अव्यक्त
आपल्या सगळ्यांच्या मनात निरनिराळे विचार चालू असतात. काही मनाला आनंद देणारे तर काही दुःख देणारे. आपल्या मनात चाललेल्या निरनिराळ्या गोष्टी आपण आपल्या जवळच्या व्यक्तीशी शेअर करत असो. असे काही मित्र मैत्रिणी असतात ज्यांच्याशी आपण मागचा पुढचा विचार न करता अगदी बिनधासपणे बोलू शकतो. आणि त्यांनाही आपण कसे आहोत याची पुरेपूर कल्पना असल्यामुळे त्यांना त्याचं वाईटही वाटत नाही.
पण आजकाल माणसांमधला संवाद खुंटत चालला आहे. सोशल मीडियाच्या मृगजळामुळे आपण आपल्याच जवळच्या व्यक्तींपासून दुरावत चाललो आहोत. आणि त्यामुळे बरेचसे विचार आपल्या मनात साठून राहतात. आणि जर त्यातले निगेटिव्ह विचार किंवा गैरसमज जर बाहेर आले नाहीत तर मग चिडचिड, डिप्रेशन अशा परिणामांना सामोरं जावं लागतं.
अव्यक्त फक्त प्रेमच असतं असं नाही. इतरही अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला कोणाबरोबर तरी शेअर कराव्याशा वाटतात. पण काही ना काही कारणांमुळे आपण ते टाळतो. आणि मग ते विचार आपल्याच मनात सतत घोळत राहतात. आपण जर कोणाबरोबर शेअर केलं तर आपल्याला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळू शकतं.
काही जणं तर अगदीच अबोल असतात. पण आपण अशा व्यक्तींकडे लक्षपूर्वक पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की कोणत्या ना कोणत्या प्रकारची भीती त्यांच्या मनात घर करून असते. आणि त्या भीतीमुळे ते अगदीच घाबरून राहतात.आणि मग अशांचा बाहेरच्या जगात निभाव लागणं जरा कठीण जातं. कारण आत्ताच युग हे स्पर्धेचं युग आहे आणि त्यात जो थांबला तो संपला.
व्यक्त होण्यासाठी सुद्धा प्रत्येक जण वेगवेगळा मार्ग अवलंबतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालंच तर काही जण आपल्या मनातले विचार कागदावर मांडतात, काही ते कॅमेरासमोर सांगतात तर काही जण त्यांच्या मित्र किंवा मैत्रिणींबरोबर शेअर करतात. माध्यम कोणतही असो. एखाद्या गोष्टीचा अतिविचार करून स्वतःची घुसमट करून घेण्यापेक्षा व्यक्त होणं केव्हाही चांगलं..
© प्रतिक प्रवीण म्हात्रे
No Comment