
आम्हाला काय करायचंय??
पुन्हा एकदा एक पणती विझवली गेली
पण आम्हाला काय करायचंय
कारण आम्ही व्यस्त आहोत
वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून
आभासी दुनियेतील नायकांसाठी न्याय मागण्यात
ड्रग्ज सारख्या प्रकरणात अडकलेल्या कलाकारांना
आमचे रोल मॉडेल मानण्यात
आम्ही व्यस्त आहोत
सिनेअभिनेत्रींना उच्च दर्जाच्या सुरक्षा पुरवण्यात
कोण कसं किती ढसाढसा रडतंय
ह्याची माहिती सर्वप्रथम लोकांना देण्यात (ज्यामध्ये सर्वसामान्य जनतेला काहीही रस नाही )
मग ह्या सगळ्यात काही पणत्या अजून विझल्या
तर आम्हाला काय करायचंय
पडू देत असंख्य निर्भया, मनीषा बळी
होईल केस रजिस्टर नंतर, चालेल तीही वर्षानुवर्ष
कदाचित काही वर्षांनी शिक्षा किंवा पुराव्यांअभावी सुटकाही होईल
त्या घरातल्या पणतीचा उजेड मात्र कायमचा हरवून जाईल
पण आम्हाला काय करायचंय
चालतील पुन्हा एकदा कँडल मार्च
सोशल मीडियावर बातम्या, कंमेंट्सचा पूर येईल
काही दिवस चालेल हे सगळं मग पुन्हा शांत होईल
आणि सगळं शांत झाल्यावर पुन्हा अशीच एक बातमी कानावर पडेल
आणि मग पुन्हा तेच…
© PRATILIKHIT
No Comment