कसं पाहताय नात्याकडे ??
विवाहबाह्य संबंध….होणाऱ्या घटस्फोटांचं महत्वाचं कारण असूनही सर्वोच्च न्यायालयाने त्याला मान्यता देऊन सर्वसामान्यांच्या विचारांना जणू सुरुंगच लावला. तसं पाहायला गेलं तर अविवाहित किंवा विवाहित कोणतीही व्यक्ती तिच्यासोबत होणारी प्रतारणा खपवून घेऊ शकत नाही. अगदी आपल्या मैत्रिणीने किंवा मित्राने जरी आपल्यापेक्षा जास्त कोणाला महत्व दिलं तरीही इथे आकांडतांडव होतो तिथे विवाहबाह्य संबंधांची काय कथा…सर्वोच्च न्यायालयाने जरी याला मान्यता दिली असली तरी जनता ते कितपत स्वीकारू शकेल हा प्रश्नचं आहे.
हल्लीच्या अनेक सिनेमा किंवा मालिकांमध्ये सुद्धा ह्याच विषयावर बेतलेल्या असतात. त्यातलाच एक हल्लीच येऊन गेलेला मनमर्ज़िया सिनेमा…त्यात त्या सिनेमाच्या नायिकेचं एका मुलावर प्रेम असतं. तो त्याच्या घरी सांगायला टाळाटाळ करतो म्हणून ही घरून ठरवलेल्या मुलाशी लग्न करण्याचं मान्य करते. लग्न झाल्यावर तिच्या बॉयफ्रेंडने तिच्याकडे एक चान्स मागितल्यावर ती पुन्हा त्याच्याकडे जाते. मन थोडे दिवस त्या मुलाबरोबर घालवल्यावर तिला उपरती होते की आता तिचं तिच्या नवऱ्यावर प्रेम आहे..मग एवढे दिवस ती काय झोपा काढत होती??? ठीक आहे प्रत्येक व्यक्तीला तिच्या जीवनाचा साथीदार निवडण्याचा हक्क आहे..मान्य आहे पण एखादं पाऊल उचलताना त्याचा विचार आधी करायला नको ? अगदी लग्नाच्या बोहल्यावर उभं राहायच्या वेळी वधू वर पळून गेल्याच्या किती तरी घटना आहेत. स्वतःच्याच आयुष्यबाबत इतकं गोंधळात कसं असू शकतं कोणी ??
कोणतंही नात निर्माण होण्यासाठी आणि निर्माण झालेलं नातं जपण्यासाठी सहवासाची आवश्यकता असते. त्यातूनच नात्यातलं प्रेम वाढत जातं. आणि जेव्हा सहवास कमी होतो तेव्हा निसर्गाच्या नियमाप्रमाणे सर्वच जीव हे दुसरा पर्याय शोधतात. अर्थात त्यात माणूसही आलाच. आता या गोष्टीला थोडेफार आपणही जबाबदार आहोतच. टाळी एका हाताने वाजत नाही हे देखील तितकेच खरे आहे.
आपण पाश्चात्य संस्कृतिचे अनुकरण करत आहोत. त्यातूनच लिव्ह इन रिलेशनशिप, फ्रेंड्स विथ बेनिफिट्स हे सगळे प्रकार आपल्याकडेही हल्ली सर्रास पाहायला मिळतात. दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे, एकमेकांचा सहवास आवडतो पण आपलं सोबत काही भविष्य नाही हे आधीच ठरवून जितका वेळ सोबत आहोत तो वेळ एकमेकांसोबत घालवण्यावर हल्लीची तरुणाई भर देताना दिसते. भावनिक व्हायचं नाही हे आधीच ठरवलं असलं तरीसुद्धा दूर जाताना त्रास हा होताच. पण त्यातूनही मार्ग काढला जातो.
आजकालची रिलेशनशिप ही प्रेमापेक्षा आकर्षणावर आधारित आहे. अर्थात प्रेम की आकर्षण हा एक वेगळाच मुद्दा आहे पण जितक्या सहज रिलेशनशिप सांधली जातेय तितक्याच सहजपणे ती तोडलीही जात आहे. नानाविध कारणांमुळे नातं तुटतं, कधी तुटलेलं नात पुन्हा जुळतं तर कधी त्या नात्यामुळेच नव्याने निर्माण झालेल्या नात्यामध्ये वितुष्ट येतं. यावर आपण कशी प्रतिक्रिया देतोय आणि कोणता मार्ग निवडतोय यावर सर्व अवलंबून असतं. एकमेकांना स्पेस देताना आपल्याच नात्यात दरी निर्माण होणार नाही याची काळजी घेतलेली बरी.
@ प्रतिक प्रवीण म्हात्रे
Awesome
Nice
Thanks 🤗