सुख म्हणजे नक्की काय असतं ??

सुख म्हणजे नक्की काय असतं ??

 

जनी सर्व सुखी असा कोण आहे..
विचारे मना तूचि शोधूनी पाहे..

तसं बघायला गेलं तर या पंक्तीत सांगितल्याप्रमाणे सर्वात सुखी मनुष्य शोधून सुद्धा सापडणार नाही. कारण सुख हे आपल्या मानण्यावर अवलंबून असतं. एखाद्या गोष्टीने आपलं समाधान झालं तर तात्पुरतं का होईना आपण सुखी होतो. पण तेवढ्या क्षणापूरताचं.. पुन्हा मग येरे माझ्या मागल्या..

माणसाकडे कितीही पैसा असला, कितीही सोयी सुविधा त्याच्या पायावर लोळण घेत असल्या तरीसुद्धा तो मनुष्य कायम आपलं सुख कशात आहे हे शोधत फिरत असतो. आणि असमाधानी मनुष्य कधीही सुखी होऊ शकत नाही..आता उदाहरण द्यायचं झालंच तर आपण लंडनवासी मद्यसम्राट…एवढा पैसा, एवढी श्रीमंती असूनसुद्धा असमाधानी असल्यामुळे कर्ज बुडवून देश सोडून गेला. तेथे तो मजेत आहे की नाही हा भाग वेगळा पण सतत एक टांगती तलवार डोक्यावर असते. पण काय उपयोग अशा श्रीमंतीचा..??

मागील महिन्यात वाचनात एक गोष्ट आली होती. एका श्रीमंत बाईने तिच्या किचनचं रेनॉवेशन केल्यावर जुनी सर्व भांडी भंगारमध्ये काढली. तिच्याकडे काम करणाऱ्या मोलकरणीने ते पाहिलं आणि तिला विचारून ती सर्व भांडी तिने तिच्या घरी नेली. आता ती भांडी तिच्या त्या छोट्या किचनची शोभा वाढवत होती. आणि त्या सर्व नवीन भांड्यांमध्ये तिची जुनी भांडी ठेवणं तिला पटत नव्हतं म्हणून तिने तीची जुनी भांडी बाहेर काढली. बाहेर येणाऱ्या भिकाऱ्याने ते पाहिलं आणि तो ती जुनी भांडी घेऊन गेला. सांगायचं तात्पर्य असं की आपल्याकडे एखादी गोष्ट जो पर्यंत आहे तो पर्यंत आपल्याला त्याची किंमत असते पण एकदा का आपल्याकडे त्याहून चांगली गोष्ट आली की मग आपण जुन्या गोष्टी टाकून देतो आणि नवीन गोष्टींमध्ये आपलं सुख शोधण्याचा प्रयत्न करतो.

आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींमध्यें जर आपण समाधान मानलं तर सुखासाठी आपल्याला इतरत्र कुठेही शोधण्याची गरज पडणार नाही. पण आपण भविष्याची चिंता करून वर्तमानात जगायचं विसरून जातो.

आपल्याला आपलं काम आवडत नसलं तरीसुद्धा पगार मिळतो म्हणून आपण ते करत राहतो. बऱ्याचदा असं दाखवलं जातं की अमुक एक माणसाला त्याचं काम आवडत नव्हतं म्हणून त्याने नोकरी सोडली आणि त्याच्या आवडत्या कामाचा व्यवसाय सुरू केला. पण सगळ्यांनाच ते शक्य नसतं त्यामुळे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या गोष्टींमध्येच आपलं मन रमवणं भाग असतं. मग अशावेळी उगाच नशिबाला दोष न देता आहे ते जीवन समाधानाने जगलं तर आपण थोड्या फार प्रमाणात का होईना नक्कीच सुखी जीवन जगू शकतो.

©प्रतिक प्रवीण म्हात्रे

7020cookie-checkसुख म्हणजे नक्की काय असतं ??

Related Posts

Engineer’s Day

Engineer’s Day

ब्रह्मस्त्र…. #review

ब्रह्मस्त्र…. #review

राजकारणा पलीकडची मैत्री

राजकारणा पलीकडची मैत्री

ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं…

ये नया हिंदुस्तान हैं, झुकेगा नहीं…

No Comment

Leave a Reply

Blog Stats

  • 114,930 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories