नियती….पर्व दुसरे ( भाग २३)
कोवलमला गेल्यावर सगळे जण आपापल्या ग्रुप बरोबर बीचवर फिरायला गेले होते. त्यांच्या हॉटेल बीच जवळच होता. त्यामुळे उशीर झाला तरी काही चिंता नव्हती. रात्री नऊ च्या सुमारास सगळे विराजसचा ग्रुप हॉटेल वर आला. त्यांच्या ग्रुप साठी त्यांनी दोन रूम घेतल्या होत्या खऱ्या पण ते सगळे एकाच रूम मध्ये होते. सगळं आवरून विराजस आणि निखिल बाहेर बाल्कनी मध्ये उभे होते तेवढ्यात खालून रश्मीचा ग्रुप आला. रश्मीने विराजसकडे पाहिलं तर विराजसने सरळ तोंड विरुद्ध दिशेला फिरवलं आणि तो रूम मध्ये गेला.
रात्री रश्मीच्या ग्रुप बरोबर बसायची कोणाचीच इच्छा नव्हती खरं तर पण आता एकत्र आलोच आहोत म्हणून मग सगळे जण त्या चार रुमपैकी मोठ्या असलेल्या रूममध्ये जमले. हळू हळू मैफिल रंगात येत होती. एका बाजूला विराजसचा ग्रुप आणि एका बाजूला रश्मीचा ग्रुप दोघांचीही चांगलीच जुगलबंदी चालू होती. थोड्या वेळाने विराजसला घरून फोन आला म्हणून तो बाहेर गच्चीवर गेला. फोनवर बोलत असताना त्याच लक्ष गेलं तर गच्चीच्या एका कोपऱ्यात अक्षय आणि रश्मी बसले होते. त्याने ते पाहिलं आणि मग तिथे आणखी न थांबता तो तडक खाली निघून गेला. रश्मीने त्याला आवाज दिला पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. तो पुन्हा सगळ्यांसोबत जाऊन बसला. पण त्याच्या चेहऱ्यावरून त्याचा मूड उतरल्याच निखिल आणि रोहितला बरोबर कळलं. आधीच ठिणगी पेटलेली आहे तिचा भडका व्हायला नको म्हणून मग दोघांनीही जबरदस्तीने त्याला त्यांच्या खोलीत नेलं आणि मग हळूहळू बाकीचेसुद्धा खोलीत येऊन बसले.
सकाळी नेहमीप्रमाणे विराजसला जाग आली. बाकीचे सगळे साखर झोपेतच होते. आता उठलोच आहोत तर जरा बाहेर फिरून येऊ असा विचार करून विराजस बीचवर जायला निघाला. तो बीचवर पोहोचला तर रश्मी आणि मिथिला दोघी जणी तिथे सकाळी सकाळी नारळपाणी पित उभ्या होत्या. त्यांना पाहून विराजसला एकदम हसायलाच आलं.
” काय झालं ?? एवढा का हसतोय??” मिथिलाचे तोंडातून स्ट्रॉ काढून विचारलं.
” हँगओव्हर नंतर उतारा म्हणून लिंबू सरबत पितात हे माहीत होतं.. नारळपाणी प्यायलेलं पहिल्यांदाच बघतोय..” विराजस हसतंच म्हणाला.
” ए..उतारा वगैरे काही नाही हा…आम्हाला काय ऐवढी चढली नव्हतीच…”
” ते मला कसं माहीत असणार..नंतर मी कोठे होतो ना पाहायला..” विराजस रश्मीकडे एक तिरपा कटाक्ष टाकत म्हणाला.
“हो हो…कळतात हा टोमणे..” रश्मी लटक्या रागाने म्हणाली.
” पण मी कुठे टोमणा मारला..मी आपलं सहज….”
” पुरे.. नाहीतर सकाळी सकाळीच भांडायला लागाल..” मिथिला विराजसला मध्येच थांबवत म्हणाली.
” हो ना..काही लोक तर उगाचच भाव खातात. लगेच रागावतात.. आणि..” रश्मी पुढे काही बोलणार तोच मिथिलाने तिचं तोंड दाबलं.
“निघायचं का आपण..??? ”
” मी थांबेन अजून थोडावेळ…तुम्ही जा जायचं तर..”
” थांबुया ना थोडा वेळ…किती मस्त वारा येतोय…” रश्मी हात पसरवत म्हणाली.
” तुम्ही घ्या मग वारा… मी जाते..बाकीच्यांना उठवते..नाही तर परत उशीर व्हायचा..” एवढं म्हणून मिथिला निघाली सुध्दा. निघताना रश्मीकडे बघून तिने डोळे मिचकवले आणि गालातल्या गालात हसत ती हॉटेलकडे जायला निघाली.
थोडावेळ तिथे निरव शांतता पसरली. शेवटी ते असह्य झाल्याने रश्मीनेच त्या शांततेचा भंग केला.
” विराजस….”
विराजसने तोंडातून एक शब्दही न काढता अगदी मठ्ठपणे तिच्याकडे पाहिलं.
“सॉरी…”
“काय म्हणालीस…?” विराजसने आश्चर्याने विचारलं.
“सॉरी म्हणलं मी…”
“You should be…” विराजस हात उंचावत म्हणाला.
” अरे आधीच रविवारी अँलिपीला अक्षय सोबत भांडण झालं होतं. त्यात तो सोमवारी जिम मध्ये पण डोकं खात होता सारखा. म्हणून मग माझा मूड चांगला नव्हता. त्यात तुम्ही…”
“अच्छा… म्हणजे तू दुसऱ्यांचा राग माझ्यावर काढलास तर…?”
“अगदीच तसं नाही..पण तो निघाला…”
“का?? अक्षय वर काढायची भीती वाटते…?? की काढायचा नाहीये..??”
“भीती वगैरे नाहीये रे..त्याच्या नादी कोण लागेल..तुला माहितीये ना कसा आहे तो???”
” चांगलंच… म्हणून तर लांब राहतो ना..”
” हे चिडणं ना जरा कमी करत जा…” विराजस रश्मीच्या डोळ्यात पाहून म्हणाला.
” वाह…पहा कोण बोलतंय….स्वतःकडे पाहिलंस का??? तू किती चिडतोस ते??? मी बोलले नसते तर तू बोललाच नसता कधी. .”
“तो स्वभाव आहे माझा….आणि तो बदलणं कठीण आहे…”
“म्हणजे काय मीच नेहमी असं तुझ्या मागे यायचं का???”
“नेहमी नाही..हल्ली सहसा मी जास्त नाही चिडत..संयम ठेवायचा प्रयत्न करतो..हा जर माझी काही चूक नसेल आणि विनाकारण माझ्या कोणी वाकड्यात शिरलं तर मग त्याला मी काही करू शकत नाही..माझीच चूक असेल आणि तरीही जर मी चिडलो तर मग राग गेल्यावर मी माझी मागेन हे ही नक्की…”
” बापरे…खूप कॉम्प्लिकेएड आहेस रे तू…तुझी कोणती डिक्शनरी आहे ज्याने मी तुला समजू शकेन…”
” सहवास ही विराजस ची डिक्शनरी आहे मॅडम..तुला हिमनग माहितीये?? त्याचा फक्त १/८ भाग आपल्याला दिसतो.. मी काहीसा तसा आहे….पण कोणी तर धडक दिली तर ७/८ भाग खूप नुकसान करू शकतो..टायटॅनिक आहेच उदाहरण म्हणून…” विराजस हसतच म्हणाला.
” चल आता आपल्याला निघायला हवं…नाही तर उशीर व्हायचा…”
” हो निघुया….”
विराजस बरोबरचा अबोला संपला या समाधानातच रश्मी त्याच्या मागे चालू लागली.
No Comment