निर्णय

निर्णय

 

“काय ???” फोनवरचं बोलणं ऐकून स्नेहाच्या आईला धक्काच बसला. पलीकडून आवाज येत होता पण ते ऐकण्याचं भान त्यांना राहिलं नाही. कसंबसं सावरत त्यांनी स्नेहाच्या वडिलांना हाक मारली.

“अहो. जरा इकडे येता का? ही बघा ना काय बोलतेय ?”

“कुणाचा फोन आहे आणि काय बोलतंय कोण?”

स्नेहाच्या वडिलांनी फोन घेता घेता विचारलं आणि बातमी ऐकून त्यांनासुद्धा भोवळ आली.

संजीवनी हॉस्पिटलच्या आयसीयू वॉर्डच्या बाहेर स्नेहाचे आईवडील आणि तिची मैत्रीण विशाखा तिघेही बसले होते. स्नेहाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. विशाखानेच तिच्या घरी फोन करून तिच्या आईवडिलांना याबाबत सांगितलं होतं. बराचवेळ तिघेही गप्प होते. ती शांतता असह्य होतेय म्हणून स्नेहाच्या वडिलांनीच बोलायला सुरुवात केली.

“विशाखा…बाळा तुला काही माहित आहे ह्या बद्दल? स्नेहाने असं पाऊल का उचललं?? का तिला तिचं आयुष्य संपवावंसं वाटलं?? कसली प्रेमाची वगैरे भानगड होती का??”

“काका..”

“नक्कीच काहीतरी चूक घडली असेल तिच्या हातून… आणि कुणाला सांगावंसं असं नसेल म्हणून केला असेल आत्महत्येचा प्रयत्न.” स्नेहाच्या आईने सरळ बोलून टाकलं.

“तू जरा शांत राहशील का??” ” हा बाळा बोल..” स्नेहाच्या वडिलांनी विशाखाकडे पाहत म्हटलं.

“तिला काय विचारताय ?? ह्या मैत्रिणी एकदुसरीला सामील असतात.” स्नेहाच्या आईने पुन्हा आपलं तोंड उघडलं.

“हो..चूक घडलीये. पण ती स्नेहाच्या हातून नाही तर तुमच्या हातून…” विशाखा एका दमात म्हणाली.

“म्हणजे…आम्ही काय केलं ??” स्नेहाच्या वडिलांनी आश्चर्याने विचारलं.

“काका स्नेहाने कधी तिच्या करिअरबद्दल तुमच्याशी काही शेअर केलं होतं ?? म्हणजे तिला काय व्हायचंय वगैरे??”

“फॅशन डिझायनर व्हायचं होतं तिला. कुठून खूळ डोक्यात शिरलं होतं कोण जाणे. ” स्नेहाची आई पुन्हा म्हणाली.

“हो तसं मागे एकदा म्हणाली होती ती की तिला कपडे डिझाईन करायला वगैरे आवडतं. मी तिला म्हटलं होतं की बघ बाई तुला कशात करायचं आहे त्यात कर करिअर. पण नंतर तिने इंजिनिअरिंग निवडलं. ” स्नेहाच्या वडिलांनी त्यांच म्हणणं मांडलं.

“तिने निवडलं की तिला निवडायला लावलं ??” विशाखा स्नेहाच्या आईवर नजर रोखत म्हणाली.

“म्हणजे ??”

“तिच्यावर इंजिनिअरिंग निवडण्यासाठी जबरदस्ती केली गेली होती ना??”

“कोण म्हणालं असं??? तिच्यावर कुणीही जबरदस्ती नव्हती केली. ”

“काका हेच जरा तुम्ही काकूंना विचारलं तर बरं होईल. ” विशाखा नजर न हटवता म्हणाली.

“हो. मीच म्हणाले होते तिला की इंजिनिअरिंगच घ्यायचं म्हणून. काय ते कपडे वगैरे डिझाईन करत बसायचं होतं तिला. माझ्या सगळ्या मैत्रिणींची मुलं इंजिनिअरिंग,आर्किटेक्चर आणि मेडिकलला ऍडमिशन घेत होती. हिने असं आर्ट वगैरे घेतलं असतं तर काय तोंड दाखवलं असतं मी माझ्या मैत्रिणींना ???” स्नेहाच्या आईने उत्तर दिलं.

“पण काकू तिला काय करायचंय आयुष्यात हे सुद्धा विचारात घेणं महत्वाच नाहीये का??”

“हल्लीच्या मुलांना काही कळत नाही काय चांगलं काय वाईट. सोशल मीडियावर काहीतरी पाहतात आणि मग तेच करायचा हट्ट धरून बसतात. त्यांच्या निर्णयाला प्रोत्साहन द्यायचं म्हणजे त्यांच्या करियरची मातीच झाली समजायची.”

“काकू, मला मान्य आहे की सोशल मीडियावर, इंटरनेटवर जे दाखवतात ते सगळं खरं नसतं पण तुम्ही असं तर नाही म्हणू शकत ना की हल्लीच्या मुलांना काही कळत नाही. उलट आता तर किती तरी करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. तरी सुद्धा एखाद्या प्रथेप्रमाणे आपल्या मुलाला किंवा मुलीला इंजिनिअर किंवा डॉक्टर बनवण्याचं स्वप्न अनेक जण आजही आपल्या उराशी बाळगतात.”

“आपल्या मुलाचं भलं व्हावं हीच आमची अपेक्षा असते ना गं. आम्ही काय त्यांच्या वाईटाचा विचार तर करत नाही कधी.”

“हो मला मान्य आहे काकू पण म्हणून आपल्या मुलाला जबरदस्ती करून त्याला न आवडणाऱ्या एखाद्या क्षेत्रात पाठवणं हे कितपत योग्य आहे. ??”

” तू सुद्धा करतच आहेस ना इंजिनिअरिंग..”

“हो. करतेय ना..कारण मला त्याची आवड आहे. मला आवडतं वेगवेगळ्या कॉम्पुटरच्या भाषा शिकायला. मला आवडतं कोडिंग. आणि म्हणून मी इंजिनिअरिंग करतेय. कुणी जबरदस्ती केलं म्हणून नाही. आणि हो मला हेही मान्य आहे की जर मला इंजिनिअरिंग न करता इतर काहीतरी करायचं असतं तर त्यासाठी माझ्या घरच्यांकडून मला सुरुवातीला विरोध झाला असता कदाचित.आमच्या घरचंच हे उदाहरण आहे. माझा मोठा भाऊ आज आर्टिस्ट आहे. त्याने सुद्धा सुरुवातीला जबरदस्ती म्हणून इंजिनिअरिंग घेतली. दुसऱ्या वर्षाला त्याला ड्रॉप लागला. आणि त्या ड्रॉपच्या एका वर्षाच्या काळात त्याच्या चित्रांनी,स्केचने असा काही धुमाकूळ माजवला की घरच्यांसकट समाजाला त्याच्या कलेची दखल घेणं भाग पडलं. नंतर त्याने घेतलेली इंजिनिअरिंग कशीबशी पूर्ण केली पण आज तो एक उत्तम आर्टिस्ट आहे. त्याच सोबत तो इंटिरिअर डिझाईन वगैरे करतो. त्याची स्वतःची कला संस्था सुद्धा आहे.”

“पण सगळेच यशस्वी होतात असं नाही ना.. नाही झालं तर काय??”

“बघा काकू.. तुम्ही पालक आम्हा मुलांना कितीही बालिश,बिनकामी समजत असाल तरी आम्हालासुद्धा आमच्या करिअरची काळजी आहेच ना. आम्हालासुद्धा यशस्वीच व्हायचंय. पण नकारात्मकच विचार करून आम्हाला संधीच दिली जात नाही. आता स्नेहाबद्दल म्हणाल तर ती खूप उत्तम डिझायनर आहे. तिचे सगळे डिझाईन आवडले आहेत फॅशन इंडस्ट्रीमधल्या लोकांना. तिने डिझाईन केलेले कपडे घालून मॉडेल्स ने फॅशन शो गाजवलेत. तिला अनेक ऑफरसुद्धा येतात. पण फक्त आणि फक्त तुम्ही चिडाल म्हणून तिने तुम्हाला काहीच सांगितलं नाही. पण तिची घुसमट पाहिलीये हो मी. तिने जे पाऊल उचललं ते अत्यंत चुकीचं आहे हे मलाही माहितीये. माणसाला एखादी गोष्ट करण्यात तेव्हाच आनंद मिळतो जेव्हा ती गोष्ट त्याच्या आवडीची असते. मी असं म्हणत नाही की प्रत्येक जण यशस्वी होतोच पण एखाद्याला खरच त्या क्षेत्रात आवड असेल आणि त्यांना त्याच क्षेत्रात काम मिळालं की ते आणखी उत्साहाने ते काम करतात.”

“हं.. हे बरोबर बोललीस तू..”

“आणि होतं असं की जो पर्यंत आपला मुलगा प्रवाहाबाहेरच्या एखाद्या क्षेत्रात जाऊन यशस्वी होऊन दाखवत नाही ना तो पर्यंत आपला त्यावर विश्वास नसतो. एकदा का तो यशस्वी झाला की तुम्हीच इतरांना अभिमानाने सांगता ना.. मग त्यांना एक संधी तरी द्यायला हवी ना..”

“पण मग आता काय तिला इंजिनिअरिंगच शिक्षण अर्धवट सोडून फॅशन डिझायनिंग करून द्यायचं का??”

“नाही काकू.असं अजिबात नाहीये. कारण आता त्या गोष्टीला उशीर झाला आहे. ज्या गोष्टीचा विचार आधी व्हायला हवा होता तो विचार आता करून उपयोग नाही. तिसऱ्या वर्षाला आहोत आम्ही आता. एकदा पाण्यात पडलं की पोहावंच लागतं. नाही तर बुडतो आपण. ती हुशार आहे. आतापर्यंत प्रत्येक परीक्षेत तिला फर्स्ट क्लास मिळाला आहे. तिने केवळ नापास होण्याच्या भीतीने किंवा अयशस्वी होण्याच्या भीतीने हे पाऊल उचललं नाहीये. तिला फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे. इंजिनिअरिंगचा अभ्यास करतानासुद्धा ती वेगवेगळे कोर्स करू शकते जे तिला करायचे आहेत. तुम्ही फक्त तिला एक संधी द्यायला हवी. बाकी सगळं तिच्या हातात आहे आणि ते ती करेलच हा माझा विश्वास आहे. तुम्ही फक्त तिच्या कर्तृत्वावर शंका घेऊ नका. ”

“बरोबर बोललीस पोरी..आम्हीच आमच्या छकुलीला समजून घेण्यात कमी पडलो.” स्नेहाच्या वडिलांनी डोळ्यातील अश्रू पुसत म्हटलं.

“काका ही देवाने तुम्हाला दिलेली दुसरी संधी आहे. आज देवाच्या कृपेने स्नेहा मृत्यूच्या धोक्यातून बाहेर आहे. स्वतःच्या मुलीला जरा समजून घ्या. ती कधीच तुम्हाला निराश करणार नाही. ”

“चुकलंच माझं पण. मी माझ्या मैत्रिणींशी, नातेवाईकांशी ईर्षा करून माझ्या मुलीलासुद्धा ते करतात तेच करायला भाग पाडलं. तिचं ऐकून घ्यायला हवं होतं. तिला समजून घ्यायला हवं होतं. आज देव न करो काही विपरीत घडलं असतं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. माफ कर पोरी मला.”

© PRATILIKHIT

13910cookie-checkनिर्णय

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

संसार

संसार

वाटणी

वाटणी

6 Comments

Leave a Reply

Blog Stats

  • 118,731 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories