भिकारी की….. ?

रेल्वे स्टेशनवर किंवा बस स्टँडवर…अगदी रस्त्यावर सुद्धा… आपल्याला अनेक वृद्ध माणसे दिसतात. हातात एखादे मळके गाठोडे, अंगात फाटके कपडे…एकंदर पेहेरवावरून ते भिकारी असल्याचा आपण समज करून घेतो. ते आपल्या जवळ जरी आले तरी आपण त्यांना हिडीसपीडिस करतो.

अगदी आजचाच प्रसंग…अगदी डोळ्यासमोर घडलेला…७.५२ च्या विरार बोरिवली गाडीमध्ये मधल्या प्रथम दर्जाच्या डब्यात एक वृद्ध व्यक्ती चुकून चढली. पांढरा मळलेला झब्बा, पायात फाटलेला पायजमा आणि हातात एक गाठोडं…एकंदरीत पेहेरवावरून तरी स्थानिक वाटत नव्हती. त्या आजोबांना बघताच दरवाज्यात उभ्या असलेल्या काही लोकांच्या कपाळावर आठ्या पडल्या. ” उतरो नीचे…फर्स्ट क्लास है….समजता नही क्या…” त्यांनी असं बोलताच ते आजोबा जरा भांबावले. त्यांना बहुदा त्यांचं बोलणं नीट समजलं नसावं. म्हणून ते आळीपाळीने त्या माणसांकडे बघत होते. कुठे जावं हेसुद्धा त्यांना कळत नव्हतं. मग काही लोकांनी त्यांना टीसी ची भीती दाखवायला सुरुवात केली. अगदी हडतुड करून त्यांनी त्या आजोबांना बाहेर उतरायला भाग पाडलं. त्यांना त्यांचं बोलणं कळलं असेल की नाही जर शंकाच आहे पण त्या माजूरड्या लोकांच्या चेहऱ्यावरचा रंग पाहून ते आजोबा काहीही न बोलता खाली उतरले. त्यांच्या वागण्याकडे पाहून तरी असं वाटत नव्हतं की ते भीक मागण्यासाठी आले असतील. त्यांना कुठे तरी जायचं होतं पण कुठे ते त्यांना नीट सांगता येत नव्हतं.. साधारण ७५ ते ८० वय असेल त्यांचं. या वयात माणसाची स्मरणशक्ती सुद्धा थोडीशी कमजोर होते. आणि आपण एखाद्या परक्या मुलुखात हरवलो असलो तरी आधीच भीतीने आपली गाळण उडते.

मला या गोष्टीने एवढा विचार करायला भाग पाडलं त्याचं कारण म्हणजे साधारण पाच वर्षांपूर्वी माझे आजोबा त्यांच्या जेष्ठ नागरिकांच्या सहलीमधून केरळला गेले होते. आणि तिकडे त्यांची त्यांच्या माणसांसोबत चुकामुक झाली. पूर्ण दिवसभर ते वेड्यासारखे सगळ्यांना शोधत होते. एक तर जागा नवखी..आणि भाषाही समजत नव्हती..टेकनोलॉजि पासून थोडं लांब असल्यामुळे त्यांना फोन सुद्धा वापरता येत नव्हता. बरं…त्यांना थोडीफार हिंदी येत होती पण तिकडची माणसं हिंदीमध्ये बोलायला तयार नव्हती. केरळ मध्ये तर कोणत्याही लोकल व्यक्तीशी बोलताना भाषेचा खूप प्रॉब्लेम येतो. हे मी इतक्या ठामपणे सांगू शकतो कारण मी केरळला तीन महिने राहून आलोय..तिकडची लोकं त्यांच्याच भाषेत बोलतात…दिवसभर शोधाशोध करून दमल्यावर हतबल होऊन एका ठिकाणी बसले असता त्यांना मिलिटरी वेशातील एक माणूस दिसला..त्याला माझ्या आजोबांनी घडलेलं सगळं सांगितलं असता त्या माणसाने त्यांच्याकडे कोणाचा फोन नंबर आहे का म्हणून विचारणा केली. आणि आमच्या सुदैवाने माझ्या वडिलांनी त्यांचा आणि माझ्या आजोबांच्या भावाचा नंबर लिहिलेलं कागद त्या वेळी माझ्या आजोबांकडे होतं..आणि माझ्या आजोबांचे भाऊ सुद्धा त्यावेळी त्यांच्यासोबत केरळ टूरवर गेले होते. फक्त त्या एका कागदामुळे सकाळी हवरलेले आजोबा संध्याकाळी सापडले. जर तो कागद त्यावेळी त्यांच्याकडे नसता तर काय झालं असतं याची कल्पना सुद्धा न केलेली बरी. त्यांनी परत आल्यावर जे अनुभव सांगितले त्याने अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला.

आज त्या आजोबांच्या जागी माझे आजोबा असू शकले असते..पण आमच्या सुदैवाने तसं झालं नाही..सांगायचा मुद्दा एवढाच की जेव्हा आपल्याला कोणी असं दिसतं आणि आपल्याला त्याला मदत करत येत नसेल तर निदान त्याला हडतुड तरी करू नका…वेळ ही कोणावरही सांगून येत नाही…
कोणालाही भिकारी होण्याची हौस नसते…परिस्थिती माणसाला ते करण्यासाठी भाग पाडते..तो माणूस कोणत्या परिस्थिती मधून जात आहे याची आपल्याला तिळमात्रही कल्पना नसते आणि आपण आपले तर्क करून मोकळे होतो. त्यामुळे कोणतीही कृती करण्याआधी थोडासा विचार केलेला बरा.

© प्रतिक प्रवीण म्हात्रे

5730cookie-checkभिकारी की….. ?

Related Posts

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

डॉ. विजय पांडुरंग भटकर (भारताच्या सुपर कॉम्पुटरचे जनक )

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

भारतीय लोकशाहीत आजच्या राजकारण्यांचा स्तर

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनला कशी गेली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

गांधीजींची हत्या का करण्यात आली?

4 Comments

Leave a Reply

Blog Stats

  • 123,029 hits
Follow The WordPress.com Blog on WordPress.com

Categories