हमसफ़र..

हमसफ़र..

 

” अमेय….परवा आभाच्या पेंटिंगचं प्रदर्शन आहे..तू येतोय ना बघायला…”

” नाही रे…आमचं ब्रेकअप झाल्यापासून आम्ही बोललोसुद्धा नाही..कसं येणार प्रदर्शनाला..”

” तरी मी तुला सांगत होतो की नको करू ब्रेकअप म्हणून…पण तू माझं काही ऐकलं नाहीस.” प्रसाद गाडीला किक मारता मारता म्हणाला ” ठीक आहे…पण मी जाणार आहे..आभाने स्वतः आमंत्रण दिलंय.”

” हो ठीक आहे..तिला माझ्याकडूनसुद्धा अभिनंदन सांग..”

“तू स्वतः केलं असतंस तर बरं झालं असतं पण ठीक आहे. मी सांगेन तिला.” प्रसाद जाता जाता म्हणाला.

अमेय नाही येणार म्हणाला खरा पण आभा काही त्याच्या डोक्यातून जात नव्हती. आभा, प्रसाद आणि अमेय..तिघेही एकदम जिगरी दोस्त..अगदी डिप्लोमापासून ते डिग्रीपर्यंत सोबत..एखाद्याच्या आयुष्यात काही घडलं आणि त्याची दुसऱ्या दोघांना कल्पना नसेल असं कधीच घडलं नाही. त्यात आभा आणि अमेय एकमेकांच्या प्रेमात..त्यांच्यासारखं कपल संपूर्ण कॉलेजमध्ये नव्हतं असे सगळेच म्हणायचे..एकदम आयडियल कपल..अमेय फार पोक्त होता पण आभा कधीच गोष्टी सिरियसली घ्यायची नाही. ती अमेयबरोबरच्या रिलेशनशिपबाबत जरी सिरियस असली तरी स्वतःचं आयुष्य तिने अगदी वाऱ्यावर सोडून दिलं होतं. तिला इंजिनिअरिंग अजिबात आवडत नव्हती. पुस्तकांपेक्षा तिचं मन रंगात रमायचं. लहानपणापासून तिला चित्रकलेची खूप आवड..पण घरच्यांच्या हट्टापायी तिने इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. ती अभ्यासातही हुशार होती त्यामुळे केटी, ड्रॉप असा कोणता अडथळा तिला आला नाही. अमेयला सुद्धा इंजिनिअरिंगमध्ये फारसा रस नव्हता..पण तो इंजिनिअरिंग सोबतच त्याचा छंद जोपासत होता. त्याने बऱ्याचदा आभाला याबाबत सुचवलं होतं पण आभाने ते कधीच सिरियसली घेतलं नाही. इंजिनिअरिंग झाल्यावर दोघेही एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाला लागले पण आभाची होणारी फरफट त्याला बघत नव्हती. यातून तिला बाहेर काढायचं म्हणून मग त्याने प्रसादला हाताशी धरून एक प्लॅन आखला आणि तिच्याशी ब्रेकअप केलं. सुरुवातीला दोघांनाही खूप त्रास झाला. आभाची अवस्था तर वेड्यासारखी झाली होती. पण प्रसाद तिला वेळोवेळी समजावून सांगायचा. तिच्या मनातले अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले होते. पण शेवटी अमेयच्या मनासारखं झालं होतं. ब्रेकअप नंतर एकाच कंपनीत राहणं शक्य नसल्याने तिने नोकरी सोडली. दुसरी नोकरी मिळेपर्यंत तिने घरच्या घरी पेंटिंग काढायला सुरुवात केली. आणि नंतर ती त्यात इतकी रमली की दुसरी नोकरी मिळवायचा विचार तिने तात्पुरता स्थगित केला आणि व्यावसायिक तत्वावर पेंटिंग करायला सुरुवात केली.

इकडे अमेय सुद्धा काही काळासाठी ऑन साईट गेला. आणि मग त्या दोघांमधला दुरावा आणखीनच वाढला. प्रसाद कधीतरी तिने काढलेली चित्र, स्केचेस अमेयला फोटो काढून पाठवायचा. ती पाहून त्याला मनोमन समाधान वाटायचं. नंतर जसजसा वेळ निघून गेला तसे दोघेही आपापल्या आयुष्यात गुंतत गेले. अमेय काही काळाने पुन्हा भारतात आला आणि त्याच्या कामात व्यस्त झाला…

आज तिच्या त्या पेंटिंगचं प्रदर्शन होतं. अमेयला मनापासून वाटत होतं की जावं आणि तिला भेटावं. पण कोणत्या तोंडाने तिच्यासमोर जाणार…म्हणून तो घरीच राहिला.प्रसादने त्याला फोन केला होता पण त्याने तो उचलला नाही. त्यांच्या कॉलेजचे अनेक जण त्यांच्या स्टेटसमध्ये आभाच्या प्रदर्शनाचे फोटो टाकत होते. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत होते. ते पाहून मनोमन अमेयला त्याने घेतलेल्या त्या निर्णयाचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं.

विचार करून करून त्याचं डोकं ठणकायला लागलं. थोडा वेळ आराम करावा म्हणून तो बेड वर पडला आणि झोप कधी लागली त्याचं त्यालाही कळलं नाही. दारावरची बेल वाजल्याने त्याची झोपमोड झाली. डोळे चोळतंच त्याने दार उघडलं तर दारात आभा आणि प्रसाद उभे. त्यांना पाहून अमेयला एकदम आश्चर्याचा धक्काच बसला.

” काय अमेय….तुझी इच्छा पूर्ण झाल्याचं पाहायलाही आला नाहीस तू??”

“म्हणजे…”

“म्हणजे काय म्हणजे…तुझीच इच्छा होती ना की मी नोकरी सोडून कलेमध्ये माझं करिअर करावं..त्यासाठी केलास ना एवढा खटाटोप..”

” काय बोलतेय तू… मला काहीही समजत नाहीये….”

” उगाच नाटकी करू नकोस आता…माहितीये मला सगळं.. ..”

अमेयने खोट्या रागाने प्रसादकडे पाहिलं. प्रसादने उगाच त्याची नजर चुकवली.

” त्याच्याकडे काय बघतोय…इकडे माझ्याकडे बघ…किती वाईट आहेस रे तू…किती त्रास दिलास मला..आणि स्वतः सुद्धा…”

” ते करणं गरजेचं होतं.”

“काय घंटा गरजेचं होतं… नीट समजावलं असतंस तर ऐकलं असतं की तुझं..”

” नीट समजावता समजावता तीन चार वर्षे निघून गेली होती..आता काय आयुष्य निघून जायची वाट पाहायला हवी होती की..??”

” पण काही दिवस तर माझा जीवच घेतलास ना…”

” जर तेव्हा ते केलं नसतं तर आज तू तुझ्या प्रदर्शनाचं आमंत्रण द्यायला इकडे आली नसतीस.”

” आणि जर मला ह्यातलं काही कळलं नसतं तर स्वतःपेक्षा जास्त माझ्यावर प्रेम करणारा, माझ्याबद्दल विचार करणारा एक हक्काचा माणूस मी गमावला असता.”

” मला तर वाटलं होतं की मी तुला already गमावलंय.”

” एवढ्या लवकर तुझी सुटका व्हावी अशी कदाचित देवाचीच इच्छा नसेल..” आभा त्याच्या मिठीत विसावत म्हणाली.

अमेयने तिला घट्ट मिठी मारली आणि प्रसादकडे पाहिलं. दोघेजण पुन्हा एकदा एकत्र आल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.

© PRATILIKHIT

12120cookie-checkहमसफ़र..

Related Posts

संवाद

संवाद

संसार (भाग २)

संसार (भाग २)

संसार

संसार

वाटणी

वाटणी

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 117,915 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories