Tiktok VS YouTube

कोणे एके काळी सोशल मीडियाच्या युगात टिकटॉक आणि युट्युब अशी दोन राज्ये होती. दोन्ही राज्यातील लोक आपापल्या राज्यात गुणगोविंदाने राहत होते. ना त्यांच्यात कोणताही वाद होता ना कोणतीही ईर्षा. टिकटॉक राज्य तसं नवीनच उदयाला आलं होतं. त्यामुळे त्यांचं संख्याबळ युट्युबच्या मानाने बरंच कमी होतं. आणि राजाने त्याचं राज्य त्याच्या शिपायांच्या हवाली केलं होतं. दोन्हीही राज्याचे शिपाई एकमेकांना त्यांच्या कामावरून हिणवायचे. त्यावरून त्यांच्यात वाद होऊ लागले. खटके उडू लागले. एके दिवशी यूट्यूबच्या एका शिपायाने समोरच्या राज्यावर जोरदार हल्ला चढवला. समोरच्या शिपायांनीही त्याला उत्तर दिलं. पण यूट्यूबच्या राजाला त्याच्या शिपायाने उचललेलं हे पाऊल आवडलं नाही आणि त्याने त्या शिपायाने केलेला हल्ला मागे घेतला. याचा इतर शिपायांना आला राग. त्यांनी सगळ्यांनी मिळून समोरच्या राज्यावर पुन्हा हल्ला चढवला. त्यात बाकीची प्रजाही सामील झाली आणि समोरील राज्य पार नेस्तनाबुत व्हायच्या मार्गावर आलं.

हि झाली कथा. आता थोडं वैचारिक वाचूया. मुळात वाद हा टिकटॉक विरुद्ध युट्युब हा नव्हताच. दोन्हीही अँपचा उपयोग त्यांच्यापरीने होत होता. युट्युब हे मनोरंजनापेक्षा माहिती मिळवण्याचा एक सर्वोत्तम स्रोत म्हणून अधिक वापरलं जातं तर टिकटॉक निव्वळ मनोरंजनासाठी. दोन्ही अँप आपापल्या जागी बरोबर होती. पण जिथे कन्टेन्टच्या नावाखाली केवळ आणि केवळ फालतूपणा केला जातो त्यावर कुणीतरी प्रकाश टाकणंही गरजेचं होतं. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि टिकटॉकवरचे सर्वच व्हिडिओ खराब नसतात. काही चांगलेही असतात पण त्यांचं प्रमाण दिवसेंदिवस अगदीच नगण्य होत चाललंय. त्याउलट युट्युब हे गुगल नंतर सर्वात मोठा माहितीचा स्रोत बनत आहे. साहजिकच आहे ना..पूस्तकातून पाच वेळा वाचून जितकं समजत नाही त्याहून जास्त त्याबाबत एक व्हिडिओ पाहून समजतं.

कुणाला काय पाहून आनंद मिळतो आणि त्याला काय करून आनंद मिळायचा आहे हा सर्वस्वी त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. कुणाला डॉक्युमेंटरी पाहायला आवडतात, कुणाला चित्रपट तर कुणाला मनोरंजनाचे व्हिडिओ. आणि युट्युब वर हे सर्व भरभरून उपलब्ध आहे. पण युट्युबवर व्हिडिओ पोस्ट करणं आणि तो लोकांनी बघणं हे बऱ्याच जणांसाठी जरा कठीण पडतं. त्या पेक्षा १५ सेकंदाचा व्हिडिओ बनवून तो व्हाट्स अप किंवा इंस्टाग्रामवर टाकून इतर लोकांपर्यंत पोहोचवणं त्या मानाने जास्त सोपं आहे. मागे जेव्हा टिकटॉक भारतात बॅन झालं होतं तेव्हा मी एकीला विचारल असता तिने जे उत्तर दिल होत ते मनाला पडेल असं होतं. ‘ ऍक्टिंग करायची हौस सर्वांनाच असते. पण सगळ्यांनाच सीरिअल, चित्रपट वगैरे मध्ये काम करायची संधी मिळेल असं नाही ना. जॉब वरून दमून भागून घरी आल्यावर थोडासा वेळ मिळतो त्यात थोडा विरंगुळा म्हणून स्वतःला आवडेल त्या डायलॉगवर किंवा गाण्यावर छोटा व्हिडिओ बनवायचा. हे प्रसिद्धीसाठी नाही तर स्वतःची हौस म्हणून करते. ‘ अरे बरेच जण आहेत कि ज्यांचे फॉलोअर्स कमी असले तरी त्यांचे व्हिडिओ खूप चांगले असतात. बाबा जॅकसनचंच उदाहरण घ्या ना. काय डान्स करतो तो पोरगा. चांगला कन्टेन्ट होता लोकांनी उचलून धरला कि नाही. खुद्द हृतिक रोशन, प्रभुदेवा यांनी त्याची दखल घेतली. नाही तर इतर ठिकाणी फेमस होण्यासाठी टिकटॉकवर कसले कसले व्हिडिओ टाकतात लोकं.कुठून कुठून रक्त, पाणी काढतील काही नेम नाही. बऱ्याच व्हिडिओमध्ये तर फालतूपणाचं भरलेला असतो.

हे सगळं सगळं ठीक होतं जो पर्यंत या शीतयुद्धात भारतीय म्हणून कुणाची भूमिका नव्हती. सगळे एक कलाकार म्हणून सामील होते. पण जेव्हा सगळे भारतीय एकत्र येऊन काही ठरवतात तेव्हा त्याचा काय परिणाम होऊ शकतो याच जिवंत उदाहरण आता सर्वांसमोर आहे. मागे जेव्हा स्नॅपचॅटच्या सिइओने “This app is only for rich people…I don’t want to expand into poor countries like India and Spain,”असं म्हटलं होतं तेव्हा भारतीयांनी मोबाइलमधून स्नॅपचॅट काढून टाकून कंपनीला एक जबरदस्त तडाखा दिला होता आणि त्याचीच पुनरावृत्ती आता पुन्हा टिकटॉकसोबत होताना दिसतेय. टिकटॉक आणि यूट्यूबच्या शीतयुद्धाबरोबरच चिनी वस्तू बॅन करायच्या लाटेने टिकटॉक असं वाहून गेलय कि अस्तित्वाची लढाई सुरु आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

या सर्वांवरून आपण हे निश्चितच म्हणू शकतो कि येणाऱ्या काळाची सूत्रे ह्या नव्या भारताच्या हाती असू शकतात. आणि याच काळात जर भारत स्वयंपूर्ण बनला तर संपूर्ण जगासाठी एक अत्यंत महत्वाची भूमिका बजावू शकतो यात शंकाच नाही.

© PRATILIKHIT

13150cookie-checkTiktok VS YouTube

Related Posts

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 123,027 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories