चिनी वस्तूंवर बहिष्कार???

चिनी वस्तूंवर बहिष्कार???

चिनी ड्रॅगनने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण भारत देशात संतापाची लाट उसळली आहे. खूप पूर्वीपासून सुरु असलेलं आणि हल्लीच युट्युब विरुद्ध टिकटॉक ह्या वादातून उजेडात आलेलं ‘Boycott China’ अभियान पुन्हा एकदा जोर धरत आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून, वस्तूंची तोडफोड करून लोकं आपला संताप व्यक्त करत आहेत. अनेक मोठमोठ्या मॉलमध्ये अगदी साध्या कंपासपेटीपासून ते मोबाईल, टीव्ही यांसारख्या महागड्या वस्तू ‘मेड इन चायना’ अशी स्वतंत्र वर्गवारी करून बाजूला काढून ठेवण्यात आल्या आहेत. पण खरंच शक्य आहे का चीनवर बहिष्कार टाकणं ??

भारतीय बाजारपेठेत सध्या इलेक्ट्रॉनिक्स, कपडालत्ता, खेळणी, औषधं, गाड्यांचे स्पेअर पार्टस इत्यादी अनेक गोष्टींमध्ये चीनची मक्तेदारी आहे. इतकंच नाही तर डिजिटल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा चीनचा खूप मोठा वाटा आहे. चिनी वस्तू स्वस्त असण्याचं महत्वाचं कारण म्हणजे कमी उत्पादन खर्च आणि मास प्रोडक्शन. इथे एक सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर आपली होलसेल दुकानं. किरकोळ दुकानदार ह्या होलसेल दुकानांमधून खूप जास्त सामान विकत घेतो आणि ते सामान सर्वसामान्य लोकांना त्याच्या छापील किंमतीला विकतो. ह्यात त्या किरकोळ दुकानदाराला वस्तू कमी किंमतीत मिळते कारण त्याने जास्त सामान खरेदी केलेलं असतं. अगदी तसंच चीनमध्ये कच्च्या मालाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं त्यामुळे त्याचा उत्पादन खर्च कमी होतो आणि निर्यात करताना त्यावर जास्त किंमत लावूनही ती किंमत इतर देशांच्या उत्पादन किंमतीपेक्षा कमीच असते. तसेच चिनी कंपन्या ह्या उत्पादनावरच लक्ष केंद्रित करत असल्यामुळे तो कामगारांची तब्येत, पर्यावरणाचे घटक आणि त्यावर दुष्परिणाम इत्यादीचा फार विचार करत नाही. त्यामुळे त्यांचं उत्पादन अखंडपणे सुरु असतं.

भारतीय बाजारपेठेत चीनच्या वस्तूंची चलती असण्याचं कारण चिनी बनावटीच्या वस्तू ह्या भारतीय बनावटीच्या वस्तूंपेक्षा १०% ते ७०% स्वस्त असतात. तसेच भारत आणि चीनच्या आयात निर्यात दरात प्रचंड तफावत आहे. म्हणजेच भारत वर्षाला साधारणपणे १६.४ बिलियन डॉलर्सच्या वस्तू चीनला निर्यात करतो ज्यामध्ये कॉटन, तांबे, मीठ, केमिकल इत्यादींचा समावेश आहे आणि तर चीनमधून वर्षाला साधारण २० बिलियन डॉलर्सच्या फक्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तू भारतात येतात. ह्याशिवाय विविध मशिनी, पंप, प्लास्टिक अशा सगळ्या मिळून जवळपास ५८.४ बिलियन डॉलर्सच्या वस्तू आपण चीनकडून विकत घेतो.

ह्याशिवाय डिजिटल मार्केटमध्येसुद्धा चीनची मक्तेदारी आहे. एकट्या टिकटॉक ह्या व्हिडिओ अँपचे जवळपास २०० मिलियन युझर आहेत याशिवाय शेअर इट, युसी ब्राऊझर, वी चॅट यांसारखे अँप वापरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे.

तर चीनवर बहिष्कार टाकणं शक्य नाही का ?? आहे. अगदी सगळ्याच बाबतीत नाही पण काही प्रमाणात आपण नक्कीच स्वदेशीचा अवलंब करू शकतो. स्मार्ट फोन, टीव्ही, गाड्यांचे स्पेअर पार्टस अशा गोष्टींचं उत्पादन करायला फार मोठा खर्च येतो. पण अनेक किरकोळ वस्तूंचं उत्पादन हे आजही भारतात होतं पण आपण किंमतीकडे बघून ते घेण्याचं टाळतो. अनेक चायनीज इंटरनेट अँपला पर्याय म्हणून भारतीय अँप नक्कीच भारतात डेव्हलप होऊ शकतात ज्यांचा सर्व भारतीय अभिमानाने वापरत करतील. दुकानदाराने माल घेताना तो कुठे बनला आहे हे तपासून घेतल्यावर त्याची एक वेगळी वर्गवारी करून तो माल वेगळ्या ठिकाणी लावला तर येणाऱ्या ग्राहकांना स्वदेशी आणि विदेशी माल ओळखण्यास मदतच होईल. अर्थात कोणता माल घ्यायचा हा निर्णय जरी त्यांचा असला तरी त्यांच्यासमोर स्वदेशीचा पर्याय नक्कीच उपलब्ध असेल.

आपल्या भारत देशात सणांचं खूप महत्व आहे. ह्या सणासुदीच्या दिवशी संपूर्ण बाजारपेठ चिनी वस्तुंनी सजलेली असते.आणि हाच चिनी वस्तूंच्या विक्रीचा सुवर्णकाळ असतो. अशा वेळी ट्रेंड बघण्यापेक्षा आपण थोडं आपल्या परंपरेला साजेशा गोष्टी केल्या तर ?? म्हणजे सजावट करायचीच पण पताके, प्लॅस्टिकच्या माळा वगैरे न घेता फुलांच्या, पानांच्या माळा वापरून सजावट केली तर… रोषणाई साठी लाईटची तोरणं, चिनी मेणबत्त्यांचा वापर न करता पणत्या, घरी केलेले आकाशकंदील अशा गोष्टींचा वापर केला तर… पूर्णपणे चिनी वस्तूंवर बहिष्कार शक्य नसला तरी काही प्रमाणात चिनी वस्तू वापरणं आपण नक्कीच कमी करू शकतो. न जाणो सध्या चालू असलेल्या आत्मनिर्भर भारताच्या अभियानांतर्गत आपल्यासमोर लवकरच स्वदेशी पर्याय उपलब्ध होतील.

© PRATILIKHIT

13530cookie-checkचिनी वस्तूंवर बहिष्कार???

Related Posts

शिवराज्याभिषेक

शिवराज्याभिषेक

Engineer’s Day

Engineer’s Day

ब्रह्मस्त्र…. #review

ब्रह्मस्त्र…. #review

राजकारणा पलीकडची मैत्री

राजकारणा पलीकडची मैत्री

1 Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 118,731 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories