नियती …पर्व दुसरे..(भाग १५)
संध्याकाळी क्लायंटसमोर प्रेझेन्टेशन देत असताना अविनाशच्या मोबाईलचा नोटिफिकेशन लाईट लुकलूकला.
‘ पोचल्या वाटतं मॅडम..’ अविनाश मनात म्हणाला आणि पुन्हा प्रेझेन्टेशन मध्ये मग्न झाला.
प्रेझेन्टेशन झाल्यावर त्याने मोबाईल पहिला तर रश्मीचे आठ मिस कॉल.
‘ आता उद्रेक होणार…’ असं स्वतःशीच म्हणत त्याने रश्मीला फोन लावला.
एकाच रिंग मध्ये रश्मीने फोन उचलला..
” फोन जवळच बसून होतीस की काय ??? ” अविनाश हसत म्हणाला.
” मग काय…किती फोन केले तुला..” रश्मी थोडी रागातच म्हणाली.
” अगं तुला म्हणालो होतो ना की माझी मीटिंग आहे म्हणून…”
” दुपारी होती ना मीटिंग…आता तर संध्याकाळ झाली…”
” कम ऑन यार रश्मी…दुपार म्हणजे काय दुपारीच संपणार का मीटिंग…उशीर झाला संपायला…”
” हं..”
” बरं ते सोड…तू पोचलीस का व्यवस्थित.. हॉस्टेल मिळालं लगेच…आणि रूम….”
” अरे हो हो…एकाच वेळी किती प्रश्न विचारशील…. पोचले मी नीट..आणि यू नो व्हॉट…कंपनीने गाडी पाठवली होती…मला घ्यायला..मला म्हणजे आम्हाला घ्यायला…बरेच जण आहेत अजून मुंबईचेच…”
” अरे वाह. चांगलं आहे मग..आपल्याच लोकांबरोबर ओळख व्हायला फार वेळ लागत नाही..बोलता बोलताच ओळख होऊन जाते..”
” हो ना…माझी झाली सुद्धा ओळख..मग आम्ही तीन जणींनी एकत्रच घेतली रूम… मी, मिथिला आणि नेहा……. ए मस्त आहेत रे दोघी पण…एकदम आपल्यासारख्या…”
” आपल्या सारख्या म्हणजे.. ”
” आपल्या सारख्या म्हणजे एकदम बिनधास्त आणि मोकळ्या. नाही तर तुला माहितीये ना..ती आपल्या ऑफिस मधली अंकिता..किती भाव खाते..जसं काय स्वर्गातली अस्पराच ही…”
” आयला…कोणाचं काय तर कोणाचं काय..कोणाचा विषय कुठे नेतेय तू.. ”
” सॉरी सॉरी…सांगायचा मुद्दा एवढाच की मस्त आहेत दोघी…”
” चांगलं आहे..चला..म्हणजे पहिल्याच दिवशी तुला चांगल्या मैत्रिणी भेटल्या..तीन महिने मजेत जातील..”
” हो….”
” बरं…मी काय म्हणतो..मी आता निघतो. आणि पाऊस सुद्द्धा सुरू झालाय..मी घरी गेल्यावर मेसेज करतो…”
” अरे वाह..मी थोडीशी लांब काय गेली तू तर कारणंच द्यायला लागलास..मागे पावसात किती भिजलाच होतास की माझ्याबरोबर…” रश्मी हसत म्हणाली.
” काय चाललंय रश्मी तुझं… कसला संदर्भ कशाशी काय जोडतेयस तू…”
” अरे मस्करी केली रे…आता तुला त्रास दयायला नाही मी तिथे..मग तुला कोण त्रास देणार…म्हणून मग मीच फोन वरून त्रास देतेय..” असं म्हणून रश्मी स्वतःशीच हसली.
” ह्यात हसण्यासारखं काय होतं…”
” जाऊदे…तुला नाही कळणार…”
” बरं…”
” हा..जा तू घरी जा पाहिले..आणि विंगशीटर आणलाय का.नाही तर पुन्हा भिजशील आणि पुन्हा सर्दी होईल.”
” हो आणलंय…” नाही म्हणून पुन्हा मग चार गोष्टी ऐकून घेण्यापेक्षा खोटं बोलणंच अविनाशला जास्त सोयीचं वाटलं.
” ठीक आहे..सावकाश जा…”
” हो…”
” आणि अवि….”
” हा…बोल ना…”
” मिस यू….”
” मिस यू ठु….”
” टाटा…”
अविनाशला घरी पोचायला थोडा वेळचं झाला. एक तर ऑफिस नंतर जिम आणि त्यात धो धो कोसळणारा पाऊस…घरी आल्या आल्याच त्याने रश्मीला फोन करून घरी पोचल्याचं कळवून टाकलं..उगाच कशाला पुन्हा चार गोष्टी ऐकून घ्या…
जेवल्यानंतर त्याने रश्मीला फोन लावला तर तिचा फोन बिझी…’घरी फोन केला असेल कदाचित..’ अविनाश मनात म्हणाला आणि इन्स्टाग्राम उघडून नुसतंच स्क्रोल करू लागला. स्टोरी बघता बघता त्याच्यासमोर रश्मीची नुकतीच अपलोड केलेली स्टोरी आली. विमानातून काढलेले बरेच फोटो रश्मीने अपलोड केले होते. एक दोन फोटो बघून झाले असतील तेवढ्यात रश्मीचा व्हिडिओ कॉल आला..
” हाय…..”
” नमस्कार…आज चक्क व्हिडिओ कॉल…”
” अभी तो ये ही एक सहारा है जनाब…नाहीतर दिसणार कसा तू…”
“ते ही आहेच म्हणा…बोला बोला…झालं का सगळं सेट…”
” ऑल सेट…हे बघ…” असं म्हणून रश्मीने त्याला जवळपास सगळी रूमचं फिरुन दाखवली.
” मस्तय ग रूम… आणि गॅलरीतून किती मस्त बीच दिसतोय…”
” हो..आणि आजूबाजूला मस्त झाडं वगैरे आहेत. नाही तर आपल्याकडे…नुसतं सिमेंटचं जंगल…”
” हं…”
” उद्याची सगळी तयारी झाली का ???” अविनाशने शिंक देत विचारलं…
” हो झाली…आणि काय रे…खोटं बोललास ना माझ्याशी…पावसात भिजलास वाटत..बघ लगेच सर्दी झाली…स्वतःची काळजी घ्यायला कधी शिकणार तू अवि….”
” अहो इन्स्ट्रक्टर….जरा थंड घ्या…थोडीशी सर्दी झालीये…जाईल एक दोन दिवसांत…”
” जाऊ दे…तुला सांगून काही उपयोग आहे का..तुझंच खरं करणार तू…”
” असाच आहे मी…” अविनाश हसत म्हणाला.
” चल आता मी झोपतो…”
” हो..झोपा राजे… झोपा.. आपण कधी कोणासाठी जागे राहिला आहेत का…झोपा…”
” तुला माहीत आहे ना…”
” हो…मला माहित आहे तू काय सांगणार आहेस..तू लवकर झोपतोस…तुला लवकर उठायचं असतं…माहितीये हा मला…झोप झोप…चल गुड नाईट..”
” येस…गुड नाईट…”
बघता बघता आठवडा निघून गेला..रश्मी आणि अविनाश दोघेही स्वतःच्या कामात मग्न होते. रात्रीच काय तो त्यांना बोलायला वेळ मिळायचा. पण दोघे एवढे थकून जायचे की त्यांच्यातला एक जण बोलता बोलताच झोपून जायचा..त्यांच्यापैकी कोणी मेसेज केलाच दिवसभरात तरीसुद्धा दुसऱ्याचा रिप्लाय उशिराच यायचा..सुरुवातीला दिवसभर एकमेकांसोबत असणारे, एकमेकांची थट्टा करणारे , सतत बोलणारे ते दोघेही आता इच्छा असूनसुद्धा एकमेकांना हवा तेवढा वेळ देऊ शकत नव्हते. आठवड्याचे पाच दिवस असेच कामात निघून गेले. शनिवारीसुद्धा रश्मीला ऑफिसला जावं लागल्याने तो दिवस सुद्धा गेला. अविनाशला हे माहीत नव्हतं त्यामुळे त्याने एक दोनदा फोन केला. पण ‘ ऑफिसमध्ये आहे ‘ असा रश्मीचा मेसेज पाहून मग त्यानेसुद्धा पुन्हा फोन करण्याचा नाद सोडून दिला आणि तो कॅमेरा घेऊन रपेट मारायला बाहेर पडला.
क्रमशः
© प्रतिक प्रवीण म्हात्रे
No Comment