव्हा एखाद्या स्त्रीवर अत्याचार होतो तेव्हा तेव्हा स्त्री-सबलीकरणाचा मुद्दा पुढे येतो. पण खरंच गरज आहे स्त्री-सबलीकरणाची?? मला नाही वाटत असं. त्याच कारण हे की स्त्री ही आधीपासूनच स्वतःच संरक्षण करण्यास समर्थ आहे. केवळ स्वतःपुरतच नाही तर अनेकवेळा तिने दुष्टांचा संहार करून संपूर्ण सृष्टीचं संरक्षण केलेलं आहे. समस्त देव हतबल ठरल्यावर ज्या एकट्या मातेने दुष्टांचा नायनाट केला त्या स्त्रीला सबलीकरणाविषयी सांगण्याची आपली खरोखरच पात्रता आहे का? स्त्री तिच्या काली रूपात अवतरित झाल्यावर समस्त देवलोक तिच्याकडे पाहून कापायचा तिथे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाची काय कथा.
तसं बघायला गेलं तर सुरवातीपासूनच संपूर्ण विश्व पुरुषप्रधान संस्कृतीचे पालन करत आलेलं आहे. स्त्री शक्तीला नेहमी दुय्यम स्थान देण्यात आलं आहे. मात्र जेव्हा जेव्हा पुरुष संकटात सापडला तेव्हा तेव्हा स्त्रीने खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभे राहून त्याचे संरक्षण केलेले आहे. मात्र आजच्या एकविसाव्या शतकात मात्र परिस्थिती बरीचशी बदललेली दिसते. कारण स्वतःची क्षमता सिद्ध करून स्त्रियांनी संपूर्ण जगाला त्यांची दखल घेण्यास भाग पाडलं आहे. ज्या क्षेत्रांमध्ये स्त्रियांचा कधी विचारही केला गेला नाही अगदी त्या क्षेत्रांमध्ये सुद्धा हल्लीच्या स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत.
असं म्हणतात की सौभाग्याचा आधार नसला तर एका स्त्रीला घर सांभाळणं कठीण जात..परंतु आज अशी किती तरी उदाहरणं आहेत ज्या मध्ये एकाकी पडलेल्या स्त्रीने संपुर्ण संसाराचा रहाटगाडा हिमतीने ओढला आहे. किंबहुना स्त्रिया नेहमी दूरदृष्टीने विचार करतात.
इतिहास साक्षी आहे की प्रत्येक युगपुरुष घडण्यामागे एका स्त्रीचा महत्वाचा वाटा आहे. जर जिजाऊ नसत्या तर आज कदाचित वर्तमान काही वेगळाच असता..त्यांना शहाजीराज्यांचा पाठिंबा होता याबाबत दुमत नाहीच परंतु परमुलूखात असूनसुद्धा जिजाऊंनी दूरदृष्टी ठेवून छत्रपती शिवाजी महाराज्यांचा योग्य ते मार्गदर्शन केलं. संपूर्ण राज्य, स्वकीय विरोधात असताना अहिल्याबाई होळकरांनी तेवढ्याच हिमतीने उभे राहून राज्य सांभाळलं. अशी असंख्य उदाहरणे देता येतील.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते..आणि ते तितकंच खरं आहे. पुरुष कितीही यशस्वी असला, कर्तृत्ववान असला तरी सुद्धा मनुष्याला एक भावनिक आधार लागतोच..एक आई म्हणून, पत्नी म्हणून, एक बहीण म्हणून किंवा एक मैत्रीण म्हणून स्त्री ही सतत पुरुषाच्या मागे ठामपणे उभी असते..त्यामुळे नारीशक्ती ही पुरुषाच्या यशाचं कारण असते असं म्हटल्यास काही वावगं ठरणार नाही.
© PRATILIKHIT
1 Comment